फटाके फोडण्यासाठी रात्री दोन तासांचा वेळ
वन-पर्यावरण खात्याकडून मार्गदर्शक सूचना केवळ ‘ग्रीन व्रॅकर्स’ना परवानगी : रात्री 8 ते 10 या वेळेतच मुभा
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
वन आणि पर्यावरण खात्याने राज्यातील दिवाळी उत्सवादरम्यान होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात केवळ पर्यावरणपूरक हिरवे फटाके (ग्रीन क्रॅकर्स) फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे फटाके केवळ रात्री 8 ते 10 या वेळेत फोडण्याची मुभा देण्यात आली आहे.
वन आणि पर्यावरण मंत्री रामलिंगा रे•ाr यांनी यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. दिवाळीदरम्यान केवळ अधिकृत हिरवे फटाके फोडण्यास परवानगी असेल. न्यायालयाच्या आदेशानुसार, फटाके फोडण्यासाठी रात्रीच्या वेळी दोन तास वेळ निश्चित करण्यात आला आहे.
दिवाळीच्या काळात, नागरिकांना आणि विक्रेत्यांना केवळ ग्रीन क्रॅकर्स वापरण्याची किंवा विक्री करण्याची परवानगी आहे. प्रत्येक फटाक्यांच्या पाकिटावर अधिकृत ‘ग्रीन क्रॅकर’ लोगो आणि ‘क्यूआर कोड’ असावा, याबाबत पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांनी खातरजमा करावी. ज्या फटाक्यांवर हे चिन्ह किंवा कोड नसेल, ते त्वरित जप्त केले जातील.
फटाक्यांच्या गोदामांवर देखरेखीसाठी विशेष कृती दल
प्रतिबंधित फटाक्यांची विक्री आणि साठवणूक रोखण्यासाठी, एक विशेष कृती दल स्थापन केले जाईल. या पथकात अग्निशमन विभाग, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरोग्य अधिकारी, तहसीलदार, पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. फटाक्यांच्या गोदामांची तपासणी केली जाईल. तिथे प्रतिबंधित फटाके बेकायदेशीरपणे साठा केल्याचे आढळले, तर संपूर्ण गोदामाला टाळे ठोकले जाईल तसेच जबाबदार व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.
संवेदनशील क्षेत्रांत कडक निर्बंध
न्यायालयाच्या निर्देशानुसार, नागरिकांना केवळ रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी आहे. या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. याशिवाय, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि इतर संवेदनशील क्षेत्रांच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फटाके फोडताना लहान मुले, वृद्ध व्यक्ती, तसेच प्राणी किंवा पक्ष्यांना कोणताही त्रास होणार नाही किंवा त्यांना इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चेकपोस्टवर तपासणी
इतर राज्यांतून प्रतिबंधित फटाक्यांची राज्यात होणारी बेकायदेशीर आवक रोखण्यासाठी, वाणिज्य कर विभाग आणि परिवहन खात्याद्वारे चेकपोस्टवर करडी नजर ठेवली जाईल. अनधिकृतपणे फटाक्यांची वाहतूक करणारी वाहने आणि त्यातील माल, दोन्ही गोष्टी घटनास्थळावरच जप्त करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
