भारतीय संघाचा कसून सराव
रोहित, विराटसह बुमराह जडेजा, अश्विनचा सरावावर फोकस : तिसऱ्या जागेसाठी कुलदीप व अक्षरमध्ये चढाओढ
वृत्तसंस्था/ चेन्नई
कर्णधार रोहित शर्मा व त्याच्या सहकाऱ्यांनी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी सोमवारीही कसून सराव केला. यावेळी सर्व 16 खेळाडू सरावात सहभागी झाले होते.
येथे आगमन झाल्यानंतर एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी भारतीय संघाने एकंदर तिसऱ्या ट्रेनिंग सत्रात भाग घेतला. पहिली कसोटी गुरुवारपासून सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणे फलंदाजीच्या सरावाच्या बॅचमध्ये कोहली सर्वप्रथम जाळ्यातील सरावात सामील झाला होता. सोबत असलेल्या दुसऱ्या नेटमध्ये यशस्वी जैस्वाल फलंदाजी करीत होता. दोघांनाही जसप्रित बुमराह व आर. अश्विन यांनी गोलंदाजी केली. फलंदाजांच्या दुसऱ्या तुकडीत कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, सरफराज खान यांचा समावेश होता. सरफराज खान दुलीप ट्रॉफीचा सामना खेळून येथे सर्वात शेवटी दाखल झाला.
बांगलादेशच्या स्पिनर्सचा विचार करून कर्णधाराने स्पिन गोलंदाजी खेळण्यावर भर दिला. रवींद्र जडेजा, रिषभ पंत, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनीही स्थानिक गोलंदाजांना सामोरे गेले व नंतर बराच वेळ थ्रोडाऊनही केले. सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या खेळपट्टीत बऱ्यापैकी बाऊन्स होता. कसोटीआधी आणखी दोन सराव सत्रे होणार आहेत. पाकिस्तानविरुद्ध दोन्ही कसोटी जिंकून ऐतिहासिक मालिकाविजय मिळविल्यामुळे बांगलादेश संघाचे मनोबल खूप उंचावलेले आहे.
जागा 1, दावेदार 3
चेन्नईची खेळपट्टी सहसा स्पिनर्सना अनुकूल ठरणारी असल्याने भारतीय संघ या सामन्यात तीन स्पिनर्स व दोन वेगवान गोलदाज खेळवण्याची जास्त शक्यता आहे. चेपॉकमधील पहिल्या कसोटी सामन्यासाठी काळ्या मातीची खेळपट्टी असू शकते. असे झाल्यास टीम इंडियाचे लक्ष फिरकी गोलंदाजांवर अधिक असेल. यानंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहायचे आहे. याशिवाय खेळपट्टी लाल मातीची असेल तर गोलंदाजांची निवड करणे कर्णधार आणि प्रशिक्षकासाठी डोकेदुखी ठरणार आहे. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता एका जागेसाठी कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि आकाश दीप यांच्यात लढत पहायला मिळणार आहे.
विराट शॉट अन् चेंडू भिंतीच्या आरपार
लंडनहून परतलेला विराट कोहली पूर्णपणे ताजातवाना दिसत आहे. चेन्नईत होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी किंग कोहलीने कसून सरावावर भर दिला. सराव करताना विराट काही कव्हर ड्राईव्ह, मोठे फटके खेळताना दिसला. विराट गोलंदाजांसमोर आक्रमक खेळत होता. यादरम्यान तो जबरदस्त फटकेबाजी करताना षटकार आणि चौकार एकामागून एक लगावत होता. दरम्यान, सराव सत्रात विराटने असा फटका मारला की थेट भिंतीला छिद्र पाडले. विराटने मारलेला एक शक्तिशाली शॉट ड्रेसिंग रूमच्या भिंतीवर आदळला आणि तेथे बॉलच्या आकाराचे छिद्र पडले. कोहलीने ड्रेसिंग रूमची भिंत तोडल्याचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.