जंगलात वसलेला महिलांचा अनोखा देश
पुरुषांच्या सावलीलाही नाही स्थान
महिलांचे एक असे जग आहे, जेथे पुरुषाचा कायदा चालत नाही तसेच त्यांच्या उपस्थितीला अनुमती नाही. अमेरिकेच्या ओरेगन प्रांतातील घनदाट जंगल आणि दुर्गम पर्वतांदरम्यान एक असा ‘गुप्त संसार’ आहे, ज्याला ‘वुमेन्स लँड’ म्हटले जाते. 1970 च्या दशकापासून चालत आलेला हा एक असा क्रांतिकारक प्रयोग आहे, जेथे महिलांनी समाजाच्या बेड्या तोडून निसर्गाच्या कुशीत स्वत:चे वेगळे संस्थान स्थापन पेले आहे.
येथे गोंगाट नाही तसेच आधुनिक जगाची धावपळ नाही. येथे केवळ सिस्टरहुड आणि आत्मनिर्भरतेचे राज्य चालते. या वस्तींमध्ये राहणाऱ्या महिला स्वत:च्या सुरक्षेपासून घर निर्माण करण्यापर्यंतचे काम स्वत:च करतात. हे वुमेन्स लँड आंदोलन नारीवादी विघटनवादाचे असे उदाहरण आहे, जेथे महिलांनी पितृसत्ताक समाजाला पूर्णपणे नाकारले आहे. 1970 आणि 80 च्या दशकात जेव्हा जग बदलत होते, तेव्हा शेकडो महिलांनी ओरेगनच्या स्वस्त आणि एकांत जमिनीला स्वत:चे वास्तव्यस्थान केले.
पुरुषांच्या प्रवेशावर बंदी
जी कामे पुरुषांच्या हिस्स्याची मानली जातात, ती कामे येथे महिलाच करतात. येथील जीवनशैलीने जगाला महिला पुरुषांशिवाय जगू शकतात, तसेच एक पूर्ण संस्कृती स्वत:च्या बळावर चालवू शकतात हे दाखवून दिले आहे. आजही ओरेगनच्या या पर्वतांमध्ये ‘रुटवर्क्स’ आणि ‘वी वुमेन’ यासारखे समुदाय अशा महिलांसाठी आध्यात्मिक शरणस्थळ ठरले आहेत, जे जगाच्या गोंगाटापासून दूर स्वत:ची खरी ओळख शोधत आहेत.
ओरेगनच्या या भागांमध्ये राहणाऱ्या महिलांचे बाहेरील जग पुरुषांच्या हिशेबानुसार साकारले गेल्याचे मानणे आहे. याचमुळे त्यांनी जंगलामध्ये स्वत:चे एक असे ठिकाण वसविले आहे, जेथे केवळ महिलांचे राज्य चालते. येथे कुठलाच पुरुष बॉस नाही आणि कुणी पुरुष नियम तयार करणारा नाही. येथे राहणाऱ्या महिला कुणावर निर्भर नाहीत. त्या स्वत: कुऱ्हाड उचलून लाकडं तोडतात, भाज्या उगवतात आणि स्वत:च्या घराची दुरुस्तीही करतात. सौरऊर्जेपासून वीज निर्मिती आणि पाण्याची व्यवस्था करण्याचे कौशल्यही त्यांना प्राप्त आहे.
समानतेचा अनोखा नियम
महिलांच्या या समाजात कुणीच छोटे किंवा मोठे नसते. जर कोणता निर्णय घ्यायचा असेल, उदाहरणार्थ नवा सदस्य कोण असेल किंवा हिवाळ्यासाठी अन्नधान्य कुठून येणार याचा निर्णय घेण्यासाठी सर्व महिलांची सहमती आवश्यक आहे. जोपर्यंत प्रत्येक महिला होकार देत नाही तोवर कुठलेच काम होत नाही. येथील नियम अत्यंत कठोर ओहत. अनेक ठिकाणी फोन नेणे किंवा छायाचित्रणास मज्जाव आहे. येथे राहणाऱ्या महिलांना बाहेरील जगाच्या हस्तक्षेपासून दूर एक सुरक्षित दिलासा मिळतो.
कोण येथे राहू शकते?
महिलांच्या या अनोख्या समाजात राहण्यासाठी भाडे नव्हेतर स्वत:चा वेळ आणि मेहनत द्यावी लागते. प्रारंभी तेथे महिला अतिथी म्हणून जाते, तेथील मेहनतयुक्त जीवन पसंत पडल्यास आणि जुन्या सदस्यांनी पसंत केल्यास महिलेला ‘सिस्टरहुड’चा हिस्सा होता येते.
सदस्यत्व अन् वास्तव्याचे कठोर नियम
या समुदायांमध्ये सामील होणे एखाद्या गेस्ट हाउसमध्ये वास्तव्यासारखे सरळ नाही. येथे अत्यंत कठोर प्रक्रिया अवलंबिली जाते.
अतिथीपासून रहिवासीपर्यंत : इच्छुक महिलांना प्रथम व्हिजिटर म्हणून यावे लागते. जर तेथे राहणाऱ्या जुन्या सदस्य तिच्या विचारसरणीशी संतुष्ट झाल्या तरच तेथे राहण्याची अनुमती मिळते.
श्रम हेच जीवन आहे : येथे ऐशोआरामाला स्थान नाही. प्रत्येक सदस्याला शारीरिक श्रम करावे लागतात. हिवाळ्यासाठी लाकडं जमविणे किंवा पिकाची देखभाल करावी लागते.
डिजिटल डिटॉक्स : अनेक वसाहतींमध्ये बाहेरील जगाशी संपर्क अत्यंत कमी आहे. कॅमेरा आणि सोशल मीडियावर बंदी आहे. यामुळे समुदायाची गोपनीयता कायम राहते. नो मेन पॉलिसी येथील सर्वोच्च कायदा आहे.
वर्तमान स्थिती..
वर्तमानात तेथे स्थायी रहिवाशांची संख्या मर्यादित आहे, जी जवळपास 50-100 दरम्यान आहे. परंतु वार्षिक कार्यशाळा आणि लँड ट्रस्ट कार्यक्रमांदरम्यान पूर्ण जगातून हजारो महिला येथे पोहोचतात. अनेक वृद्ध महिला आजही या जमिनींच्या रक्षक आहेत. तर नव्या पिढीच्या युवती आता पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने येथे जोडल्या जात आहेत. आर्थिक टंचाई आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक वस्ती बंद झाल्या, तर ज्या शिल्लक आहेत, त्या लिव्हिंग म्युजियमप्रमाणे आहेत. हे ठिकाण अशा महिलांसाठी प्रेरणा आहे, ज्या पर्यायी आणि न्यायपूर्ण समाजाचे स्वप्न पाहतात.