परंपरा विधायक कार्याची, शान शिवाजी पेठेची !
विद्यार्थी कामगार मंडळ, शिवाजी पेठ
कोल्हापूर / साजिद पिरजादे :
समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या मंडळांमध्ये शिवाजी पेठेतील विद्यार्थी कामगार मंडळ अग्रभागी आहे. सध्या मराठी शाळा बंद पडत आहेत. त्याबाबतचा जिवंत देखावा या मंडळाने साकारला आहे. 'परंपरा विधायक कार्याची, शान जपतो आम्ही शिवाजी पेठेची" हे ब्रीद वाक्य घेऊन हे मंडळ काम करत आहे.
१९६० मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळामध्ये कायमस्वरूपी फायबरची गणेश मूर्ती वापरली जाते. त्यातून पर्यावरणाचा हास होणार नाही, याची काळजी घेतली जाते. मंडळात गणपतीसाठी कोणत्याही प्रकारचे दागिने स्वीकारले जात नाहीत. त्याऐवजी तुम्ही शालेय साहित्य द्या, असे आवाहन केले जाते. नारळाच्या तोरणाऐवजी वह्या पुरतकांचे तोरण तयार करण्यात येते.
मंडळाच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले जाते. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मंडळातर्फे स्वतंत्र अभ्यासिकेची सुविधा देण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किंवा सेवानिवृत्त जवानांच्या हरते ध्वजवंदन होते. शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला रपर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन होते.
या मंडळात 'दान पेटी" ऐवजी 'विधायक पेटी ठेवली गेली आहे. त्यातील पैसे लोककल्याणाच्या कामासाठी खर्च केले जातात. अवनी, मातोश्री, हर्षनील बाल संकुल, श्रावणी केअर सेंटर अशा संस्थांना पेटीतील रक्कम दान केली जाते. मंडळाच्यावतीने यावर्षी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. तो म्हणजे मराठी शाळा वाचवा. मराठी शाळा सर्वसामान्य लोकांसाठी किती महत्वाची आहे, याचा जिवंत देखावा साकारण्यात आला आहे. नुकत्याच माधुरी हत्तीच्या प्रकरणात कोल्हापूरचे सर्व लोक रस्त्यावर उतरले. त्याच पद्धतीने मराठी शाळा वाचवण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा, असे त्या देखाव्यातून सुचवण्यात आले आहे.
गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडली जाते. कोरोनाच्या काळामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः फिरून पोलिसांना नाश्ता वाटप केले. पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मंडळातर्फे खाऊवाटप करण्यात येते.