चंदेरी पडद्यावरील हजार कोटींचे ‘धुरंधर’ !
भारतातील चित्रपटांच्या कमाईचे आकडे आता गगनाला भिडू लागलेत...देशभरात वाढलेली व्याप्ती अन् परदेशातही विस्तारलेला आवाका हे घटक त्यास प्रामुख्यानं कारणीभूत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे यात केवळ हिंदी चित्रपटांचा समावेश राहिलेला नसून दाक्षिणात्य सिनेमांनीही पुढं झेप घेतलीय...या पार्श्वभूमीवर जगभरात 1 हजार कोटींहून अधिक कमाई हा नवलाईचा विषय राहिलेला नाहीये. अशी भरारी नुकतीच घेऊन दाखविलीय ती सध्या विलक्षण गाजणाऱ्या अन् विक्रमी कामगिरी करणाऱ्या ‘धुरंधर’नं...हजार कोटींच्या ‘क्लब’चा घेतलेला हा धांडोळा...
हॉलिवूड चित्रपट जगभर प्रदर्शित होतात आणि कमाई करतात कोट्यावधी डॉलर्सची. परंतु भारतीय सिनेमांना ते मर्यादित रसिकांमुळं शक्य होत नाहीये...तरी देखील त्या चित्रपटानं तब्बल 1 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलाडलाय तो अवघ्या 21 दिवसांत...विशेष म्हणजे तो प्रदर्शित झालाय फक्त हिंदी भाषेत अन् त्याला मिळालंय ‘ए’ प्रमाणपत्र...चक्क साडेतीन तास चालणाऱ्या त्या सिनेमानं फक्त 28 दिवसांत जगभरात कमाई केलीय ती 1141 कोटी रुपयांची. त्यात भारतीय बॉक्स ऑफिसचा हिस्सा 886.8 कोटी रुपयांचा...प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्माच्या शब्दांत सांगायचं झाल्यास ‘त्या चित्रपटानं दक्षिणेनं बॉलिवूडवर केलेल्या आक्रमणाला अक्षरश: उधळवून लावलंय.दक्षिण भारतीय मसालेपटंच्या पठडीतलाच हा सिनेमा असला, तरी तो अत्यंत घणाघाती पद्धतीनं मांडण्यात आलाय नि त्यामुळं दर्शक अगदी भारावून गेलेत’...‘उरी’ चित्रपट देणारा आदित्य धर, रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्नाचा सुपरड्युपर हिट ‘धुरंधर’...
गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास अलू अर्जुनचा ‘पुष्पा 2’, ज्युनियर एनटीआर व रामचरण यांचा ‘आरआरआर’, शाहरुख खानचे ‘जवान’ नि ‘पठाण’, प्रभास व अमिताभ बच्चनचा ‘कल्की 2898 एडी’ यांनीही हा मान मिळविलाय...सुदैवी आमिर खानच्या ‘दंगल’नं तर चक्क 2 हजार 70.3 कोटी रुपये खिशात टाकले ते चित्रपटाला चीनमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाल्यानं...‘धुरंधर’चं आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे सेन्सॉरकडून मिळालेल्या ‘ए’ प्रमाणपत्राच्या आव्हानाला सामोरं जात ‘अॅनिमल’प्रमाणंच त्यानं हे यश मिळविलंय. ते प्रमाणपत्र मिळालेल्या एखाद्या भारतीय सिनेमानं असा धडाका दाखविलाय तो प्रथमच...अन्य एक बाब म्हणजे ‘धुरंधर’च्या ‘न भूतो’ व्यवसायामुळं वितरकांनी त्याला पसंती दिली अन् विख्यात ‘अवतार : फायर अँड अॅश’ फिल्मला त्याच्यापेक्षा कमी खेळांवर समाधान मानावं लागलंय...
भारतातील जवळपास सर्व सिंगल क्रीन थिएटर्सवर ‘धुरंधर’ आदळलाय. असं वाटतंय की, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘बॉर्डर 2’ प्रदर्शित होईपर्यंत आदित्य धरच्या या कलाकृतीला आव्हान देणं कुणालाही जमणार नाहीये. 12 डिसेंबर या दिवशी कपिल शर्माचा ‘किस किस को प्यार करूं’चा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. पण ‘धुरंधर’च्या वादळापुढं तो कुठल्या कुठं उडून गेला. त्यामुळं तो चित्रपट थिएटरमधून काढून आता चालू जानेवारी महिन्यात पुन्हा प्रदर्शित करण्याचा प्रयोग करण्यात येईल...
‘धुरंधर’नं परदेशात सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गल्ला जमविलाय तो 28 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त. यामध्ये अमेरिकेतील ऐतिहासिक यशाचा मोठा वाटा. तिथं चित्रपटानं 17 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक व्यवसाय करून दाखविलाय. परदेशातील हे आकडे अधिकच प्रभावी म्हणावे लागतील, कारण ज्या आखाती देशांमध्ये बॉलिवूड चित्रपट नेहमी चांगली कमाई करत आलेत त्यापैकी बहुतेक ठिकाणी या चित्रपटास बंदीला तोंड द्यावं लागलंय...
डब केलेल्या आवृत्त्यांचा मोठा वाटा...
