For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियास हादरवणारा दहशतवादी हल्ला

06:47 AM Dec 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियास हादरवणारा दहशतवादी हल्ला
Advertisement

गेल्या रविवारी ऑस्ट्रेलियातील मोठे शहर सिडनीच्या बोंडी समुद्र किनाऱ्यावर ज्यू धर्मिय समुहावर गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात 10 ते 87 वयोगटातील 15 ज्यू नागरिकांचा मृत्यू झाला तर दोन पोलीस अधिकाऱ्यांसह 40 जण जखमी झाले. रविवारच्या संध्याकाळी बोंडी समुद्र किनाऱ्यावर ज्यू समुदाय ‘हनुक्का’ सण साजरा करण्यासाठी जमला होता. दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीकांविरुद्ध युद्ध जिंकून धर्माचरणावर लादलेल्या बंधनातून ज्यूनी स्वत:स मुक्त केले. त्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस आपल्याकडील दिवाळीसारखा दिवे लावून साजरा केला जातो. आठ दिवस साजऱ्या होणाऱ्या दिपोत्सवावर यंदा दहशतवादाची काळी सावली पडली. 20 मिनिटे सतत गोळीबार करणारी बंदुकधाऱ्यांची जोडी वडील व मुलाची होती हे विशेष आहे.

Advertisement

पोलिसांनी हल्लेखोरांवर केलेल्या गोळीबारात 50 वर्षीय वडील साजीद अक्रम जागीच ठार झाले. तर त्यांचा 24 वर्षीय हल्लेखोर मुलगा नावीद अक्रम गंभीर जखमी झाला. वडील व मुलगा धर्माने मुस्लीम आणि इस्लामिक स्टेट (इसीस) या दहशतवादी इस्लामी संघटनेशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांच्या गाडीत या संघटनेचे झेंडेही मिळाले आहेत. एका हल्लेखोरास जीवाची बाजी लावून पकडणारा 43 वर्षीय फळ दुकानदार अहमद अल अहमद हा देखील मुस्लीमच आहे. ही या घडामोडीतील लक्षणीय बाब म्हणावी लागेल. झटापटीत दोनदा गोळी लागल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो बरा होण्याच्या मार्गावर आहे. माध्यमांशी त्याचे वर्णन साहस नायक असे केले आहे. ट्रम्प आणि नेतान्याहू या नेत्यांनी त्याच्या धाडसाची प्रशंसा केली तर एका निधी संकलन आवाहनाद्वारे त्याला लोकांकडून दहा लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सची मदत मिळाल्याचेही वृत्त आहे.

ऑस्ट्रेलियाच्या एकूण 27 दशलक्ष लोकसंख्येपैकी ज्यू धर्मियांची संख्या दीड लाखांपर्यंत आहे. त्यातील 33 टक्के ज्यू सिडनीच्या पूर्व उपनगरांमध्ये राहतात. ज्यात बोंडीचा समावेश आहे. सामुहिक गोळीबारांच्या घटना तशा दुर्मिळ आहेत. 1996 साली टास्मानियातील पोर्ट आर्थर पर्यटन स्थळावर गोळीबार करुन एका बंदुकधाऱ्याने 35 लोकांचा बळी घेतला होता. आता घडलेली घटना त्यानंतरची सर्वात भीषण घटना म्हणून नोंदवली गेली आहे. सदर दहशतवादी हल्ल्यास ज्यू विरुद्ध मुस्लीम या अरब भूक्षेत्रातील ऐतिहासिक धर्म संघर्षाची किनार आहे. इस्त्रायल या ज्यू देशाच्या अरबभूमीवरील निर्माणापासून हा संघर्ष अधिकच तीव्र झाला. धर्म श्रेष्ठत्व, धर्म प्रसाद, भूमीवरील अधिकार,

