For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या ऊर्जा स्थैर्याला बळकटी देणारा दौरा!

06:12 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या ऊर्जा स्थैर्याला बळकटी देणारा दौरा
Advertisement

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मॉरिशस येथील नववी हिंद महासागर शिखर परिषद आटोपल्यानंतर लगेच दोन दिवसांचा अरब अमिरातीचा (यूएई) दौरा पूर्ण केला. त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश भारतीयांची सुरक्षा तर होताच शिवाय कतार आणि यूएईसारख्या देशाकडून तेल व गॅसचा पुरवठा नियमित होण्यासाठी करावयाचे नियोजित प्रयत्न हा सुद्धा या भेटीमागचा एक दूरदृष्टीचा उद्देश होता.

Advertisement

अखातामधील इराण-अमेरिका संघर्ष दोन आठवड्याकरता थांबला, पण पुढे अनिश्चिततेची टांगती तलवार अनेक प्रश्न निर्माण करत आहे. विशेषत: भारतासारख्या विशाल खंडप्राय आणि 146 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला ऊर्जा संकटाला सामोरे जात असताना काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आखाती देशांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. हा संपर्क ठेवण्यामागे दोन हेतू आहेत. पहिले म्हणजे तेथे राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा जपणे आणि दुसरे म्हणजे आखातातील मित्र राष्ट्राकडून तेल व गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे, असा आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दि. 12, 13 एप्रिल रोजी युनायटेड अरब अमिरातीचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यातून त्यांनी आखातामधील युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक विकास, सामाजिक भागीदारी मजबूत करण्यासाठी रचनात्मक चर्चा केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी ऊर्जा समस्येवरसुद्धा लक्ष केंद्रित केले होते. मागील वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमिरातीच्या सम्राटाने भारत-यूएई दरम्यानचा व्यापार आगामी काही वर्षात दुप्पट करण्याच्या दृष्टीने संकल्प केला होता. व्यापार गुंतवणूक वाढ तसेच ऊर्जा समस्या आणि सुरक्षा धोरण सुनिश्चिती तसेच परदेशस्थ भारतीयांच्या समुदायाचे कल्याण इत्यादी पैलूंवर त्यांनी या दौऱ्यात चर्चा केली तसेच प्रामुख्याने प्रादेशिक सुरक्षा आणि अन्य आव्हानांना सामोरे जात असताना दोन्ही नेत्यांनी उच्चस्तरीय चर्चा करून मार्ग शोधले तसेच अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान यांची एक विशेष भेटही घेतली व त्यांना पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा संदेश देण्यात आला.

Advertisement

गतिमान दौऱ्याची फलश्रुती

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या यूएई दौऱ्याची फलश्रुती काय असेल, तर प्रामुख्याने पश्चिम आशियात शांतता व स्थैर्य गतिमान करण्यासाठी भारत यांच्या प्रभावी भूमिकांचे गतिवर्धन करण्यात आलेले यश होय. प्रामुख्याने सामाजिक आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी विचारविनिमय केला. अमेरिका-इराण युद्ध विरामानंतर प्रादेशिक स्थैर्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये प्रामुख्याने ऊर्जापुरवठा साखळी मजबूत करणे आणि आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक सुरक्षित करणे या दोन पैलूंवर भर देण्यात आला होता. ऊर्जापुरवठा साखळी मजबूत करणे आणि आंतरराष्ट्रीय जहाज वाहतुकीला चालना देणे, या विषयावर सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये विधायक चर्चा घडून आली. गतवर्षी भारताने 20 बिलियन डॉलर्स तेलाची आयात दुबईकडून केली होती. आता यावर्षी सुद्धा ही आयात वाढणार आहे. त्यामुळे भारतीयांच्या तेलविषयक गरजा गतीने पूर्ण होऊ शकतील.

