For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

राष्ट्रीय सुरक्षेची कसोटी!

06:27 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय सुरक्षेची कसोटी
Advertisement

अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारत आणि चीनचे सैनिक पुन्हा आमनेसामने येत असल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारत-तिबेट सीमा पोलिसांचे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनीच सीमावर्ती भागांतील संघर्षसदृश परिस्थितीची कबुली दिल्यानंतर या विषयाचे गांभीर्य अधिक वाढले. चीनच्या कुरापती, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत दोन्ही देशांतील परस्परविरोधी धारणा आणि सीमेवरील शांततेसाठी सुरू असलेली राजनैतिक चर्चा, या सगळ्यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.

Advertisement

यापरिस्थितीत सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी केलेले राजकारण हा स्वतंत्र मुद्दा असला, तरी देशाच्या सीमांवर नेमके काय घडत आहे, याचे उत्तर जनतेला सरकारकडून मिळालेच पाहिजे. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिह्यातील ताकसिंग परिसर आणि असाफिला यांसारखे भाग सामरिकदृष्ट्या संवेदनशील आहेत. जुलैच्या अखेरपासून या भागातील भारतीय आणि चीनी गस्ती पथकांमध्ये तणाव निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या घटनांमध्ये प्रत्यक्ष हिंसक चकमक झाल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. काही वृत्तांनुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबतच्या परस्परविरोधी दाव्यांमुळे दोन्ही देशांच्या गस्ती पथकांमध्ये वारंवार आमनासामना होतो. त्यामुळे प्रत्येक घटनेचे स्वरूप, ठिकाण आणि परिणाम यांची खातरजमा करूनच निष्कर्ष काढणे गरजेचे आहे. त्याचवेळी, सीमावर्ती भागांतील हालचालींकडे दुर्लक्ष करणेही परवडणारे नाही. भारताचे परराष्ट्र मंत्रालय या परिस्थितीवर राजनैतिक आणि लष्करी माध्यमांतून चर्चा सुरू असल्याचे सांगत आहे. चीनी सैन्याने प्रस्थापित गस्ती मार्गांपासून विचलित झाल्यास सीमावर्ती भागांतील परिस्थिती बिघडते, असे मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबतची समज अधिक स्पष्ट करणे, गैरसमज टाळणे आणि प्रलंबित प्रश्न सोडवणे, यावर दोन्ही देशांचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले. सीमावर्ती शांतता ही द्विपक्षीय संबंधांच्या विकासासाठी आवश्यक आहे, ही भूमिका योग्यच आहे. परंतु चर्चेचे दरवाजे खुले ठेवणे आणि सीमेवरील प्रत्येक आव्हानाला समर्थपणे सामोरे जाणे, या दोन गोष्टी परस्परविरोधी नाहीत. उलट, प्रभावी राजनैतिक चर्चेला भक्कम लष्करी तयारीची जोड असणे आवश्यक आहे. भारत-चीन सीमावादाचा इतिहास पाहिला, तर केवळ चर्चेने प्रश्न सुटलेला नाही, हे स्पष्ट होते. 1962 च्या युद्धानंतरही सीमारेषेच्या निश्चितीचा प्रश्न कायम आहे. चीन अरुणाचल प्रदेशला ‘दक्षिण तिबेट’ संबोधून त्यावर दावा करतो; भारताने हा दावा सातत्याने फेटाळला आहे. भारताची भूमिका स्पष्ट आहे की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे संपूर्ण सीमांकन झालेले नसल्याने काही भागांमध्ये परस्परविरोधी दावे कायम आहेत. या परिस्थितीचा फायदा घेऊन चीन आपल्या सीमावर्ती हालचालींमधून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, अशी भारताची चिंता आहे. म्हणूनच सीमावादाचा प्रश्न केवळ नकाशांपुरता मर्यादित नसून तो भारताच्या सार्वभौमत्वाशी आणि सामरिक हितसंबंधांशी जोडलेला आहे. 2020 मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाने चीनच्या धोरणाबाबत भारताला कठोर धडा दिला. त्यानंतर अनेक वर्षे दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू राहिली. ऑक्टोबर 2024 मध्ये देपसांग आणि देमचोक येथे गस्ती व्यवस्थेबाबत करार झाल्यानंतर त्या भागांतील संघर्षबिंदूंवरून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे भारत सरकारने संसदेत स्पष्ट केले. मात्र, एका भागातील तणाव कमी झाला म्हणजे संपूर्ण सीमेवरील प्रश्न सुटला, असा त्याचा अर्थ होत नाही. अरुणाचल प्रदेशातील सध्याच्या घडामोडी हेच वास्तव पुन्हा अधोरेखित करतात. चीनच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी भारताने सीमावर्ती पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते आणि संपर्कव्यवस्था, आधुनिक शस्त्रसज्जता, गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील समन्वय यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. आयटीबीपीचे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी ‘शौर्य’ कमांडो पथकांच्या कामगिरीचा गौरव केला आहे. आधुनिक युद्धपद्धतीत ड्रोन, प्रतिड्रोन यंत्रणा, प्रगत दळणवळण आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची क्षमता महत्त्वाची ठरते. हिमालयीन सीमेवर लढणाऱ्या जवानांना केवळ शौर्याच्या बळावर नव्हे, तर आधुनिक साधनसामग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि अखंड रसदपुरवठ्याच्या बळावरही सक्षम बनवावे लागेल. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधकांनी पंतप्रधान आणि संबंधित मंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर प्रश्न विचारणे हा विरोधकांचा अधिकार आहे. मात्र, प्रत्येक सीमावर्ती घडामोडीचा वापर राजकीय आरोप-प्रत्यारोपांसाठी करणेही योग्य नाही. त्याचवेळी, सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली माहिती देण्याचे संपूर्ण दार बंद ठेवणे अपेक्षित नाही. लष्करी कारवायांची गोपनीयता जपूनही परिस्थितीचे वास्तव, सरकारची भूमिका आणि उचलण्यात आलेली पावले जनतेसमोर मांडता येतात. जनतेला आश्वस्त करणे आणि शत्रूला संवेदनशील माहिती न मिळू देणे, या दोन्ही जबाबदाऱ्या सरकारने संतुलितपणे पार पाडल्या पाहिजेत. चीनशी संबंध सुधारण्यासाठी चर्चा मुळात आवश्यक आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.