For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थेट पाईपलाईन योजनेला वाकडे वळण

04:42 PM Jan 30, 2025 IST | Radhika Patil
थेट पाईपलाईन योजनेला वाकडे वळण
Advertisement

कोल्हापूर / संतोष पाटील : 

Advertisement

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना ही शहरवासीयांचे मागील चार दशकांचे स्वप्न निधी असूनही गेल्या दहा वर्षात राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे कासवछाप बनली. अथक प्रयत्नाने योजना सुरू झाली, मात्र सलग महिनाभरही यातून थेट पाणी आले नसल्याचे वास्तव आहे. कधी वीज पुरवठ्यात अडचण तर कधी व्हॉल्वची गळती, तर कधी पाईपलाईनची गळती आता सहा महिन्यातच उपसा यंत्रणाच बंद पडल्याने योजनेनं दम टाकला आहे. योजना कोणी आणली आणि राजकीय श्रेय कोणाचे यात शहरवासीयांना रस नाही. पाचशे कोटी रुपयांची योजना विनाअडथळा सुरू राहावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. यापूर्वी राजकारणाचे आणि आता नियोजनाला वाकडे वळण लागल्याने थेट पाईपललाईन योजनेचं भवितव्य अंधारामय झाल्याची स्थिती आहे. ही योजना विनासायास सुरू ठेवणे ही प्रशासनाची कसोटीचा काळ ठरणार आहे.

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेनं राज्यात चार वेळा सत्तांतराचा अनुभव घेतला. मात्र, मागील दहा वर्षात तेच आरोप आणि योजना रेंगाळल्याची तीच ती कारणे शहवासीयांच मनोरंजन केले. या काळात ना भ्रष्टचाराचा पर्दाफाश झाला ना योजनेला गती आली. नियोजनाचा अभावाने सुरू केलेली ही योजना शहरवासीयांच्या बोकांडीवर बसते की काय अशी अवस्था आहे. योजना सुरू झाल्यापासून अढथळ्यांची मालिका सुरू आहे. महापुरात इतर उपसा यंत्रण कोलमड्यानंतर योजनेच्या माध्यमातून शहराला अखंड पाणी पुरवठा होईल, ही आशा सपशेल फोल ठरली होती. वीज पुरवठा यंत्रणा कोलमडल्याने योजना याकाळात बंद राहिली. यानंतर कधी व्हॉल्वची गळती, तर पाईपलाईन फुटल्याने योजना बंद राहिली. आता दहा वर्षापूर्वी खरेदी केलेली उपसा यंत्रणा बंद पडली आहे. सध्या जुनी उपशा यंत्रणा बंद पडली. भविष्यात पाईपलाईन खराब होण्याचे प्रमाणही वाढू शकते. नियोजनाच्या अभावाने योजना पुढे सरकत गेल्याचा परिणाम दृष्य स्वरुपात जाणवू लागला आहे.

Advertisement

  • पारदर्शकतेचा अभाव

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना दहा-बारा वर्षापासून कोल्हापूरचे राजकीय व सामाजिक स्वास्थ बिघडविणारी ठरत आहे. योजनेबाबत गेल्या काही वर्षापूर्वी आरोप- प्रत्यारोपांचा फैरी झडण्यास सुरुवात झाल्यानंतर योजनेच्या कामाची सध्यस्थिती व कामाचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे ठरले होते. जेणेकरून योजनेबाबत संभ्रम निर्माण होणार नाही. मात्र, 31 डिसेंबर 2015नंतर योजनेची कामाची प्रगती नेमकी काय झाली? हे संकेतस्थळावर आलेच नाही.

  • आठ वर्षे; साडेपाच कोटींचा दंड

युआयडीएसएसएमटी अंतर्गत 27 डिसेंबर 2013ला योजना मंजूर झाली. 423 कोटी रुपयांची योजना यांनतर निवीदा प्रक्रियेत अडकली. डिएसआर नुसार वाढीव खर्च देण्यावरुन ठेकेदारांनी योजनेकडे पाट फिरविली. फेरनिवीदेनंतर हैदराबाद येथील जीकेसी प्रोजेक्टस् प्रायव्हेट लिमिटेडला 488 कोटी रुपयांची निवीदा मंजूर झाली. 22 ऑगस्ट 1014ला कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. पुढील 27 महिन्यात काम पूर्ण करण्याचे ठरले. मागील आठ वर्षानंतर ठेकेदाराला साडेपाच कोटींचा दंड ठोठावला होता. यावरुन योजनेची गती लक्षात येते. दर्जा तपासणी हा तर खूप लांबचा विषय होता.

  • जबादारी कोणाची ?

कामाची निवीदा, जिल्हापरिषद, सार्वजानिक बांधकाम विभाग, वन विभाग व पाटबंधारे विभागाच्या परवानगीचे सोपस्कारात योजना अडकली. आजी-माजी सत्ताध्रायांनी राजकारण आणि तेच-ते उजळत न बसता योजनेच्या मंजूरीची जबादारी घेण्याची गरज होती. दरम्यान, वापरात येणारी पाईप लॉन्गीट्युडनल की स्पायरल हा पाईप वापरावरुन वाद पेटला आणि शमला. शेळेवाडी येथे 25 लाख रुपयाच्या लोखंडी साकवसाठी एक कोटी साठ लाख रुपये लमसम रक्कम ठरवून ठेकेदाराला बिल अदा झाल्यानंतर एप्रिल 2017 मध्ये योजनेबाबत पुन्हा संशय निर्माण झाला. सल्लागार कंपनी युनिटी कन्सटन्सीच्या कामाच्या पध्दतीवर जोरदार आक्षेप घेतले गेले. मार्च 2020 मध्येतर शिवसेनेने काम बंद पाडले. कामाचा दर्जा, सल्लागार कंपनीच्या कामाची पध्दती, रेंगाळलेले काम, तटलेल्या परवानग्या आदीबाबत मनपाच्या सभागृहात व बाहेर अनेकवेळा आरोप झाले. आता उपशा यंत्रणा बंद पडल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

  • संशयाचे ढग कायम

त्रृटीबाबत 2017साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. यावर मग सरकार तुमचेच होते? कारवाई का केली नाही? यावर उत्तर देताना योजना बंद पाडत असल्याचा आरोप होईल म्हणून गप्प बसलो, असा खुलासा झाला. योजनेचा संथपणा, त्रृटी, खर्च, आदीबाबत आजी माजी राजकारण्यांनी पुढाकार घेऊन लेखाजोखा मांडावा. अन्यथा योजना पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे कवित्व सुरू राहणार आहे. यातून जे नुकसान होणार ते शहरवासीयांचे होणार आहे.

Advertisement
Tags :

.