कुडचडे फसवणूक प्रकरणात एकूण 19 तक्रारी दाखल
प्रतिनिधी / कुडचडे
सेंट्रल बँकेच्या काकोडा शाखेत झालेल्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सेनी कुलासो उर्फ तन्वी वस्त व व्यवस्थापक आनंद जाधव यांच्या विरोधात एकूण 19 तक्रारी कुडचडे पोलीस स्थानकात देण्यात आल्या आहेत. तसेच व्यवस्थापक जाधव याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून प्राप्त झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा नोंद झालेल्या प्रकरणांपैकी रोझालिना कुर्रैय्या यांच्या फसवणुकीच्या प्रकरणातील 18 लाख 45 हजारांचे सोने पोलिसांनी जप्त केले आहे. निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी तपास करताना उपनिरीक्षक अऊण अँड्य्रू यांनी ही कारवाई केली आहे. अन्य प्रकरणांपैकी सेवेरिना फर्नांडिस यांच्या तक्रारीचे प्रकरण उपनिरीक्षक प्रमोद तारी, क्रिस्तालिना कुतिन्हो यांची तक्रार उपनिरीक्षक मयूर पणशीकर व सुषमा अस्थाना यांची तक्रार उपनिरीक्षक प्रज्योत बखले हाताळत आहेत.
सूत्रधार वेगळा आहे का ?
सेंट्रल बँक काकोडा शाखेच्या माध्यमातून सेनी कुलासो उर्फ तन्वी वस्त या महिलेने ज्येष्ठ नागरिकांना फसविण्याचे सत्र सहा महिन्यांपासून सुरू होते, असे दावे समोर येत आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आनंद जाधव याला व्यवस्थापक म्हणून सदर शाखेत नियुक्त केल्यास देखील फक्त सहा महिने झाले आहेत. या प्रकरणात आणखी किती जण गुंतलेले आहेत त्याचा छडा लावण्याची मागणी करण्यात येत असून आणखी कोणी तरी सूत्रधार असण्याची दाट शक्यताही तक्रारदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सेनी कुलासो उर्फ तन्वी वस्त हिच्या सेंट्रल बँक खात्यात फक्त 8900 ऊ. असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
तन्वीला यापूर्वी बँकेतून हटविले होते
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेनी कुलासो उर्फ तन्वी वस्त ही 2016 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया काकोडा शाखेत रिकव्हरी एजन्ट म्हणून तसेच महिला मंडळे व महिला गटांना मिळणाऱ्या कर्जांसंदर्भातील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर काही काळाने सध्याच्या प्रकरणाप्रमाणेच बँकेत पैशांची अफरातफर केल्यामुळे तिला शाखेतून काढून टाकले होते.
तन्वीला परत कुणी आणले ?
2023 साली परत एकदा सेंट्रल बँक काकोडा शाखेत बिझनेस कॉरस्पॉन्डंट म्हणून तन्वीला नियुक्त करण्यात आले. त्यानंतर तिने परत एकदा लोकांना लुटण्याचा सपाटा लावला व त्याचे एकेक कारनामे लोकांसमोर सध्या येत आहेत. ज्या महिलेला गैरप्रकार केल्यामुळे शाखेतून हटविले होते तिला परत त्याच शाखेत सहकार्यासाठी घेण्याची परवानगी कोणाद्वारे देण्यात आली, हा प्रश्न सध्या कुडचडेत चर्चेचा विषय बनला आहे.
पार्श्वभूमी का विचारात गेली नाही ?
मिळालेल्या माहितीप्रमाणे, कुठल्याही शाखेत अशा प्रकारची नियुक्ती ही व्यवस्थापकांकडून होत नाही, तर तो अधिकार फक्त विभागीय अधिकाऱ्याला असतो. सेनी कुलासो उर्फ तन्वीला नियुक्त करताना तिचा व्यवस्थित परिचय व पार्श्वभूमी का विचारात घेतली गेली नाही यावर प्रकाश पडला पाहिजे, असे मत लोकांकडून व्यक्त होत आहे. कुठल्याच संस्थेचा कर्मचारी संबंधित कार्यालय किंवा बँक अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याशिवाय कुठेच हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचतात का याची चौकशी होण्याची गरज लोकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सेनी कुलासो उर्फ तन्वीकडून बँकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाढदिवसाला महागड्या भेटवस्तू पोहोचत होत्या, अशाही दाव्यांना सध्या ऊत आलेला आहे.
दरम्यान, सेंट्रल बँक काकोडा शाखेच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून शाखेत जुना एकही अधिकारी दिसत नसल्यामुळे लोक आणखी बुचकळ्यात पडले आहेत. या प्रकरणामुळे खातेधारकांच्या विश्वासाला जो तडा गेला आहे तो भरून काढण्यासाठी बँकेने चौकशी हाती घेऊन या प्रकरणात आणखी कोण गुंतले आहेत ते उघड करण्याची गरज खातेधारकांकडून व्यक्त होत आहे.