Advertisement

पॅलेस्टाईन देश निर्मितीस जागतिक ज्यू लॉबीचा विरोध, हमास हल्ला, गाझा युद्धातील इस्त्रायली हिंसाचार असे अनेक पैलू काळाच्या ओघात ज्यू मुस्लीम विद्वेष वाढण्यास कारणीभूत ठरले आहेत. हमास, हिजबुल्ला, इसीस, अल्कायदा या इस्लामी दहशतवादी संघटनांचे भरण-पोषण करण्यात ज्यू-मुस्लीम विद्वेषाचा मोठा वाटा आहे. दहशतवादाचा मुद्दा पूरवून धार्मिक विद्वेष भडकावणाऱ्या मूळ कारणांचे जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत या क्रौर्यात निष्पाप लोकांचे बळी जातच राहतील, अशी परिस्थिती आहे. बोंडी हिंसाचारातील दहशतवाद्यांची चौकशी केली असता पोलिसांना असे आढळले की, ते गोळीबारापूर्वी फिलीपिन्सला जाऊन आले होते. फिलीपिन्सने अलीकडच्या काळात इस्लामी स्टेटच्या दहशतवाद्यांशी बराच काळ संघर्ष केला आहे. मरावी शहर ताब्यात घेण्याइतकी तेथे दहशतवाद्यांची मजल गेली होती. बोंडी हल्ल्यातील दहशतवादी बाप-लेक तेथूनच हल्याची प्रेरणा घेऊन आल्याची शक्यता यामुळे बळावली आहे. दहशतवादाचे स्वरुप अशाप्रकारे पॅनइस्लामिक असल्याने त्याचा उपसर्ग जगात कोठेही होऊ शकतो.

सध्या ऑस्ट्रेलियास आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका हे सारेच खंड कमीअधिक फरकाने दहशतवादाने ग्रस्त आहेत. जगातील साऱ्या देश गटांच्या परिषदात दहशतवादाचा मुद्दा अग्रक्रमांकावर असतो. परंतु तो थोपवायचा व नष्ट कसा करायचा या संदर्भातील रणनीती मात्र एकवाक्यता साधत प्रभावीपणे कार्यरत होताना दिसत नाही. देशांतर्गत धर्मवादी राजकारण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हितसंबंधाचे राजकारण प्रत्यक्ष कृतीत कोलदांडा घालताना दिसते. धर्माधारित राजकारण व समाजकारण, अंमली पदार्थांचा व्यापार, गुप्तचर यंत्रणेची निष्क्रियता, अल कायदा, इसीस सारख्या दहशतवादी संघटनांचा अमेरिकेसारख्या महासत्तेकडून भू राजनैतिक कारणांसाठी वापर हे सारे घटक दहशतवादाशी जोडले गेले आहेत. या शिवाय ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोपमधील शस्त्रास्त्र लॉबी व तिचा राजकारणावरील प्रभाव दहशतवादास हत्यार मिळवून देणारा ठरतो आहे. शस्त्रांचा अवैध व्यापार आणि सहजप्राप्त शस्त्रs हे त्याचेच फलीत आहे. शस्त्रासंबंधीचे हे वास्तव्य ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने अधिकच गडद झाले आहे. 1996 च्या पोर्ट ऑर्थर हत्याकांडानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाच्या रुढीवादी तत्कालीन सरकारने बंदुक लॉबीचा प्रभाव झुगारुन बंदूक खरेदीदारांवर निर्बंध लादले. बंदुकांच्या देशपातळीवरील संख्येत त्यामुळे झपाट्याने घट झाली.

या दरम्यान राज्यांनी केंद्र सरकारशी सहकार्य करुन परवाना तरतूद कठोर केल्या. बंदुकधाऱ्यांना मालकीचे खरे कारण दाखवून नियमित नुतनीकरणाचे बंधन घातले. तथापि, सुरूवातीच्या उत्साहानंतर काळाप्रमाणे शिथीलता येत जाते, असे अंमलबजावणीच्या बाबतीत घडले. पोर्ट ऑर्थर दुर्घटनेस आता तीन दशके होत आली आहेत. दरम्यानच्या काळात लोकसंख्याही वाढली आणि त्यानुसार दरडोई बंदुकांची संख्याही वाढली. सध्या देशभरात दर आठवड्यास किमान दोन हजार नव्या बंदुका कायदेशीररित्या दिल्या जातात. 1996 मध्ये चांगल्या हेतुने केलेल्या शस्त्रास्त्र कायद्यातील सुधारणांना ऑस्ट्रेलियात प्रचंड सार्वजनिक व राजकीय पाठिंबा मिळाला असला तरी या निमित्ताने करण्यात आलेले कायदे अद्याप पूर्णपणे अंमलात आलेले नाहीत.

