मृत्यूच्या लाटांमध्ये बुडालेली व्यवस्था
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणात घडलेली क्रूझ दुर्घटना ही केवळ एक अपघात म्हणून पाहता येणार नाही; ती आपल्या प्रशासकीय व्यवस्थेच्या ढिसाळपणाची, निष्काळजीपणाची आणि मानवी जीवाबद्दलच्या उदासीनतेची भयावह साक्ष आहे. काही क्षणांपूर्वी आनंदात मग्न असलेले पर्यटक, आणि पुढच्याच क्षणी पाण्याच्या लाटांमध्ये गडप होणारे जीव हा विरोधाभास केवळ हृदयद्रावक नाही, तर अंतर्मुख करणारा आहे.
यादुर्घटनेत अनेक निरपराध नागरिकांनी जीव गमावला. मात्र आकड्यांच्या पलीकडे जाऊन पाहिले, तर ही मानवी वेदनांची एक खोल दरी आहे. कुटुंबांसोबत आलेले पर्यटक, लहान मुले आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी निघालेले लोक हे सर्व अचानक मृत्यूच्या छायेखाली आले. आपल्या मुलाला घट्ट बिलगुन शेवटच्या क्षणापर्यंत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारी माता आणि तिचे अपयशी प्रयत्न संपूर्ण देशाच्या काळजाला धक्का देऊन गेले आहेत. लोक म्हणताहेत भारतातील अनेक दुर्घटना या “अपघात” नसून, त्या “होणारच होत्या” अशा प्रकारात मोडतात. म्हणजेच, नियमांचे उल्लंघन, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि निष्काळजीपणाची साखळी आधीपासूनच अस्तित्वात असते; दुर्घटना ही त्याची केवळ परिणती असते. जबलपूरमध्येही हेच चित्र दिसून आले. बोटीवरील सुरक्षाविषयक उपाय अपुरे होते, लाइफ जॅकेट्सची योग्य व्यवस्था नव्हती किंवा ती प्रभावीपणे वापरली गेली नाहीत आणि हवामानातील बदलांकडे आवश्यक तेवढे गांभीर्याने पाहिले गेले नाही. गुजरातमधील मोरबी झुलता पूल कोसळण्याची घटना असो किंवा बैसारण येथे झालेला अतिरेकी हल्ला या दोन्ही घटनांनी भारतातील पर्यटन व्यवस्थेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न आधीच उपस्थित केले. एका ठिकाणी तांत्रिक व प्रशासकीय निष्काळजीपणा तर दुसऱ्या ठिकाणी सुरक्षेतील त्रुटी; परंतु दोन्हींचा परिणाम एकच होता निष्पाप पर्यटकांचा मृत्यू. या घटनांची छाया अजूनही पुसली गेलेली नाही, आणि त्यातच मध्य प्रदेशातील दुर्घटना ही त्याच मालिकेतील आणखी एक वेदनादायी दुवा ठरते. याहून गंभीर बाब म्हणजे संकटाच्या क्षणी जबाबदारी स्वीकारण्याऐवजी गोंधळ आणि विस्कळीतपणा अधिक दिसून आला. काही अहवालांनुसार, बचावकार्य उशिरा सुरू झाले, तर काही ठिकाणी समन्वयाचा अभाव जाणवला. अशा परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो; परंतु व्यवस्थेतील त्रुटींमुळे तो वेळ वाया गेला आणि त्याची किंमत मानवी जीवांनी चुकवली. ही घटना केवळ स्थानिक प्रशासनापुरती मर्यादित नाही; ती संपूर्ण देशाच्या “सुरक्षित पर्यटन” या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उभी करते. भारतात पर्यटन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात, नवीन प्रकल्प राबवले जातात, आणि आकर्षक जाहिराती केल्या जातात. मात्र या सगळ्या चमकदार चित्रामागे मूलभूत सुरक्षेच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते, हे वास्तव आहे. तथापि, या घटनेत समाजाची भूमिकाही पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही. अनेकदा नागरिक स्वत:ही सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करतात. लाइफ जॅकेट घालणे, सूचनांचे पालन करणे किंवा संभाव्य धोके ओळखणे या बाबतीत हलगर्जीपणा दिसून येतो. आनंदाच्या क्षणांमध्ये सावधगिरी हरवते आणि त्याची किंमत मोठी मोजावी लागते. अंतिम जबाबदारी ही व्यवस्थेचीच असते. दुर्घटनेनंतर प्रशासनाने काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली, चौकशी केली. परंतु हा पॅटर्न नवा नाही. प्रत्येक मोठ्या अपघातानंतर काही दिवस चर्चा रंगते, दोषींवर तात्पुरती कारवाई होते आणि नंतर सर्व काही विस्मरणात जाते. याचबरोबर, या घटनेने एक वेगळाच प्रश्न समोर आणला आहे आपण दु:खालाही ‘व्हायरल’ करण्याच्या प्रवृत्तीला बळी पडत आहोत का? सोशल मीडियावर भावनिक फोटो, अप्रमाणित माहिती आणि अफवा वेगाने पसरतात. सहानुभूतीपेक्षा सनसनाटीपणाला अधिक महत्त्व दिले जाते. हे केवळ असंवेदनशील नाही, तर पीडितांच्या वेदनेचा अपमानही आहे. जबलपूर दुर्घटना आपल्याला एक स्पष्ट संदेश देते की, मानवी जीवाची किंमत केवळ शब्दांत मोजता येत नाही. ती कृतीतून सिद्ध करावी लागते. नियमांची काटेकोर अंमलबजावणी, जबाबदारीची जाणीव आणि नागरिकांची जागरूकता या तिन्ही गोष्टींचा समन्वय झाला, तरच अशा दुर्घटना टाळता येतील.