परंपरा दिडशे वर्षांची...सन्मान जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांचा! तुकाराम माळी तालमीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष
तालमीसाठी राबलेल्या जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मानपत्राने होणार गौरव, गणेशोत्सवात ऋणानुबंध जोपासणारा उपक्रम
संग्राम काटकर कोल्हापूर
अनंत चतुर्दशीला कोल्हापूरात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रथम मानाचा गणपती हे नुसतं उच्चारलं तरी मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीमच नाव मनात येते. तालमीने पुर्वीच्या काळातील गणेशोत्सवात केलेल्या सजिव, तांत्रिक देखाव्यांनी गणेशभक्तांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यात्यावेळच्या घटनांचे प्रतिबिंबही देखाव्यात देखावले आहे. या आणि अशा अनेक समाजाभिमुख देखावे करण्याबरोबर तालमीच्या कार्यात झोकून दिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांबद्दल यंदाच्या गणेशोत्सवात कृतज्ञता व्यक्त होणार आहे. यानिमित्ताने तालमीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व निधन पावलेल्या कार्यकर्त्यांच्या वंशजांचा जणू स्नेहमेळावाच रंगणार आहे.
गेल्या जुलै महिन्यात तुकाराम माळी तालीमने शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे. त्याचे औचित्य साधून तालमीत कार्यकर्ते म्हणून सक्रीय असलेल्या सहाव्या व सातव्या पिढीने हा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. यातून तालमीची स्थापनेपासून आजपर्यंतच्या जिताजागत्या इतिहासाच्या आठवणी उफाळून येणार आहेत. सध्या तालमीचे कार्यकर्ते जुन्या काळातील कार्यकर्त्यांसह हयात नसलेल्या कार्यकर्त्यांच्या वंशजांची माहिती संकलित करत आहेत. या ना त्या कारणांनी तालीम परिसर सोडून बाहेर रहायला गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यासह हयात नसलेल्या कार्यकर्त्यांच्या वंशजांनाही स्नेहमेळाव्याचे निमंत्रित मिळणार आहे. सर्वांना एकत्र आणणाऱ्या या स्नेहमेळाव्याच्या आयोजनामागे तालमीच्या विद्यमान कार्यकर्त्यांत जुन्या कार्यकर्त्यांनी ऊजवलेले संस्कार स्पष्टपणे दिसत आहेत. या संस्कारातून तालमीने जे अनुभवले त्यालाही स्नेहमेळाव्यात उजाळा मिळणार आहे.
सध्याच्या मंगळवार पेठ, गोखले कॉलेजनजिकच्या जागेत 1875 साली स्थापलेल्या तुकाराम माळी तालीममागे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक हे विचारही ऊजवले होते. गणेशोत्सवातील देखावेही समाजाभिमुखच असावेत अशी प्राईम कंडीशन त्या काळातील ठेवली होती. त्यानुसार 1970 ते 2000 या दरम्यान, केलेल्या देखाव्यांपैकी राजर्षी शाहू महाराजांची अस्वलाशी झुंज, चांगदेव-संत ज्ञानेश्वर यांची भेट, भक्त प्रल्हादाचा कडेलोट, इंदिरा गांधींचा वीस कलमी कार्यक्रम, संत गुरुनानक, दारूबंदी, स्वामी विवेकानंद स्मारक, छत्रपती शिवरायांनी गद्दारांना केलेले शासन, नेत्रदान-देहदान-रक्तदान, हुंडाबळी, भारत काल आणि आज अशा असे सजीव व तांत्रिक देखावे तालमीच्या जुन्या जाणत्यांच्या आजही स्मरणात आहेत. त्या त्या काळातील घडामोडीचा परामर्श दाखवलेल्या अनेक देखाव्यांना जनसेवा दलाने प्रथम, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरवले आहे.
तुकाराम माळी तालमीची किर्ती कोल्हापूरसह आजूबाजूच्या परिसरात पसरण्यामागे गणेश विसर्जन मिरवणुक कारणीभूत ठरली आहे. पंचगंगा नदी घाटाकडे जाणाऱ्या विसर्जन मिरवणूकीत शिस्त लागावी म्हणून प्रशासनाने तालमीच्या गणेशमूर्तीला पहिल्या स्थानी उभे करण्याचा मान दिला. 40 ते 45 पूर्वीपासून मिळालेली ही मानाची परंपरा तालमीने आजही जपली आहे. आजही तालमीच्या सजवलेल्या पालखीतील गणेशमूर्तीचे नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पुजन कऊनच विसर्जन विसर्जन मिरवणूक सुऊ केली जात आहे. खासबाग मैदानाजवळ होणाऱ्या या मिरवणूक प्रारंभाच्या सोहळा व त्यामागील शिस्त कोल्हापूकरांसमोर येणार आहे.
चौकट : गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम
एक सामाजिक भान म्हणून तुकाराम माळी तालीमने गणेशोत्सवात विविध उपक्रम राबवण्याचे ठरले आहे. सतत बिघडत चाललेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाईल. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याबरोबर वृद्धाश्रमांना देणगीही देण्यात येईल. समाजात घडत असलेल्या वाईट कृत्यांना डोळ्यासमोर शहर पोलिसांच्या मदतीने शहरात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तालमीकडून लावले येणार आहे.
शिवाजी पोवार (अध्यक्ष : तुकाराम माळी तालीम)
पानसुपारीतून ऋणानुबंध घट्ट करणार
फार पुर्वीपासून गणेशोत्सव आयोजित केल्या जाणाऱ्या पानसुपारीच्या कार्यक्रमाला कोल्हापुरात विशेष महत्व आहे. या कार्यक्रमातून तालमी-तालमीतील ऋणानुंबध आणि आपलेपणा वाढीस लागला आहे. तुकाराम माळी तालमीच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या औचित्यावर खंडीत झालेला पानसुपारीचा कार्यक्रम तालमी आयोजित करत आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण तालीम संस्थांना दिले जाईल.
ऋषिकेश मेथे-पाटील (अध्यक्ष : तालीम शताब्दी सुवर्ण वर्ष उत्सव कमिटी)