For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ब्राझीलमधील चित्तथरारक निवडणूक

06:28 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्राझीलमधील चित्तथरारक निवडणूक
Advertisement

‘ब्रिक्स’ या विकसनशील देशांचे आर्थिक हीत जोपासणाऱ्या राष्ट्र गटांचा संस्थापक सदस्य आणि जगातील चौथी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या ब्राझीलमध्ये नुकतीच अध्यक्षपदासाठीची निवडणूक झाली. त्यात राष्ट्राध्यक्ष व ‘वर्कर्स पार्टी’ पक्षाचे नेते लुला दा सिल्वा यांनी लिबरल पार्टीचेफ्लॅविओ बोल्सोनारो  यांचा 44 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.लॅटिन अमेरिका आणि उर्वरित जगाचे लक्ष लागून राहिलेली ही निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक ठरली.

Advertisement

ब्राझीलमधील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक दोन टप्प्यांच्या मतदान पद्धतीद्वारे होते. पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला, वैध मतांपैकी 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली नाहीत, तर सर्वाधिक मते मिळवलेले दोन उमेदवार, दुसऱ्या फेरीत एकमेकांविरुद्ध उभे राहतात. निवडणूक नेहमी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होते. यानुसार 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत लुला यांना 45 टक्के तर बोल्सोनारो यांना 47 टक्के मते मिळाली होती. या फेरीत लुला स्पष्टपणे पिछाडीवर होते. तथापि, कोणत्याच उमेदवाराने 50 टक्क्यांची मर्यादा न ओलांडल्याने 25 तारखेस दुसरी निवडणूक फेरी ठरली. दरम्यानच्या काळात, विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला-दा-सिल्वा यांच्या राजकीय कारकीर्दीचा अंत झाल्याचे लेख सर्वत्र लिहिले गेले. फ्लॅविओ बोल्सोनारो यांनी घेतलेली आघाडी, दुसऱ्या फेरीत ओलांडणे विश्लेषकांना अशक्य वाटत होते. 21 कोटींची लोकसंख्या असलेल्या दक्षिण अमेरिकेतील मोठ्या देशाच्या राजकारणात, केंद्रस्थानी राहून चार दशके व्यतीत केल्यानंतर, 81 वर्षात पदार्पण करणारे लुला शांतपणे निवृत्त होण्याच्या मार्गावर दिसत होते. परंतु या साऱ्या अटकळी अखेर चुकीच्या ठरल्या. लुला यांना दुसऱ्या फेरीत 6, 42, 56, 232 मते पडली, तर प्रतिस्पर्धी फ्लॅविओ बोल्सानारो यांना 5,98,26,041 मते पडली. टक्केवारीत लुलांनी 51.79 विरुद्ध 48.21 टक्के अशी आघाडी घेत, विजयासाठीचा निकष संपादित केला. आतापर्यंत ब्राझीलच्या कोणत्याही अध्यक्षीय उमेदवाराने पहिल्या फेरीत हार पत्करुन दुसऱ्या फेरीत विजय मिळवला नव्हता. ही परंपरा देखील लुलानी लिलया मोडली. लुलांनी जिंकलेली ही राष्ट्राध्यक्षपदाची चौथी निवडणूक. ब्राझील लोकशाहीच्या इतिहासात कोणताही राष्ट्राध्यक्ष जनतेने चारवेळा निवडून दिलेला नाही. नवा कार्यकाळ संपेल तेव्हा लुला यांनी ब्राझीलवर एकूण 16 वर्षे राज्य केलेले असेल. अखंडीत नसला तरी, राष्ट्राध्यक्षपदावर सर्वात प्रदीर्घ कार्यकाळ लुला यांच्या नावावर नोंदवला जाईल.

काटेरी सिंहासन

Advertisement

ब्राझीलमध्ये अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या उमेदवाराने, चौकशी आणि तुरुंगवासाच्या भोवऱ्यात सापडणे ही नवी गोष्ट नाही. 2018-19 दरम्यान भ्रष्टाचाराच्या (ऑपरेशन कार वॉश) आरोपाखाली, लुलांनी 580 दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर संघराज्यीय सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे त्यांची सुटका केली. लुला म्हणाले, वर्षापेक्षा अधिक काळाच्या तुरुंगवासात त्यांनी 40 पेक्षा अधिक पुस्तके वाचली. पुढे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील खटले निराधार ठरवत, शिक्षा रद्द करून राजकीय पुनर्पदार्पणाचा मार्ग मोकळा केला. तथापि, 2018 ते 2022 च्या मध्यंतरीच्या कालखंडात त्यांच्या आपत्रतेमुळे, जावेर बोल्सोनारो या लिबरल पक्षाच्या उमेदवाराने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून देशात सत्ता चालवली. 2022 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांची गाठ लुलांशी पडली. लुला ही निवडणूक जिंकले. मात्र ही निवडणूक अवैध असल्याचे मानत, बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थकांनी संसद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्राध्यक्ष भवन परिसरात गोंधळ आणि विध्वंस माजवला. ते दृश्य ट्रम्प यांनी कॅपिटल हॉलवर केलेल्या हल्ल्यासारखेच होते. परिणामी, लोकशाही सत्ता उलथवून टाकण्याचा कट केल्याच्या आरोपाखाली त्यांना कारावास सुनावण्यात आला. सध्या ते नजरकैदेत आहेत. या पार्श्वभूमीवर, आताच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र फ्लॅव्हिओ बोल्सोनारो यांना लुलांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे करण्यात आले होते. मात्र पराभवानंतर मनी लाँडरींग, करचुकवेगिरीच्या आरोपांखाली चौकशी आणि तुरुंगवासाची टांगती तलवार असल्याने ते अमेरिकेला पळाले आहेत आणि ट्रम्प सरकारने त्यांना आश्रय दिला आहे. ब्राझीलमधील राष्ट्राध्यक्षाचे सिंहासन किती काटेरी आहे याची जाणीव हा विचित्र घटनाक्रम करून देतो.

