सालुमरद तिम्माक्का, भैरप्पांना श्रद्धांजली
विधानसभेत दिवंगतांना श्रद्धांजली वाहून पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब
बेळगाव : वृक्षमाता शतायुषी सालुमरद तिम्माक्का यांच्या नावे पुरस्कार व प्रसिद्ध कादंबरीकार एल. एस. भैरप्पा यांचे म्हैसूर येथे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी विधानसभेत केली. सोमवारी सकाळी सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार, लेखक, साहित्यिक व वृक्षमातेला श्रद्धांजली वाहून मंगळवारी सकाळी 10 पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.
सोमवारी सकाळी 11.15 वाजता पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली. वंदे मातरम् गीतानंतर सभाध्यक्ष यु. टी. खादर फरीद यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. त्यानंतर विद्यमान आमदार एच. वाय. मेटी, माजी आमदार आर. व्ही. देवराज, शिवशरणाप्पा पाटील, वृक्षमाता सालुमरद तिम्माक्का, प्रसिद्ध कादंबरीकार एस. एल. भैरप्पा, कन्नड चित्रपट हास्य अभिनेते एम. एस. उमेश यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत सालुमरद तिम्माक्का यांच्या नावे दरवर्षी पुरस्कार देण्याची घोषणा केली. याबरोबरच एस. एल. भैरप्पा यांचे स्मारक उभारण्याची घोषणाही करण्यात आली. राज्य सरकारने सालुमरद तिम्माक्का या 114 वर्षांच्या होत्या. त्यांना मुले नव्हती. 4 हजार झाडे लावून त्यांनी त्यांचा सांभाळ केला. त्या इस्पितळात होत्या त्यावेळी आपण त्यांची भेट घेतली. त्यांनी एक पत्र दिले. बेलूर येथे वस्तुसंग्रहालय उभारण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनीही वृक्षमाता सालुमरद तिम्माक्का, आमदार एच. वाय. मेटी यांच्यासह दिवंगतांचे गुणगान करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. जात, धर्मापलीकडे तिम्माक्का यांचे व्यक्तिमत्त्व पोहोचले होते. तर एस. एल. भैरप्पा हे एक स्पष्ट वक्ते, श्रेष्ठ साहित्यिक होते. त्यांनी केवळ कर्नाटकच नव्हे तर आपल्या कादंबरींनी जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तिम्माक्का व भैरप्पा यांचे नाव अजरामर करण्यासाठी सरकारने स्मारक उभारण्याची मागणी केली.
विधानसभेत गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर, मंत्री एच. के. पाटील यांच्यासह आमदार शशिकला जोल्ले, जी. टी. पाटील, सिद्धू सवदी, एम. पी. कृष्णाप्पा, एच. सी. बालकृष्ण, एच. के. सुरेश, पी. एम. नरेंद्रस्वामी, श्रीनिवासय्या एन., सी. के. राममूर्ती, महेश टेंगिनकाई, रुपकला एम., आदींनीही दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली. बहुतेकांनी सालुमरद तिम्माक्का, एस. एल. भैरप्पा, एच. वाय. मेटी यांच्यासह दिवंगतांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचे स्मरण केले. दुपारी 1.45 वाजता सभागृहात एक मिनिट मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. एच. वाय. मेटी हे सध्याच्या सभागृहाचे आमदार होते. त्यामुळे श्रद्धांजलीनंतर मंगळवारी सकाळपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.