पोल्ट्रीफार्मच्या नावाखाली तीन पानी जुगार अड्डा
कोल्हापूर :
कसबा बीड (ता. करवीर) येथे पोल्ट्री फार्मच्या नावाखाली सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास करवीर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये 10 जणांना ताब्यात घेऊन 7 दुचाकी, 8 मोबाईल हॅडसेट असा सुमारे 3 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जुगार मालक उध्दव बापुसो चव्हाण (57 रा. कसबा बीड), भरत शंकर हिलगे (40 हनुमान गल्ली, साडोली खालसा), पंडित लहु कुंभार (55 रा. बीडशेड फाटा), बाजीराव महादेव साळोखे (53 रा. कळंबा जेलच्या पिछाडीस), विशाल जयसिंग पाटील (41 रा. कसबा बीड), गोरख तुकाराम खामकर (35 रा. घानवडे पैकी चव्हाणवाडी), विश्वास गणपती गावडे (40 रा. घानवडे पैकी चव्हाण वाडी), दत्तात्रय दिनकर साळोखे (42 रा. धनगर गल्ली कोथळी), मकरंद उर्फ महादेव रघुनाथ सुतार (41 रा. हासुर दुमाला), भीमराव विष्णू बीडकर (45 रा. कसबा बीड) आणि बाजीराव ज्ञानदेव गावडे (पत्राशेड मालक) यांच्यावर कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की, कसबा बीड येथे पोल्ट्रीफार्मच्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी जुगार सुरु असल्याची माहिती करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. यानुसार करवीर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या जुगार अड्यावर छापा टाकला. यावेळी 10 जण जुगार खेळताना आढळून आले. या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये रोख 29 हजार रुपये, 8 मोबाइल हँडसेट, 7 दुचाकी आणि इतर जुगाराचे साहित्य असा एकूण 3,72,870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.