हुंडा म्हणून शौचपात्र
मानवसमाज विविध अद्भूत परंपरांनी समृद्ध आहे. काही परंपरा तर इतक्या विचित्र आहेत, की त्यांचे आश्चर्य वाटते. चीनमध्ये अशीच एक परंपरा आहे. या परंपरेनुसार लग्नामध्ये हुंडा म्हणून शौचपात्र (टॉयलेट पॉट) दिले जाते. वधू आपल्या माहेराहून हे शौचपात्र सासरी घेऊन येते. याहूनही विचित्र प्रकार म्हणजे हे शौचपात्र रिकामे आणले जात नाही. त्यात तांबड्या रंगाची अंडी आणि सुकावेवा भरुन आणला जातो. तसेच या पात्रात खजूर, भुईमुगाचे दाणे, कमळाची बीजे आदी पदार्थही भरुन वधूसमवेत पाठविले जातात. हे पदार्थ सुख, शांती आणि भरभराटीची प्रतिके म्हणून मानली जातात. वधुवरांचा संसार बहरावा आणि त्यांना संतती व्हावी, यासाठीही हे पदार्थ उपयुक्त आहेत, अशी अनेकांची समजूत आहे.
विवाह करुन वधू या पात्रासह सासरच्या घरी आली, की हे पात्र रिक्त केले जाते. त्यानंतर तीन दिवसांनी या पात्राचा उपयोग घरातील लहान मुलांच्या शौचासाठी करावयास प्रारंभ केला जातो. ही परंपरा आजही चीनच्या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाळली जात आहे. मात्र, 1980 नंतर चीनमध्ये खेड्यांमध्येही आधुनिक पद्धतीची शौचालये आली आहेत. या ‘फ्लश टॉयलेटस्’मुळे आता शौचपात्र हुंड्यात मागण्याची आवश्यकता उरलेली नाही. त्यामुळे हळू हळू ही परंपरा मागे पडत चालली आहे. कालांतराने ती नामषेश होण्याची शक्यता आहे. तथापि, आजही ती अनेक खेड्यांमध्ये पाळली जाते. याचे कारण चीनी समाज हा प्राचीन परंपरांना मान देणारा आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असणारा समाज आहे. मात्र, अनेक तरुण आता ही परंपरा पाळण्यास नकार देत आहेत.
चीनमध्ये ही परंपरा कशी निर्माण झाली, याची वेगवेगळी कारणे दिली जातात. वधूला सासरी त्रास होऊ नये म्हणून ही परंपरा पाळली जाते. मानवाच्या दैनंदिन जीवनात शौच हा एक महत्वाचा असा भाग असतो, की तो टाळला जाऊ शकत नाही. खेड्यांमध्ये पूर्वी आधुनिक पद्धतीची शौचालये नसत. त्यामुळे त्या दृष्टीने वधूला काही अडचण येऊ नये, यासाठी हे पात्र ‘वरदक्षिणा’ म्हणून देण्याच्या प्रथेला प्रारंभ अनेक शतकांपूर्वीच झाला आहे. आता काळाच्या ओघात ही परंपरा काहीशी मागे पडत असली, तरी ती अनेकांच्या स्मृतीत आहे, अशी माहिती दिली जाते.