For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तारेवरची कसरत तीनशे फुटांवर

06:16 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
तारेवरची कसरत तीनशे फुटांवर
Advertisement

फ्रान्समधील एका महिलेने दोन डोंगरांमधील अंतर 300 फूट उंचीवर बांधलेल्या तारेवरुन चालत पार करण्याचा विक्रम केला आहे. तिचे नाव तातियाना मोसियो बोगोन्गा असे आहे. या दोन डोंगरांच्या शिखरांमधील अंतर 400 मीटर्सहून अधिक आहे. हे अंतर तिने नुकतेच अशा प्रकारे तारेवरची कसरत करत पार केले आहे. या दोन डोंगरांच्या शिखरांना जोडणारी ही तार भूमीपृष्ठभागापासून जवळपास 300 फूट उंचीवर होती. या महिलेने हे अंतर कोणत्याही आधाराशिवाय, केवळ तोल सांभाळण्यासाठी दोन्ही हातांमध्ये एक लांब काठी आडवी धरुन पार केले आहे. तिचा हा विक्रम पाहण्यासाठी खाली 9 हजारांहून अधिक लोक जमले होती. त्यांनी निरनिराळी वाद्ये वाजवून आणि नाचून या महिलेचा उत्साह वाढविण्याचे काम केले. विशेष बाब अशी की या महिलेने इतक्या मोठ्या उंचीवरुन हे अंतर कोणत्याही सुरक्षेशिवाय पार केले आहे. खाली कोणतेही जाळे किंवा सुरक्षेचे साधन नव्हते. तसेच तिने सुरक्षा दोरीही स्वत:ला बांधली नव्हती. अशा अत्यंत कठीण स्थितीतही तिने यशस्वी रितीने हे अंतर पार केल्यामुळे तिचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे. हे अंतर पार करत असताना तिने काही थरारक कसरतीही केल्या. त्यामुळे खाली उभे राहून तिला पाहणाऱ्यांचा श्वास रोखला गेला.

Advertisement

ज्यावेळी तातियाना मोसिया बोगोन्गा एका डोंगरावरुन सुरक्षितपणे दुसऱ्या डोंगरावर पोहचली आणि तारेवरुन डोंगराच्या शिखरावर उतरली. तेव्हा खाली जमा झालेल्या हजारो दर्शकांनी टाळ्यांचा कडकडाड करुन तिचे अभिनंदन केले. फ्रान्समधील लो-आ-गोएल या स्थानी या महिलेने हा पराक्रम केला. तिची ही तारेवरची कसरत सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. लक्षावधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून तिच्यावर जगभरातून प्रशंसेचा वर्षाव केला जात आहे. या महिलेने यापूर्वीही असे अचाट प्रयोग केले आहेत. फ्रान्समधील हा प्रयोग अंतिम नसून भविष्यकाळात याहीपेक्षा अधिक आव्हानात्मक साहसी कृत्ये करुन दाखविण्याची आपली योजना आहे, असे तिने स्पष्ट केले आहे. तिचा हा विक्रम विक्रम पुस्तिकेत समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.