For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गडहिंग्लजच्या ए. टी. फाऊंडेशनचा फुटबॉल विकास प्रकल्प प्रेरणादायी  

01:34 PM Dec 09, 2024 IST | Pooja Marathe
गडहिंग्लजच्या ए  टी  फाऊंडेशनचा फुटबॉल विकास प्रकल्प प्रेरणादायी  
A.T. Foundation's Football Project Inspires Gadhinglaj
Advertisement
दहा गावांमधील मुलींना सरावसाठी प्रत्येकी 20 ते 25 हजार ऊपयांचे फुटबॉल साहित्य वाटप, गेल्या दोन महिन्यांपासून प्रशिक्षक देताहेत फुटबॉलचे धडे  
कोल्हापूर
गडहिंग्लजमधील ए. टी. फाऊंडेशनकडून दहा खेडेगावांमधील मुलींमध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या फुटबॉल विकास प्रकल्पाने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. फुटबॉलचे धडे घेत असलेल्या दहाही गावांमधील मुलींना सरावासाठी 25 ते 30 हजार ऊपये किंमतीचे प्रत्येकी 3 फुटबॉल, फायबरचे गोलखांब, फुटबॉल टीशर्ट, र्शाट आणि लाँग स्प्रींटसाठी लागणाऱ्या वस्तू आदी साहित्यांचे वाटप केले. गावांगावामधील सरपंच व ज्या गावांतील शाळांमधील मुली फुटबॉलचे धडे घेताहेत, त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी फुटबॉल साहित्य स्वीकारले.
माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू व आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक अंजू तुरंबेकर  व सहकाऱ्यांनी ग्रामिण भागातील मुला-मुलींमध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी दोन वर्षापूर्वी ए. टी. फाऊंडेशन स्थापन केले आहे. ठिकठिकाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून मुला-मुलींसाठी अनेक फुटबॉल प्रशिक्षण शिबीरांचे आयोजनही केले. या शिबीरांमधून फुटबॉल विकास प्रकल्प राबवण्याची संकल्पना पुढे आली. कालांतराने ही संकल्पना गडहिंग्लज, आजरा व भुदरगड तालुक्यातील 10 गावांमधील मुलींसाठी राबवण्याचे ठरले. त्यानुसार तिन्ही तालुक्यातील महागाव, कडाल, हिडदूगी, धामणे, लिंगनूर, आर्दाळ, बेकनाळ, कडगाव, उत्तूर व मासेवाडी या गावांची निवड केली. गेल्या दोन महिन्यांपासून दहाही गावांमध्ये तेथील ग्रामपंचायती व शाळांच्या माध्यमातून फुटबॉल विकास प्रकल्पअंतर्गत मुलींना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ए. टी. फाऊंडेशनचे बोर्ड मेंबर अनिल पाटील व अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वेल ट्रेन असलेले फुटबॉल प्रशिक्षक दहाही गावांमध्ये जाऊन मुलींना फुटबॉलचे प्रशिक्षण देऊ लागले. आजमितीला प्रत्येक गावातील 20 मुली फुटबॉलचे प्रशिक्षण घेत आहेत.
सध्या आर्दाळ गावात अक्षय पावले, हर्षिता चव्हाण, कडाल गावात वैभवी पाटील, हिडदुगी गावात सानिका रेडेकर, महागावात आकाश पाटील, मासेवाडीत अशितोष घबाडे, सुजल घबाडे, बेकनाळ गावात शैलेश दळवी, आकाश पाटील, धामणे गावात सिद्धी भोसले, ज्ञानेश्वरी मगदूम, श्रूती दिवेंडेकर, लिंगनुर गावात शैलेश दळवी, आकाश पाटील, उत्तुर गावात तेजस वांजोळे, ऋषभ किनिंगे, कडगाव गावात शैलेश दळवी, आकाश पाटील हे प्रशिक्षक प्रशिक्षण देण्याचे काम करताहेत. या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दहाही गावात सराव करत असलेल्या मुलींना आता प्रत्येकी फुटबॉल, फायबरचे गोलखांब, फुटबॉल टीशर्ट, र्शाट आणि लाँग स्प्रींटसाठी लागणाऱ्या वस्तू आदी साहित्यांचे वाटप केले आहे. त्यामुळे सरावाला आणखी गती मिळणार आहे. येत्या वर्षभरात सर्वच मुलींना दमदार फुटबॉलपटू बनवण्याचे लक्ष्य असल्याचे फाऊंडेशनचे अनिल पाटील यांनी सांगितले.
आगामी काळात ए. टी. फाऊंडेशन आणि अॅडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांसह मुलींना फुटबॉलपटू बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. एखादा निर्णय झटपट घेण्याची क्षमताही खेळाडूत निर्माण करत असतो. मानसिक व शारीरिक संतुलनही चांगले ठेवतो, असे ही अंजू तुरंबेकर यांनी सांगितले.
Advertisement
Advertisement
Tags :

.