प्रतिदिन हजार किमीचा विमान प्रवास
सुपरस्टार असण्याचा अर्थ शिक्षण विसरून जाणे असा नाही. युझुकी नाकाशिमा जपानच्या टॉप गर्ल ग्रूप साकुराझाका46 ची लोकप्रिय गायिका आहे. शोबिजच्या झगमगाटात असतानाही तिने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मागील 4 वर्षांपासून ती दरदिनी फ्लाइटने 1 हजार किमीचा प्रवास करत विद्यापीठातील वर्गांमध्ये हजर राहते. टोकियोत राहणारी युझुकी दररोज पहाटे 5 वाजता उठते आणि 6 वाजेपर्यंत टोकियोतील हानेडा विमानतळावर पोहोचते. तेथून ती फुकुओकासाठी पहिली फ्लाइट पकडते, हे ठिकाण टोकियोपासून सुमारे 1 हजार किलोमीटर अंतरावर आहे. येथेच तिचे विद्यापीठ आहे. जेथे सर्वसामान्य लोक फ्लाइटमध्ये झोप घेणे पसंत करतात, युझुकी दरदिनाच्या विमानप्रवासात स्वत:चा अभ्यास आणि क्लास प्रेपरेशन करते. चार तासांचा हा तिचा दैनंदिन प्रवास शिक्षणासाठी सर्वात प्रभावी वेळ आहे. सकाळी 9.35 वाजता ती किटाक्युशू विमानतळावर पोहोचते आणि तेथून बसद्वारे युनिव्हर्सिटीत पोहोचते. पूर्ण दिवसाच्या क्लासनंतर संध्याकाळी ती पुन्हा टोकियोत दाखल होते आणि यानंतर युझुकी डान्स आणि सिंगिंग प्रशिक्षण घेते, जेणेकरून कलाकार म्हणून स्वत:च्या कलेत कुठलीच कमतरता राहू नये याची ती खबरदारी घेते. व्यग्र वेळापत्रक असूनही ती दरदिनी स्वत:मध्ये सुधारणा करू पाहत असते.
प्रतिदिन खर्च सुमारे 20 हजार रुपये
टोकियोतून फुकुओकाच्या फ्लाइटचा एकतर्फी खर्च 15 हजार येन म्हणजेच सुमारे 9 हजार रुपये असतो. दोन्ही बाजूचा प्रवास अणि अन्य खर्च मिळून तिचा प्रतिदिन प्रवासखर्च 20 हजार रुपयांच्या आसपास होत असतो. परंतु तिच्यासाठी हा खर्च म्हणजे स्वप्नांची किंमत आहे. नाकाशिमाने आतापर्यंत ही बाब चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. आपण दरदिनी किती लांब आणि महाग प्रवास करतोय, हे तिने सांगितले नव्हते. परंतु आता ती ग्रॅज्युएशनच्या नजीक पोहोचल्याने तिने स्वत:चा संघर्ष आणि समर्पणाची कहाणी सर्वांसमोर मांडली आहे. माझ्यासाठी शिक्षण आणि कारकीर्द दोन्ही आवश्यक आहेत. माझी पदवीच माझ्यासाठी सर्वात मोठे यश असेल, असे तिने म्हटले आहे.