उदाहरणार्थ वचन दिलेले राष्ट्रीय नोंदणीपत्र अजूनही अस्तित्वात आलेले नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर समान व सुसंगत कायद्यांऐवजी ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कायदे आहेत. परिणामी नियंत्रणात विसंगती आणि आंतरराज्यीय स्तरावर अवैध वापरासाठी पळवाटा निर्माण झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियात आज नागरिकांकडे वापरासाठी जवळपास 40 लाख बंदुका आहेत. 25 वर्षांपूर्वी नोंदवलेल्या संख्येपेक्षा ही संख्या दुप्पट आहे. यामुळेच ऑस्ट्रेलियातील बंदुक लॉबी दीर्घकाळ चाललेल्या बंदुकविरोधी कडक कारवाईस निष्पभ्र केल्याचा अभिमान बाळगत बंदूक मालकांना लॉबीचा उद्योग वाढवण्यासाठी राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय होण्याचे आवाहन करत आहे. रविवारी झालेल्या बोंडी हल्ल्यानंतर पोलिसांनी अशी माहिती दिली की, गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी एक नोंदणीकृत मालक होता व त्याच्याकडे कायदेशीररित्या मिळवलेल्या सहा बंदुका होत्या. बोंडी दहशतवादी हल्ल्याच्यानंतर कायदा व अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियन सरकारपुढे नव्याने उभे ठाकले आहे. बोंडी दहशतवादी हल्ला भारतातील पहलगाम व दिल्ली कार बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ल्याप्रमाणे गुप्तचर व सुरक्षाव्यवस्थेचे अपयशही मानले जात आहे. बाप-लेक हल्लेखोर जोडगोळीतील लेक नावीद अक्रम या तरुणास 2019 साली

ऑस्ट्रेलियन सुरक्षा व गुप्तचर विभागाच्या चौकशीस सामोरे जावे लागले होते. कालांतराने या विभागाने त्याच्यापासून धोका नसल्याचे मानत त्याच्यावरची पाळत मागे घेतली. बाप साजीद अक्रम तब्बल दहा वर्षे परवान्यासह सहा बंदुका बाळगून होता. त्यावर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष नव्हते. गाझा युद्धानंतर ज्यू धर्मियांविरुद्ध द्वेष वाढीस लागला होता. मारहाण नासधूस विद्वेषी घोषणा व बॅनरबाजी अशा 166 घटनांची नोंद या संदर्भात झाली होती. यातून बोध घेऊन सुरक्षेचे योग्य उपाय केले असते तर कदाचित बोंडी हत्याकांड टळलेही असते.

या दहशतवादी हल्याच्या सुमारास घडलेली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हजारभर ज्यू जमावास सुरक्षा पुरवण्यासाठी केवळ चार पोलीस तैनात होते. त्यानंतर 20 मिनिटे सतत सुरू असलेल्या हल्ल्यास प्रतिगोळीबाराने उत्तर देण्याऐवजी पोलीस गोठलेल्या स्थितीत स्तब्ध उभे होते. हल्लेखोर बंदुका पुन्हा भरुन सज्ज करत होते. पण पोलिसांचा तत्काळ प्रतिकार नव्हता. हाकेच्या अंतरावर एक पोलीस ठाणे असूनही परिस्थिती हाताळण्यास विलंब झाला. पोलीस प्रशिक्षणाची गरज त्याच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता या कमतरताही बोंडी हल्ल्याने उघड केल्या.

                                अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.