प्रत्येकाच्या घरात भाजीउद्यान
आपल्याला नेहमी विकत आणाव्या लागणाऱ्या वस्तूंमध्ये भाज्या आणि फळे यांचा समावेश आहे. भाजी तर जवळपास प्रतिदिन विकत आणावी लागते. घराच्या परसात पूर्वी भाजी पिकविली जात असे. तथापि, आता परसू असलेली घरेच निदान शहर भागांमध्ये तरी नसल्याने भाजीसाठी लोक मंडईवरच अवलंबून आहेत.
तथापि, उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील एक गाव असे आहे, की या गावात लोकांना भाजी किंवा फळे विकत आणावीच लागत नाहीत. कारण या सिकंदरपूर नामक गावात प्रत्येक घरात भाजीउद्यान किंवा ‘किचन गार्डन’ आहे. त्यामुळे प्रत्येक घर त्याला लागणाऱ्या भाज्या आणि फळे घरातच पिकविते. परिणामी, या गावात भाजी मंडई किंवा फळबाजार नाही. आसपासच्या गावात या सोयी असल्या तरी या गावातील ग्रामस्थांना तेथे कधी जावे लागत नाही. हे ग्रामस्थ आपल्या भाजउद्यानात पिकलेली भाजी आणि फळे एकमेकांना वाटतात. त्यामुळे प्रत्येक घराकरीता विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे नेहमी उपलब्ध असतात. त्यामुळे या गावाला या दोन वस्तूंची कधी कमतरता जाणवत नाही. तसेच भाज्या किंवा फळे यांचे दर वाढले, अशी तक्रारही या गावकऱ्यांना कधी करावी लागत नाही.
घरात भाजी आणि फळे पिकविण्याचा आणखी एक अनुषंगिक लाभ या गावाला होत आहे. तो असा की. या गावात सांडपाणी आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न मुळी निर्माणच होत नाहीत. कारण प्रत्येकजण त्याच्या घरातील सांडपाण्यावरच फळे आणि भाज्या पिकवितो. त्यामुळे या गावात फारशा गटारी किंवा सांडपाण्याचे नालेली फारसे नाहीत. त्यामुळे डासांच्या समस्येचाही मोठ्या प्रमाणात निचरा होतो. अशा प्रकारे या गावातल्या लोकांना या घराच्या उद्यानांमुळे अनेक लाभ होतात. भरपूर भाजी आणि फळे कोणत्याही मोसमात उपलब्ध असणे, बाजारात होणाऱ्या फळांच्या आणि भाज्यांच्या दरांमध्ये चढउतार होण्याची चिंता नसणे, गावात सांडपाण्याची समस्या नसणे आणि सांडपाण्यामुळे होणाऱ्या रोगराईचीही फारशी चिंता नसणे, असे हे चार लाभ आहेत. या गावातील लोक असे प्रतिपादन करतात, की सांडपाण्याच्या समस्येमुळेच प्रत्येक घरात भाजी आणि फळे पिकविण्याचा उपक्रम त्यांनी अनेक वर्षांपूर्वी हाती घेतला. ग्रामपंचायतीनेही त्यांना याकमी प्रोत्साहन दिले. त्यामुळे आज प्रत्येक घरात भाजीउद्यान आहे. मुख्य म्हणजे भाज्या आणि फळे नैसर्गिक पद्धतीने पिकवित असल्याने या लोकांना आरोग्याची समस्या फारशी निर्माण होत नाही. या गावातील अनेक लोक या शुद्ध अन्नामुळे शतायुषी झाले आहेत, असेही या गावकऱ्यांचे म्हणणे असल्याचे दिसून येते.