एक हजार रुपयांच्या एका बांगड्यामुळे पर्यटकाने गमावला जीव
कळंगुट रॉक शॅकमधील प्रकार, आंध्र प्रदेशच्या भोलारवीचा खून : कर्मचारी, मालकासह चार अटकेत
म्हापसा : कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील एका शॅकमध्ये पर्यटकांना मारहाण करण्याची घटना घडली असून या घटनेत पर्यटक भोलारवी तेजा (28, रा. आंध्र प्रदेश) याचा मृत्यू झाला आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी शॅकच्या तिघा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. शॅकचा मालक फरार झाला होता, मात्र रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली. ही खुनाची घटना मंगळवारी उत्तररात्री 1 ते 2 वाजण्याच्या दरम्यान घडली. पर्यटक जेवण करण्यासाठी या शॅकमध्ये गेले होते. या पर्यटकांना अजून काही पदार्थ हवे होते. परंतु शॅक कर्मचाऱ्यांनी स्वयंपाकघर बंद झाल्याचे सांगितले.
त्यावरून पर्यटकांचा गट आणि शॅकच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. प्रकरण हातघाईवर गेले. शॅकचे कर्मचारी आणि मालकाने या पर्यटकांना दंडुक्याच्या सहाय्याने मारबडव करण्यास सुऊवात केली. मयत भोलारवी याच्या डोक्यावर दंडुक्याचा वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. सर्व जखमींना कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी भोलारवी याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार सदर भांडण फ्राय म्हणजे तळलेल्या बांगड्यावरून झाल्याचे सांगण्यात आले. शॅक नेमके किती वाजता बंद होणार याची माहिती त्या पर्यटकांना देण्यात आली नव्हती.
या पर्यटकांनी तळलेल्या बांगड्याची मागणी केली असता एक हजार ऊपये प्रति बांगडा असे त्यांना सांगण्यात आले. त्यांचे बिल 16 हजार रुपयांच्या आसपास झाले असता या बिलावरून भांडण झाले. एक बांगडा एक हजार कसा? याचा जाब पर्यटकांनी विचारला असता भांडण्यास सुऊवात झाली. त्याचे ऊपांतर हाणामारीत आणि नंतर भोलारवी तेजा याचा खून झाला. घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिस उपअधीक्षक विश्वेश कर्पे व अधीक्षक अक्षत कौशल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी शॅकच्या तिघा कर्मचाऱ्यांना अटक केली असून फरार असलेल्या मालकालाही अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. कळंगुट समुद्रकिनारी भोलारवी तेजा (28, हैदराबाद-आंध्रप्रदेश) या पर्यटकाच्या खून प्रकरणी ‘मरिना शॅक’चे मालक आग्नेल सिल्वेरा (64), त्याचा मुलगा शुबर्ट सिल्वेरा (23), अनिल बिस्ता (24, मूळ नेपाळ), कमल सुनार (23, मूळ नेपाळ) या चौघांना अटक केली आहे.