For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅम्पमध्ये घरावर झाडाची फांदी कोसळली

10:48 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅम्पमध्ये घरावर झाडाची फांदी कोसळली
Advertisement

किराणा दुकानाचे नुकसान : सुदैवाने महिलेचा जीव वाचला

Advertisement

बेळगाव : घरात काम करणाऱ्या महिलेवर झाडाची फांदी कोसळून पडूनही केवळ दैव बलवत्तर म्हणून  तिचा जीव वाचला. कॅम्प येथील इंडिपेंडंट रोडवर बुधवारी सकाळी ही घटना घडली. झाडाची एक फांदी किराणा दुकानात घुसली. सकाळी दुकान बंद होते, त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.इंडिपेंडंट रोडवरील मंगेश होंडाच्या मागे गोजे बिल्डिंग येथे वडाच्या झाडाची फांदी बुधवारी सकाळी कोसळली. फांदी बाजूच्या कौलारू घरावर कोसळल्याने घराचे नुकसान झाले. तर छत कोसळून फांदीचा काही भाग घरासोबतच बाजूच्या किराणा मालाच्या दुकानातही घुसला.

यामध्ये घरामध्ये राहणाऱ्या विजया माणगावकर यांच्या डोक्याला दुखापत झाली. केवळ सुदैवानेच त्यांचा जीव वाचला. बाजूलाच सुनील गोजे यांचे किराणा दुकान असून फांदी कोसळल्याने त्यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. झाड कोसळल्याची माहिती कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांना देताच कर्मचारी घटनास्थळी पोहोचून फांदी बाजूला करण्यात आली. परंतु, या झाडामुळे धोका कायम आहे. दोन महिन्यांपूर्वी याच झाडाची फांदी पडून बाजूच्या शोरूममधील कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे नुकसान झाले होते. तसेच घराशेजारीच बालवाडी असून या ठिकाणी लहान मुलांचा वावर असतो. त्यामुळे झाडाचा धोका वाढला आहे.

Advertisement

कॅन्टोन्मेंटसह वनविभागाचे दुर्लक्ष

धोकादायक वडाचे झाड काढावे, यासाठी वर्षभरापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्ड व वनविभागाकडे रितसर तक्रार करण्यात आली आहे. धोकादायक असतानाही झाड काढण्याकडे दोन्ही विभागांचे दुर्लक्ष झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीही कॅन्टोन्मेंट बोर्डला झाड काढण्याबाबत निवेदन दिले आहे. परंतु, कॅन्टोन्मेंटच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

Advertisement
Tags :

.