लुला यांच्यासमोरील आव्हाने

ताज्या निवडणुकीतील दोन्ही प्रतिस्पर्ध्यांत केवळ 3.6 टक्क्यांचा फरक आहे, हे ध्यानात घेता ‘सामाजिक विश्वास’ दोन्ही उमेदवारात जवळपास समानतेने विभागला आहे, असे म्हणता येईल. त्यातच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकत्रितपणे उजव्या व मध्यममार्गी पक्षांचे बहुमत असल्याने, सरकारला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी आणि वाढत्या राष्ट्रीय कर्जाचा सामना करण्यासाठी, आवश्यक असलेल्या आर्थिक व वित्तीय सुधारणा हाताळताना, लुलांना विशेष कसरत करावी लागेल. निवडणूक प्रचारातील वचननाम्यात त्यांनी विद्यापीठ शिष्यवृत्ती, कौटुंबिक कर्जमाफीचा नवा टप्पा आणि एक मोठा गृहनिर्माण उपक्रम यांचा समावेश केला होता. ते साध्य करण्यासाठी लुलांना अशा बहुमताशी वाटाघाटी कराव्या लागतील, ज्यांचा हेतू अर्थसंकल्पातील स्वत:चा वाटा वाचवण्यात दडला आहे. मागील सत्ताकाळात लुलांनी अर्थव्यवस्थेत 9.2 इतकी उल्लेखनीय वाढ दर्शवली होती. बेरोजगारी दरही 9.3 टक्क्यांवरून 2026 मध्ये 5.4 टक्क्यांचा ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आणला होता. मात्र क्रेडिट कार्ड कर्जाच्या उच्च व्याजदराशी झगडणारे नागरिक, ऑनलाइन जुगाराच्या प्रचंड वाढीने उद्धवस्त होणारी कुटुंबे या प्रलंबित समस्यांवर त्यांना तातडीने उपाय योजावे लागतील. ब्राझीलच्या काही भागात प्रचंड शक्ती असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा उत्पात वाढला आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था काटेकोर करून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी लागेल.

आंतरराष्ट्रीय परिणाम

उदयोन्मुख देशांना, अमेरिकाप्रणित पाश्चात्य अर्थव्यवस्थांचे वर्चस्व झुगारुन न्याय्य वाटा मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘ब्रिक्स’ गटाला लुला यांच्या विजयाने मोठाच दिलासा मिळाला आहे. जवळपास दोन दशकांपूर्वी जेव्हा या गटाची स्थापना झाली, तेव्हा स्वत: लुला त्याच्या शिल्पकारांपैकी एक होते. जागतिक स्तरावर या गटाची भूमिका अधिक मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ब्रिक्स देशांसाठी मुद्दा केवळ अमेरिका विरोध हा नाही, तर स्वतंत्र निर्णयासाठी वाव आणि कोणत्याही जागतिक महाशक्तीवरील अधिक अवलंबन टाळणे हा आहे. या पार्श्वभूमीवर लुला यांच्या पुनर्निवडीचे भारतासह सर्व सदस्य देशांनी स्वागत केले आहे. लुला यांच्या विजयाने, राजकीय विश्लेषकांत ‘डॉनेरो सिद्धांत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरण प्रणालीस मोठा धक्का दिला आहे. हा सिद्धांत, ट्रम्प प्रशासनाने, वाढीव शुल्क, धमक्या, राजकीय हस्तक्षेप या माध्यमातून, लॅटिन अमेरिका आणि पश्चिम गोलार्धास, घट्टपणे अमेरिकेच्या प्रभावाखाली आणण्याच्या प्रयत्नांना सुचित करतो.

लॅटिन अमेरिकेत अलिकडे कोलंबिया, इक्वेडोर, चिली, अर्जेंटिना या देशात एकामागोमाग ट्रम्प समर्थकांच्या सत्ता आल्या होत्या. लुला यांचे प्रतिस्पर्धी बोल्सोनारो घराणे ट्रम्प यांचे समर्थक व निकटवर्ती होते.

अनिल आजगांवकर

Advertisement

.