दूध देणारी तीन महिन्यांची बकरी!
बैलहोंगल तालुक्यातील प्रकार : दररोज देतेय अर्धा लिटर दूध
► प्रतिनिधी / बेळगाव
केवळ अडीच ते तीन महिन्यांचे शेळीचे पिल्लू दूध देत असल्याचा प्रकार बैलहोंगल तालुक्यातील नवलगट्टी गावामध्ये समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. ईश्वराप्पा मडिगार यांच्या शेळीने तीन महिन्यांपूर्वी एका पिल्लाला जन्म दिला होता. हे पिल्लू आता दररोज अर्धा लिटर दूध देऊ लागले आहे. या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
संबंधित शेळीच्या मालकाला या पिल्लाच्या कासेचा आकार मोठा झाल्याचे निदर्शनास आले. त्याने कास दाबून बघितल्यानंतर त्यातून दूध येऊ लागले. या प्रकारामुळे शेळी मालकाला आश्चर्य वाटत आहे. या शेळी मालकाकडे शेळी आणि इतर जनावरे आहेत. यातील एका शेळीच्या पिल्लाने दूध द्यायला सुरुवात केली आहे. पिल्लाला या वयात आईच्या दुधाची गरज असते. मात्र हे पिल्लूच दूध देत असल्याने चर्चा होऊ लागली आहे.
ईश्वराप्पा मडिगार यांच्याकडे शेळी आहेत. या शेळ्यांच्या दुधाबरोबर दूध देणाऱ्या पिल्लाचे दूधही घरात वापरले जात आहे. इतर शेळ्यांप्रमाणेच या अडीच महिन्यांच्या पिल्लाचेही दूध असल्याचे सांगितले जात आहे.
दूध देण्याच्या प्रकारामुळे आम्हाला आश्चर्य
अडीच महिन्यांच्या शेळीच्या पिल्लाची कास मोठी असल्याने दाबून पाहिले असता दूध आले. आता ते पिल्लू दिवसातून अर्धा लिटर दूध देत आहे. आम्ही घरात त्या दुधाचा वापर करत आहोत. या प्रकारामुळे आम्हाला आश्चर्य वाटू लागले आहे.
-ईश्वराप्पा मडिगार, शेळी मालक
पिल्लू दूध देण्याचा प्रकार आगळावेगळा
जन्माच्या साधारणत: सहा महिन्यांनंतर शेळीची मादी प्रजननासाठी सक्षम ठरून दूध देते. मात्र, अडीच महिन्यांचे पिल्लू दूध देण्याचा प्रकार आगळावेगळा आहे. पिल्लाच्या शरीरात झालेल्या हार्मोन्सच्या बदलामुळे हा प्रकार घडत असावा.
-डॉ. एच. बी.सनक्की, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, बेळगाव