बेकायदा बांधकामांबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा
काही बांधकामे गोमंतकीयांची असल्याने विचार करावा, भाजप सुकाणू समितीच्या बैठकीत सरकारला सूचना
पणजी : अनधिकृत बांधकामांसदर्भात काळजीपूर्वक तसेच विचारपूर्वक निर्णय घेण्याची सूचना भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीतून करण्यात आली आहे. त्यात अनेक गोमंतकीयांची घरे, बांधकामे असून ती जमिनदोस्त झाली तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असा इशाराही बैठकीतून सरकारला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक बैठकीस हजर होते. गोवास्थित उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामे पाडण्याचा आदेश दिल्यानंतर सरकारने ती बांधकामे जमिनदोस्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली असून या विषयावर समितीच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. गोमंतकीय लोकांसह परप्रांतियांची बांधकामे त्यात समाविष्ट असल्याने ती उद्ध्वस्त झाली तर आगामी निवडणूक निकालावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता काही सदस्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे घाई न करता विचारांती निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार असल्याचे सदस्यांनी सूचित केले. भाजप व मगोप युतीबाबत सध्या दोन्ही पक्षाचे नेते उलट-सुलट वक्तव्ये करीत असून तो विषय समितीच्या बैठकीत येणार अशी चिन्हे होती तथापि तो टाळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपचे आगामी कार्यक्रम, निवडणूक तयारी व इतर संघटनात्मक विषयावरुन चर्चा करण्यात आली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.