सखोल चौकशी अत्यावश्यक
भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याचे, धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक खरोखर करावे तितके थोडेच आहे. दुबईहून इस्रायलला चाललेल्या विमानात जो प्रसंग घडला आणि नंतर त्याहीपेक्षा गंभीर असा जो प्रसंग घडू शकला असता, त्यांच्यातून त्यांनी विमानातील 174 प्रवाशांचीच केवळ सुटका केली असे नव्हे, तर भारताला आणि जगालाही एका भीषण संकटापासून वाचविले आहे. फ्लायदुबई या विमानाचे ते मुख्य वैमानिक होते. याच विमानात हा जो प्रसंग घडला त्याची माहिती एव्हाना सर्वांपर्यंत पोहचली आहे. त्यांचा सहकारी वैमानिक, जो ओमान या देशाचा होता, त्याने मच्छार या विमानाच्या चालककक्षात भोसकून गंभीर जखमी केले. विमानाचा ताबा त्यांच्याकडून स्वत:कडे घेऊन ते विमान कोणत्यातरी इमारतीवर आदळवून अमेरिकेत 2001 मध्ये घडलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉन यांच्यावर इस्लामी दहशतवाद्यांनी प्रवासी विमाने आदळवून घडविलेल्या उत्पाताची त्याला पुनरावृत्ती करायची होती. या ओमानी वैमानिकाची चौकशी होत आहे. तथापि, त्याचा प्रयत्न विमान आदळविण्याचाच होता, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यासाठीच त्याने मुख्य वैमानिक मच्छार यांना गंभीर जखमी करुन विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, असे निश्चित म्हणता येते. तथापि, तशा रक्तबंबाळ अवस्थेतही मच्छार यांनी कॉकपिट उघडून प्रवाशांना सावध केले आणि पुढील भयानक संभाव्य प्रसंगाची मालिका टाळली. त्याही स्थितीत त्यांनी विमानाचा ताबा त्या ओमानी वैमानिकाच्या हाती जाऊ दिला नाही. त्यांच्या या दुर्दम्य साहसाची आणि समयोचित कृतींची प्रशंसा जगभरात केली जात आहे. ती तशी होणे आवश्यकच आहे. पण यातून आणखी एका चिंताजनक विषयाकडे जगाचे आणि विशेषत: भारताचे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. समजा, तो ओमानी वैमानिक त्याच्या कारस्थानात यशस्वी ठरला असता आणि त्याने विमानाचा ताबा घेऊन ते आदळवून अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती केली असती, तर काय झाले असते? विमानातील सर्व प्रवाशांचे जीव तर गेले असतेच. तसेच संपूर्ण जगात पुन्हा एकदा हाहाकार माजला असता. त्याचप्रमाणे आदळविलेल्या विमानाचा मुख्य वैमानिक भारतीय असल्याने त्यानेच हे विमान आदळवून हल्ला केला काय, असा संशय प्रथमदर्शनी तरी जगात निर्माण झाला असता. कारण विमानाच्या कॉकपिटमध्ये नेमके काय घडले हे आता मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार जिवंत राहिल्याने आणि ओमानी वैमानिकाचे कारस्थान अयशस्वी ठरल्याने सर्वांना समजले आहे. हे विमान जर अन्य कोणत्यातरी इमारतीवर आदळविण्यात आले असते, तर हे समजूच शकले नसते किंवा समजण्यास खूप कालावधी लागला असता. तोपर्यंत, कॅप्टन स्मित मच्छार हेच प्रमुख दोषी मानले गेले असते. ते भारतीय असल्याने पाकिस्तानसारख्या देशाने भारताची बदनामी करण्याची संधी दवडली नसती. पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळणाऱ्या कुशक्ती भारतातही आहेतच. त्यांनीही या संधीचा गैरफायदा निश्चितच उठविला असता. म्हणजेच, भारताच्या वैमानिकाची काहीही चूक नसताना त्याला आणि भारताला नाहक बदनामीला तोंड द्यावे लागले असते. हे विमान खरोखरच आदळविण्यात आले असते, तर ते पूर्णत: भस्मसात झाले असते आणि त्याचा ब्लॅकबॉक्सही सुस्थितीत हाती लागण्याची शक्यता दुरापास्त होती. त्यामुळे कॉकपिटमध्ये नेमके काय घडत होते, हे समजणे आणखींच अशक्य झाले असते. असेच व्हावे, हेच कारस्थान होते की काय, असा संशय घेण्यास भरपूर जागा आहे. त्यामुळे आता त्या ओमानी वैमानिकाची कसून चौकशी होणे आवश्यक आहे. ही चौकशी सध्या सौदी अरेबियात होत आहे. भारतानेही या वैमानिकाची चौकशी भारताच्या तपास यंत्रणांकडून केली जाण्याची आग्रही मागणी केली पाहिजे. कारण, या प्रसंगात भारतीय वैमानिकही गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे भारताला अशी मागणी करण्याचे सबळ कारणही आहे. भारताची बदनामी करण्याचे हे जर व्यापक कारस्थान असेल आणि त्यात पाकिस्तानसारखा देश समाविष्ट असेल, तर ती बाबही जगासमोर यायला हवी. आज या शक्यता कदाचित कोणाला दूरच्या किंवा अतिरंजित वाटतील. पण त्या नाकारल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्या गृहीत धरुन त्या अंगाने सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. धर्मांध दहशतवादी संघटना, त्यांना पोसणारे देश आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या कुशक्ती कोणत्या थराला जातील, हे सांगता येणे अशक्य आहे. दहशतवादी हल्ल्यांचे विविध नवे मार्ग अलीकडच्या काळात शोधले जात आहेत. त्यातलाच हा प्रकार असू शकतो.