द्वीपक्षीय संबंधांवर चर्चा

या दौऱ्यात परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यूएईच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करताना द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर विशेषत्वाने चर्चा घडवून आली. व्यापार आणि तंत्रज्ञान तसेच ऊर्जा समस्या, कामगारांचे कल्याण इत्यादींबाबतीत सहकार्य अधिक मजबूत करण्यावर दोन्ही बाजूंनी विशेष प्रकाश टाकण्यात आला. असे करताना सर्वसमावेशक सामरिक भागीदारी विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

भारतीयांच्या सुरक्षा व कल्याणाचा विचार 

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा यूएई दौरा हा भारत आणि युनायटेड अरब अमिरात यांच्यातील द्वीपक्षीय सहकार्यावर भर देणारा मैलाचा दगड ठरला आहे. त्यांनी 40 लाख भारतीय प्रजेच्या सुरक्षेच्या आणि कल्याणाच्या प्रश्नांवर तेथील राज्यकर्त्यांशी चर्चा केली तसेच दुबईतील हिंदू मंदिराला भेट देऊन तेथील कामगारांशीसुद्धा त्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. स्थानिक भारतीय नागरिकांच्या शिष्टमंडळाबरोबर आणि प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करताना त्यांनी त्यांचे प्रश्न समजावून घेतले व ते मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्नही केले आहेत. द्वीपक्षीय सहकार्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि एसएमबी यांच्या समवेत यापूर्वी नवी दिल्लीत झालेल्या चर्चेच्या आधारे पुढील मार्गक्रमण करण्यासाठी ऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, संस्कृती, पर्यटन यांसारख्या क्षेत्रात दोन्ही देशांना कसे पुढे जाता येईल, यावरही विचार करण्यात आला आहे. दोन्ही संबंधांचा विचार करता व्यापार आणि गुंतवणूक दुप्पट करणे, हा एक महत्त्वाचा बिंदू आहे. त्या दृष्टीने सर्वसमावेशक व्यापार उदीम तसेच दोन्ही देशांच्या सुरक्षिततेसाठी सामरिक भागीदारी प्रशिक्षण पुढे नेण्यावर चर्चा करण्यात आली.

प्रामुख्याने सर्वसमावेशक सामरिक भागीदारी हा सुद्धा एक महत्त्वाचा चर्चेचा बिंदू होता. त्यापलीकडे जाऊन भारतीय डायओस्पोराचे कल्याण या अनुषंगाने सुद्धा डॉ. एस. जयशंकर यांनी भारतीय समुदायातील नेत्यांची भेट घेतली आणि अलीकडील तणावाच्या काळातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत त्यांनी विचारविनिमय केला. स्थानिक प्रशासनाने भारतीयांना दिलेला पाठिंबा आणि दाखवलेली सहानुभूती याबाबतीत पंतप्रधान मोदींच्या वतीने त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे विशेष आभार मानले आहेत. राजकीय संपर्क हा दोन्ही देशात मजबूत संबंधाचा कणा असतो तसेच हा संपर्क म्हणजे दोन्ही देशातील मजबूत संबंधांचा आत्मा आहे, हे लक्षात घेऊन मंत्र्यांनी यूएईच्या नेत्यांची भेट घेतली आणि पश्चिम आशियातील शांतता प्रश्नांबाबत बोलणी केली. सामुदायिक संवादाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी तेथील स्थानिक हिंदू मंदिराच्या बांधकाम स्थळाला भेट दिली आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या भावना समजावून घेतल्या.

समारोप

आखातातील सर्व देशांमध्ये यूएई हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे तसेच सामरिक दृष्टीने सुद्धा आता सहकार्याला नवी दिशा प्राप्त होत आहे. सध्या तरी भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्याचे श्रेय या कुशल नेत्याकडे जाते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही कामगिरी सामान्य भारतीयांच्या दृष्टीने निश्चितच स्पृहणीय आणि मोलाची आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या मॉरिशस दौऱ्यातील ही भेट चार दिवसांच्या दौऱ्यातील अंतिम टप्पा होती. त्यामध्ये त्यांनी अरब अमिरातीचे अध्यक्ष तसेच उपपंतप्रधान परराष्ट्रमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून अखंड ऊर्जा पुरवठ्याबाबत बोलणी केली. जयशंकर यांचा दुबई दौरा निर्णायक आणि सकारात्मक फलश्रुती देणारा ठरला आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे कतारकडून भारताला कच्चे तेल, पेट्रोलियम पदार्थ आणि एलपीजी यांचा पुरवठा उत्तम प्रकारे होईल, याची ग्वाही मिळाली आहे. त्यामुळे भारताच्या ऊर्जाविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा दौरा खरोखरच निर्णायक वळण देणारा म्हटला पाहिजे.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.