दोन दिवसांच्या बाजाराच्या तेजीला बुधवारी ब्रेक
सेन्सेक्स 426 अंकांनी नुकसानीत : फार्मा निर्देशांक घसरणीत
मुंबई :
दिवाळीत दोन दिवस सलग तेजीत राहिलेला शेअर बाजार बुधवारी मात्र घसरणीसोबत बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांकात 426 अंकांची घसरण दिसून आली.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 426 अंकांनी घसरत 79,942 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 126 अंकांच्या घसरणीसोबत 24340 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 19 समभाग घसरणीत आणि 11 समभाग तेजीत राहिले होते. तर दुसरीकडे निफ्टीतील 50 समभागांपैकी 31 कंपन्यांचे समभाग घसरणीत होते तर उर्वरीत 19 कंपन्यांचे समभाग मात्र तेजीत पाहायला मिळाले. एनएसईवर सर्व क्षेत्रांच्या निर्देशांकाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास सर्वाधिक घसरणीत वित्त सेवा निर्देशांक व फार्मा निर्देशांक राहिला होता. रिलायन्स इंडस्ट्रिज, आयटीसी, लार्सन आणि टुब्रो तसेच अदानी पोर्टस् यांचे समभाग तेजीत होते. तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग मात्र घसरणीत होते.
आशियाई बाजारात जपानचा निक्केई 0.96 टक्के तेजीसोबत कार्यरत होता. तर कोरीयाचा कोस्पी 0.92 टक्के वाढीसोबत आणि चीनचा शांघाई कम्पोझीट मात्र 0.61 टक्के नुकसानीसह बंद झाला. 29 ऑक्टोबरला अमेरिकेतील डोव्ह जोन्स 0.36 टक्के घसरणीसह तर नॅसडॅक 0.78 तेजीसोबत बंद झाले होते. विदेशी गुंतवणूकदारांनी 29 ऑक्टोबरला 16057 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले आहेत. तर याचदरम्यान देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 12823 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केल्याची माहिती एनएसईकडून देण्यात आली आहे. मंगळवारी सेन्सेक्स 363 अंकांच्या तेजीसोबत 80369 स्तरावर तर निफ्टी 127 अंकांनी वाढत 24466 च्या स्तरावर बंद झाला होता. ट्रान्स्पोर्ट, कंन्स्ट्रक्शन, ऑईल अँड गॅस या क्षेत्रात कार्यरत कंपनी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा आयपीओ 29 ऑक्टोबर रोजी शेवटच्या दिवशी 2.73 पट सबस्क्राइब झाला.