महिलांकडून अनोखी भेट अपेक्षित
क्रिकेट आणि महिला वर्ल्ड कप याचं माझं फार जवळचं नातं. आकाशवाणीवरून क्रिकेट समालोचक म्हणून ऐन पंचविशीत क्रिकेट मधील वर्ल्ड कप सारख्या मोठ्या इव्हेंट मध्ये मी लॉन्च झालो होतो. 23 डिसेंबर 1997 रोजी न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड असा सामना मुंबईचा वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला होता. याच सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचनाचा श्री गणेशा केला होता. त्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया भारत विरुद्ध झिंबाब्वे भारत विरुद्ध इंग्लंड या देशातील पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांचे समालोचन करण्याची संधी मिळाली. आयुष्यात जसं पहिलं प्रेम विसरता येत नाही तसं पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे समालोचन अजूनही मी विसरलो नाही. अर्थात ही पूर्व पिटिका सांगण्याचं कारण हेच आहे की सध्या महिला विश्वचषक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. त्यातच भारत विरुद्ध जगजेता ऑस्ट्रेलिया असा उपांत्य फेरीचा सामना आज खेळवला जाणार आहे.
न्यूझीलंड विरुद्धआयर्लंड सामना होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क हा सामना मी मुंबईच्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या अतिथी कक्षातून अनुभवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने डेन्मार्क संघाची पिसे काढली होती. त्या सामन्यातील बेलींडा क्लार्कचे ते द्विशतक अजूनही माझ्या डोळ्यासमोर तरळतय. आजही ऑस्ट्रेलियन महिलांचे क्रिकेट अगदी पुरुषांच्या क्रिकेटला लाजवेल असंच असतं असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरू नये. अर्थात त्याचा पाया त्याकाळी बेलींडा क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन संघाने घालून दिला होता हे सत्य मात्र आपल्याला नाकारून चालता येणार नाही. लीसा किटली, करेन रोलटण, या महिला खेळाडूंनी त्यावेळी बराच दबदबा निर्माण केला होता. आजही महिला क्रिकेट म्हटलं की ऑस्ट्रेलियन संघाला तोड नाही. अधून मधून भारत, आफ्रिका, इंग्लंड, न्युझीलँड सारखे संघ दे धक्का देण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यात सातत्य नसतं.
असो. साखळी सामन्यातील सलग तीन पराभवानंतर भारतीय महिला संघाने न्यूझीलंडला हरवत उपांत्य फेरी गाठली खरी. परंतु आता खरी लढत आहे ती ऑस्ट्रेलियाशी. ऑस्ट्रेलियन खेळाडू ते पुरुष असो किंवा महिला नेहमीच दणकट देहयष्टीचे असतात. त्यांचे बीनीचे खेळाडू हे सुरुवातीपासूनच आक्रमक असतात. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट ने आतापर्यंत 13 आयसीसी इव्हेंट जिंकले आहेत. झटपट क्रिकेटमध्ये आतापर्यंत सात वेळा त्यांनी विश्वचषक जिंकला आहे. यावरून महिला क्रिकेटमध्ये आम्हीच डॉन आहोत हे त्याने वारंवार सिद्ध केले आहे. तीन करोड लोकसंख्या असलेला ऑस्ट्रेलिया देश. परंतु याच देशाने क्रिकेटवर ख्रया अर्थाने मोहीनी टाकली आहे. या सामन्यात जर ऑस्ट्रेलियाला पराभूत करायच असेल तर सुरुवातीची फळी कापण फार गरजेचे आहे. एलिसा हिली, पेरी, गार्डनर या खेळाडूंना जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू न देणे हेच बरं. एलिसा हिली हिने जसं मागचा वर्ल्डकप गाजवला होता तसा ती हाही वर्ल्ड कप गाजवत आहे. परंतु या महत्वपूर्ण सामन्यात ती खेळेल की नाही याबद्दल साशंकता आहे. भारतीय संघाचा विचार केला तर ऐनभरात असलेली प्रतिका रावळ मोक्याच्या क्षणी दुखापतग्रस्त झाली आहे. परंतु तिच्या जागी आक्रमक शेफाली वर्मा संघात असणं हेही न असे थोडके. ज्यावेळी भारतीय महिला संघाची निवड झाली होती त्यावेळी शेफाली वर्मा पहिल्या चौदात का नाही हे कोड मात्र उलगडलं नव्हतं. दुसरीकडे झोपी गेलेली हरमनप्रीत कौर नावाची वाघीण आता जागी होणार का? हा ही कळीचा मुद्दा आहे. वर्ल्ड कप चा विचार केला तर 2017 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला बाद फेरीत पराभूत केलंय. थोडक्यात स्मृती मंधना, शेफाली वर्मा, रोडरिक्स, आणि स्वत? कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यावरच फार मोठी जबाबदारी असणार आहे. या जबाबदारीतून ही सर्व मंडळी तावून-सुलाखून कसे बाहेर निघतात हे बघणं ही औत्सुक्याचे ठरणार आहे. हा सामना बाद फेरीचा आहे त्यामुळे दबाव दोन्ही संघावर समसमान असणार हे तेवढेच खरं. बघायचं आहे की भारतीय महिला संघ हा सामना जिंकत प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना अनोखी भेट देतात का याकडेच सर्व भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष लागलंय एवढ मात्र खरं.!