For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शस्त्रसंधी झाली...आणि मोडलीही!

06:58 AM Jun 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
शस्त्रसंधी झाली   आणि मोडलीही
Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शस्त्रसंधी प्रस्ताव दोन्ही देशांनी केला मान्य, तथापि एकमेकांवर केले मोठे हल्ले

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

दोन्ही देश आता शांततेने राहतील आणि वैभव आणि समृद्धीस प्राप्त होतील, अशी शुभेच्छाही त्यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या माध्यमावरुन दिली. मात्र, त्यानंतर तीन तासांमध्येच पुन्हा इराणने इस्रायलवर सहा क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. इस्रायलनेही या हल्ल्याला तीव्र प्रत्युत्तर पुढच्या दोन तासांमध्ये दिले. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र हल्ला केला. तेहरानच्या अनेक भागांमध्ये त्यामुळे मोठे स्फोट होऊन आगी लागल्याचे वृत्त आहे. परिणामी शस्त्रसंधी अल्पजीवी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत.

Advertisement

दोन्ही देशांची मान्यता

इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी ट्रम्प यांच्या घोषणेनंतर शस्त्रसंधी मान्यता असल्याचे संदेश दिले आहेत. ट्रम्प  यांच्या घोषणेनंतर काही काळ दोन्ही देशांनी एकमेकांवर करण्यात येणारे हल्ले थांबविले होते. तथापि, नंतर काही वेळातच इराणने इस्रायलवर काही क्षेपणास्त्रे डागल्याने इस्रायलने संताप व्यक्त केला. तसेच इराणवर शस्त्रसंधीचा भंग केल्याचा आरोप केला. इराणच्या या उद्दामपणाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा करतानाच इस्रायलचे नेते बेंजामिन नेत्यान्याहू यांनी तेहरानला भाजून काढा, असा आदेश आपल्या सेनादलांना दिल्याने इस्रायलच्या सेनेनेही काही वेळातच इराणवर प्रतिवार केला आहे.

अचानकपणे शस्त्रसंधीची घोषणा

सोमवारी रात्री उशिरा, अर्थात भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यामुळे इस्रायल आणि इराणच नव्हे, तर अमेरिकेतील लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवरांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. ही घोषणा ते इतक्या लवकर करतील, अशी कोणत्याची संबंधिताची अपेक्षा नव्हती. मात्र, ट्रम्प यांनी प्रथम इस्रायलचे नेते नेतान्याहू यांना याची सूचना दिली होती. त्यानंतर त्यांनी इराणच्या नेत्यांनाही हा संदेश दिला. मात्र, त्यांची अधिकृत मान्यता येण्याच्या आतच त्यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली, असे वृत्त पसरले होते. तथापि, त्यांच्या घोषणेनंतर काही वेळातच प्रथम इस्रायलने त्यांचा प्रस्ताव मान्य असल्याचे स्पष्ट केले. नंतर, जवळपास तीन तासांनी इराणनेही तो मान्य केला. त्यामुळे काही काळासाठी हल्ले थांबले होते.

ट्रम्प यांचा शस्त्रसंधी कार्यक्रम

आपल्या शस्त्रसंधी घोषणेनंतर सहा तासांमध्ये इराण प्रथम इस्रायलवर केले जाणारे हल्ले थांबविणार आहे. त्यानंतर 12 तासांनी इस्रायल इराणवर करत असलेले हल्ले थांबविणार आहे. तसेच त्यानंतर सहा तासांनी हा संघर्ष पूर्णत: संपणार आहे. दोन्ही देश तशी घोषणा करतील, असा 24 तासांचा कार्यक्रम डोनाल्ड ट्रम्प  यांनी घोषित केला होता. तसेच ही शस्त्रसंधी प्रदीर्घ काळ चालेल आणि दोन्ही देश तिचा मान ठेवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

पहाटेपर्यंत बॉम्बफेक होतीच

शस्त्रसंधीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतरही मंगळवारी पहाटेपर्यंत दोन्ही देश एकमेकांवर बॉम्बआािण क्षेपणास्त्रांचा वर्षाव करीतच होते. त्यानंतर काही काळ दोन्ही आघाड्यांवर शांतता दिसत होती. पण नंतर पुन्हा इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. या माऱ्यात 3 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या इस्रायलने इराणला तीव्र हल्ल्यांचा इशारा दिला. इस्रायलच्या बीरशेबा या शहरावर इराणची चार क्षेपणास्त्रे कोसळली आहेत. त्यामुळे या शहरातील तीन इमारतींची मोठी हानी झाली आहे. इस्रायलने अमेरिकेला या नव्या हल्ल्यांसंबंधी माहिती दिली आहे. इस्रायलने हे संपूर्ण अभियान कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला न करता संयमाने चालविले, असेही प्रतिपादन इस्रायलकडून करण्यात आले.

