तीन कोटी रुपयांचा ‘टॅटू’
सध्याच्या काळात भारतातही अंगावर ‘टॅटू’ काढून घेण्याचे फॅड वाढत आहे. विदेशांमध्ये तर गेल्या 50 वर्षांपासून आहे. काही ‘सणकी’ वृत्तीचे लोक इतरांना ते कसे दिसेल याची तमा न बाळगता साऱ्या आंगभर चित्रविचित्र आकाराचे टॅटू काढून घेतात आणि ते मिरवतात. पूर्वीच्या काळात महिलांच्या कपाळावर हलक्या हाताने सुई टोचून कपाळ गोंदविले जात आहे. याच कृतीचा आधुनिक आविष्कार ‘टॅटू’ हा आहे. काही तऱ्हेवाईक छंदीष्ट या टॅटूसाठी वाटेल तितका पैसा खर्च करण्यासही राजी असतात. कॅनडातील रोमी स्कोफील्ड नामक व्यक्तीने आपल्या अंगावर काढून घेतलेला टॅटू सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या टॅटूसाठी त्याने तब्बल 3 कोटी 40 लाख रुपये ओतलेले असल्याचे दिसून येते.
गेली कित्येक वर्षे तो आपल्या अंगावर टॅटू काढून घेत आहे. आता त्याच्या शरीराचा चेहरा वगळता एकही भाग असा राहिलेला नाही, की ज्यावर टॅटू काढलेला नाही. आपल्या या छंदाचा त्याला अभिमान आहे. टॅटू काढून घेण्याचा छंद त्याला 2001 पासूनच जडला आहे. यामागे त्याचा कोणताही विशिष्ट हेतू नसल्याचे तो स्पष्ट करतो. हा त्याच्या कोणत्याही अभियानाचा किंवा सार्वजनिक प्रचाराचा भाग नाही. केवळ त्याचा छंद आहे. 2001 मध्ये त्याने आपल्या चेहऱ्यावर छोटे गोंदकाम करुन घेतले होते. 2009 नंतर त्याचा छंद फारच वाढला. 2009 मध्ये त्याने आपल्या मुलाचे नाव आपल्या अंगावर गोंदवून घेतले. टॅटू काढून घेण्यास प्रारंभ केल्यापासून आपल्या जीवनाची दिशा परिवर्तीत झाली आहे. आपल्याला अधिक आंनदी वाटत आहे. त्यामुळे टॅटू आपल्या जीवनाचा एक भागच बनला आहे, असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या कुटुंबियांना त्याचे हे टॅटूप्रेम फारसे आवडत नाही. पण, त्याला ते विरोध करत नाहीत. आपल्या अंगावर सर्वाधिक टॅटू काढून घेतलेला व्यक्ती, अशी आता त्याची जगात ख्याती झाली आहे. त्याचा जणू हा एक जागतिक विक्रमच आहे, असे मानले जात आहे. टॅटूकाम करताना वेदना सहन कराव्या लागतात. सर्वाधिक वेदना शरीराच्या नाजूक भागांवर हे काम करताना आपल्याला जाणवल्या, असे त्याचे म्हणणे आहे. काही अवयवांवरील टॅटूमुळे त्याला आजही वेदनांना तोंड द्यावे लागत आहे. तथापि, आपल्या या अनोख्या छंदापोटी तो या वेदना सहन करतो. तसेच प्रचंड पैसाही खर्च करतो. हौसेला मोल नाही, अशी म्हण आहे. ती त्याच्या संबंधात खरी आहे.