सध्याच्या घडीला ‘धुरंधर’ आतापर्यंतचा सातवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरलेला असला, तरी त्याचं वेगळेपण म्हणजे आघाडीच्या 10 चित्रपटांतील हा असा एकमेव सिनेमा, जो इतर कोणत्याही भाषेत प्रदर्शित झालेला नाहीये...’दंगल’नं सर्वोच्च स्थान मिळविलेलं असलं, तरी त्याची 1300 कोटी रुपयांहून अधिक कमाई चीन आणि हाँगकाँगमधील शानदार प्रदर्शनातून झाली. तिथं तो मँडेरिन डबिंगसह प्रदर्शित झाला होता...त्याचप्रमाणं ’पुष्पा 2’ नि ’बाहुबली 2’ यांची कमाई देखील मूळ तेलुगु व हिंदी डबिंग आवृत्तीमध्ये विभागली गेलीय...‘जवान’ आणि ‘पठाण’ यांच्याही व्यवसायात डब केलेल्या आवृत्त्यांचा मोठा वाटा. ’जवान’च्या बाबतीत तामिळ व तेलुगु आवृत्त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय (जगभरात 80 कोटींहून अधिक कमाई)...‘पुष्पा 2’नं भारतात हिंदीमध्ये 967 कोटी आणि परदेशात अंदाजे 15 दशलक्ष डॉलर्स (120 कोटी रुपये) इतकं उत्पन्न मिळविलं...
भाषेचा अडथळा ओलांडून यश...
2025 चं वर्णन चित्रपटांच्या बाबतीत सातत्य नसलेलं वर्ष असं केल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. वितरकांच्या मतानुसार, रसिकांची मागणी असून देखील मधल्या काही काळात एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. ती कसर भरून काढली जुन्या चित्रपटांनी सिनेमागृहांना पुन्हा धडक देऊन...गेल्या 12 महिन्यांत 32 सिनेमांनी 100 कोटींचा टप्पा ओलांडलाय. त्यात समावेश राहिला विविध विषयांचा व विविध भाषांचा...हिंदीतील ‘धुरंधर’, ‘छावा’, ‘सितारे जमीन पर’च्या जोडीला हॉलिवूडमधील ‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘अवतार : फायर अँड अॅश’ अन् प्रादेशिक भाषांतील ‘कुली’ (तामिळ), ‘कांतारा चॅप्टर वन’ (कन्नड), ‘लोकाह चॅप्टर वन : चंद्रा’ (मल्याळम) यांनी जबरदस्त यशाची नोंद केलीय आणि चित्रपट चांगला असल्यास त्याला भाषेचा अडथळा येऊ शकत नाही हे सिद्ध केलंय...
बॉक्स ऑफिसचा विचार केल्यास 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमांनी 2024 शी तुलना केल्यास 12 ते 15 टक्क्यांनी अधिक गल्ला जमविलाय. गेल्या 12 महिन्यांत पडद्यावर झळकलेल्या 1546 चित्रपटांनी 25 sंडिसेंबरपर्यंत नोंद केली ती 13 हजार 330 कोटी रुपयांची...

बॉक्स ऑफिसची वेगळी वैशिष्ट्यां...
? ऑक्टोबर हा भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वांत जास्त कमाई करणारा महिना ठरला (1669 कोटी रुपये)...
? हैदराबाद ही पुन्हा प्रदर्शित झालेल्या सर्व भाषांतील चित्रपटांची राजधानी ठरलीय...‘यह जवानी है दिवानी’, ‘सनम तेरी कसम’, ‘सालार’, ‘आदू’ नि ‘रमाबाणम’ यांनी पुन्हा हजेरी लावूनही रसिकांना खेचून आणलं...
? जोडप्यांचा विचार केल्यास ‘कांतारा अ लेजंड : चॅप्टर वन’ सर्वांत जास्त पसंतीचा चित्रपट ठरलाय...
? आगावू बूकिंगच्या बाबतीत रजनीकांतच्या ‘कुली’ला आव्हान देणं कुणालाही जमलं नाही...
1 हजार कोटींचा टप्पा ओलांडणारे विविध भाषांतील चित्रपट...
नाव गल्ला
दंगल 2070.30 कोटी रु.
बाहुबली 2 - द कनक्ल्युजन 1788 कोटी रु.
पुष्पा 2 - द रूल 1742.10 कोटी रु.
आरआरआर 1230 कोटी रु.
केजीएफ चॅप्टर 2 1215 कोटी रु.
जवान ................ 1160 कोटी रु.
धुरंधर 1141 कोटी रु.
पठाण 1055 कोटी रु.
कल्की 2898 एडी 1042 कोटी रु.
भारतात 100 कोटींच्या पार गेलेले यशस्वी हिंदी चित्रपट...
नाव कमाई
धुरंधर 886.8 कोटी रु.
कांतारा चॅप्टर वन 741 कोटी रु.
छावा 717 कोटी रु.
सैयारा 399 कोटी रु.
महाअवतार नरसिंहा 299 कोटी रु.
रेड 2 206 कोटी रु.
सितारे जमीन पर 201 कोटी रु.
थम्मा 161 कोटी रु.
तेरे इश्क में 133 कोटी रु.
100 कोटींचा टप्पा ओलांडूनही अपयशी ठरलेले चित्रपट...
नाव कमाई
वॉर 2 283 कोटी रु.
हाऊसफुल्ल 5 218 कोटी रु.
जॉली एलएलबी 3 140 कोटी रु.
स्कायफोर्स 136 कोटी रु.
सिकंदर 131 कोटी रु.
केसरी 2 111 कोटी रु.
जाट 105 कोटी रु.
भारतात 100 कोटींचा व्यवसाय करणारे इंग्रजी चित्रपट...
नाव कमाई
अवतार फायर अँड अॅश 163.6 कोटी रु.
एफ 1 128 कोटी रु.
मिशन इम्पॉसिबल 124 कोटी रु.
ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ 123 कोटी रु.
द कन्ज्युरिंग : लास्ट राईट्स 102 कोटी रु.
संकलन : राजू प्रभू