अभियानाची उद्दिष्ट्यो पूर्ण

इराणच्या अणुकार्यक्रमाला रोखणे आणि अणुबॉम्ब बनविण्याची इराणची क्षमता नष्ट करणे हे अमेरिकेच्या आणि आमच्या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट्या होते. 12 दिवसांच्या या अभियानात ते पूर्ण झाले आहे. इराण अणुबॉम्ब बनविण्याच्या अगदी जवळ आला होता. तो आमच्या अभियानामुळे अनेक वर्षे मागे पडला आहे. इराणला कधीही अणुबॉम्ब बनवू न देणे हे अमेरिकेचे आणि आमचे ध्येय आहे. कारण, इराणने इस्रायलला संपविण्याची आणि ज्यूंच्या रक्ताचा सडा घालण्याची प्रक्षोभक भाषा अनेकदा केली आहे. म्हणून इराणचा अणुबॉम्ब हा इस्रायलच्या अस्तित्वासाठीच धोका ठरु शकतो. त्यामुळे त्या देशाला अणुबॉम्ब बनवू दिला जाता कामा नये, असे आमचे म्हणणे आहे, असे इस्रायलकडून स्पष्ट केले गेले आहे.

शस्त्रसंधी होण्यापूर्वी इस्रायल आणि इराण यांच्यात सलग 12 दिवस सशस्त्र संघर्ष होत होता. प्रथम 12 जूनच्या मध्यरात्री इस्रायलच्या 200  हून अधिक युद्ध विमानांनी अचानकपणे इराणचे अणुतळ आणि लष्करी आस्थापने यांच्यावर प्रचंड हल्ला चढविला. इराणचे तीन अणुतळ आणि 12 लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. हा इराणसाठी मोठा धक्का होता. नंतर इराणने इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर सातत्याने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा मारा चालविला. तथापि, इस्रायलच्या म्हणण्यानुसार इराणची 95 टक्के क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स आकाशातच नष्ट करण्यात आले. त्यामुळे इस्रायलची विशेष हानी झाली नाही. इराणकडे कोणतीही वायुसंरक्षण व्यवस्था नसल्याने इस्रायलचे एकही विमान किंवा क्षेपणास्त्र पाडण्यात त्याला यश आले नाही. अमेरिकेने इराणच्या महत्वाच्या अणुतळांवर हल्ला करुन या संघर्षात नवव्या दिवशी प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी शस्त्रसंधी झाली.

टिकावूपणासंबंधी शंका

इस्रायल आणि इराण यांच्यात ट्रंप यांनी शस्त्रसंधी घडवून आणली असली तरी ती किती काळ टिकून राहील, यासंबंधात शंका व्यक्त केल्या जात आहेत. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी तोडू नये, अशी मी त्यांना विनंती करतो, असा संदेशही ट्रंप यांनी प्रसिद्ध केला. तथापि, पुन्हा इराणची क्षेपणास्त्रे इस्रायलवर कोसळली. आता इस्रायलने इराणच्या या हल्ल्याला म्हणल्याप्रमाणे चोख प्रत्युत्तर दिल्याने पुन्हा संघर्ष भडकणार हे निश्चित मानले जात आहे.

अणुकार्यक्रम होतच राहणार

शस्त्रसंधी झाली असली आणि अमेरिकेने आमचा अणुकार्यक्रम बंद पाडू अशी धमकी दिली असली, तरी आमचा अणु कार्यक्रम पुढे चालविला जाणार आहे, अशी स्पष्टोक्ती इराणने केली. अमेरिकेने अणुतळांवर हल्ले पेले असले, तरी आमच्या अणुसंपृक्तीकरणाच्या तंत्रज्ञानाला धक्का पोहचलेला नाही. आम्ही ही प्रक्रिया पुढे चालविणारच आहोत, असे वक्तव्य इराणच्या अणुशक्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष मोहम्मद इस्लामी यांनी केले आहे. आमच्या कार्यक्रमांमधील अडथळे आणि अडचणी दूर करण्यासाठी योजना सज्ज आहे, असाही दावा त्यांनी केला.

अद्याप झालेला नाही ‘करार’

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली असली, तरी अद्याप तसा कोणताही लेखी किंवा अधिकृत करार झालेला नाही, अशी माहिती इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरघाची यांच्याकडून देण्यात आली आहे. सध्या जे होत आहे, ती केवळ अस्थायी व्यवस्था आहे. मात्र, शस्त्रसंधीला इराणची मान्यता आहे. आता या शस्त्रसंधीचे स्थैर्य इस्रायलवर अवलंबून आहे. आम्हाला शांतता हवी आहे, असेही इराणच्या प्रशासनाचे स्पष्ट म्हणणे होते. आम्ही इस्रायलच्या विरोधात हल्ले थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची सविस्तर अधिकृत माहिती नंतर दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.