गुढी आशेची आणि विश्वासाची
अनादी आणि अनंत काल माणसाच्या आवाक्यात मावला नसेल तेव्हा त्याने सूर्याचे उगवणे आणि मावळणे हे एकक धरून काळ आपल्या हिशेबात आणला असणार. त्यातून सारी कालगणना तर उभी राहिलीच, परंतु माणसाच्या मेंदूला काळ नावाच्या परिमाणाचे भान आले. खगोलापासून भौतिकीपर्यंत कितीतरी विषयांना त्याचा मूलाधार लाभला. काळाचे भान स्वत:च्या नावापुरतेच ठेवणाऱ्या कितीतरी भारतीय राजांनी स्वत:च्या नावाने कालगणना सुरू केली. त्यातली कोणती आपल्याला आठवते? गुलामगिरीच्या अंधारात महाराष्ट्र धर्माचे तेज निर्माण करणाऱ्या एखाद्या शिवरायांनाच नवा शक सुरू करणे शोभते. त्यांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने इ. सन. 1674 मध्ये सुरू केलेला शक महाराष्ट्राने लक्षात ठेवावयाचा म्हंटले तर त्या शकामागे उभी असलेली शिवरायांची पुण्याई, चतुरस्त्र कर्तबगारी, त्यांची महाराष्ट्र धर्माची जाज्वल्य निष्ठा आणि बहुत जनांसी आधारु ही प्रतिमा हे सारे आठवावे लागेल.
शिवरायांच्या नावाने शक मोजावा आणि काळाच्या अविरत साखळीत आपला दुवा त्यांच्या नावाने जोडावा, इतपत तरी आपण त्यांच्या नावाची आणि कीर्तीची पत सांभाळून ठेवली आहे का याचाही ताळा मांडावा लागेल. शिवरायांनी जसा नवा मनू घडविला तसे स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी खऱ्या अर्थाने एक नवा शक सुरू झाला. हा शक मनाशी मोजावयाचा, तर असंख्य स्वातंत्र्यविरांची आणि सैनिकांची बलिदाने स्मरावी लागतील. 15 ऑगस्टपासून स्वतंत्र भारताने उजळ माथ्याने सुरू केलेली नवी कालगणना म्हणजे गुलामीच्या अंधारयुगाला दिलेला कायमचा निरोप. महाराष्ट्रापुरते बोलायचे म्हटले तर 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश मुंबईत आला. त्या दिवशी मराठी माणसांचे नवयुग चालू झाले. दर 1 मे रोजी आपण या मराठी शकाची पुढली पायरी ओलंडतो तेव्हा या शककर्त्या अनाम लढवय्याची आपल्याला आठवण होते का? त्या साऱ्या जिवावर उदार होऊन लढलेल्या वीरांना खरेच कशासाठी संयुक्त महाराष्ट्र हवा होता? त्या शतकर्त्यांची स्वप्ने आपल्या डोळ्यांत अजून उरली आहेत का?
1 मे 1960 रोजी झालेल्या महाराष्ट्र-शक असो की 1920 वर्षापूर्वी आरंभ झालेला शालिवाहन शक. प्रत्येक शकाच्या आरंभाने शुभ-वर्तमानाला सुरुवात होत असते. गुढी पाडव्याशी जोडली गेलेली सर्वात लोकप्रिय कथा तर रामाशीच निगडित आहे. युद्धाच्या, राक्षसांच्या प्राबल्याचा, वनवासाचा आणि दुराव्याचा कालावधी संपून नवे रामराज्य पाडव्याला सुरू झाले, असे मानले जाते. श्री रामाच्या स्वागतासाठी अयोध्या वासियांनी सडे शिंपले, घरे शृंगारली, गुढ्या तोरणे उभारली आणि आनंदोत्सव साजरा केला तो दिवस होता चैत्र प्रतिपदेचा. खरं तर आयोध्यावासियांनी जेवढे रामाचे स्वागत केले तेवढेच भरताचेही केले. कारण रामाच्या गैरहजेरीत भरत आयोध्यच्या बाहेर एका आश्रमात राहून राज्य चालवित होता. सिंहासनावर होत्या त्या रामाच्या पादुका. रामाच्या अयोध्येतील येण्याचा उत्सव व्हावा आणि या उत्सवाचे स्मरण दरवर्षी साऱ्या भारत वर्षात गुढ्या उभारून त्याच प्रमाणात व्हावे यात नवल काहीच नाही. गुढी पाडव्याच्या सणात राम कथेची गोडी मिसळलेली असल्याने भारतीयांनी या सणाला वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानावे, हेही ओघाने आलेच! पाडव्यालाच राम नवरात्रीची सुरुवात असते. चैत्र शुद्ध नवमी ही रामनवमी-रामाची जन्म तिथी. महाराष्ट्रात कीर्तनाचे कार्यक्रम 9 दिवस चालतात. पाडव्याच्या गुढीला एवढे महत्त्व येणं भारतातील जनमनावर असलेला राम कथेचा विलक्षण प्रभाव हे महत्त्वाचे कारण आहे. भारतीयांच्या हृदयाचे स्पंदन (रामायणाच्या) अनुस्थूभ छंदात चालते, असे डॉ. राम मनोहर लोहिया म्हणतात. पाडव्याला पाणपोई घाला व ती सर्वांना खुली करा, असेही शास्त्रवचन आहे (या वचनाचा अर्थ व्यापक करून खरे तर कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा, मोहीम आखून त्वरित गैबियन, भूमिगत आदी बंधारे बांधावयास पाडव्याला सुरुवात करा असे म्हटले पाहिजे).
पाडव्याचे महत्त्व सांगणाऱ्या या कथांचे सारतत्व अशुभ काळाला निरोप आणि शुभ काळाचे स्वागत असे आहे. माणसांचे आशेचे आणि विश्वासाचे दर्शन अशा कथांमधून व रुढीमधून घडते. नवं वर्ष म्हणजे नवी सुरुवात, नवी उमेद, नवा उल्हास आणि असं नव्या वर्षाचं स्वागत करताना स्मरण करायचं ते सत्यानं असत्यावर मिळविलेल्या विजयाचं, तसंच आताही होईल, या विश्वासानं गुढीला जरीचे वस्त्र नेसवांयचे, तोंड गोड करावयाचे आणि सडा शिंपून अंगणातील व मनावरची धूळ झटकायची. विस्कटलेली सारी चित्रं विसरून रांगोळी मात्र सुबक काढायची आणि निरांजन पेटवायचं तेही आशा तेवती ठेवणारं. भारतीय समाजाची सामूहिक जिजिविषा भलतीच तीव्र असली पाहिजे त्याशिवाय एवढा प्रदीर्घ काळ ही संस्कृती वाहात राहिली कशी?
- डॉ. चंद्रकांत कुलकर्णी