For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिडीतील वृद्ध दाम्पत्याच्या आत्महत्याप्रकरणी सूरतमधून एका संशयिताला अटक

12:16 PM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
बिडीतील वृद्ध दाम्पत्याच्या आत्महत्याप्रकरणी सूरतमधून एका संशयिताला अटक
Advertisement

डिजिटल अरेस्ट करून दिला होता मन:स्ताप : दोन मोबाईल जप्त

Advertisement

बेळगाव : डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांच्या त्रासाला कंटाळून बिडी (ता. खानापूर) येथील एका वृद्ध दांपत्याने पंधरा दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सूरत-गुजरात येथील एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी रात्री ही माहिती दिली आहे. चिराग जिवराजभाई लक्कड (वय 30) राहणार सूरत-गुजरात असे त्याचे नाव आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी जिल्हा सीईएनचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या युवकाची कसून चौकशी करून त्याला कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी नंदगडलाही नेण्यात आले आहे. सायबर गुन्हेगारांच्या छळामुळे बिडी येथील डियागो संतान नजरत (वय 83) व त्यांची पत्नी फ्लाविया डियागो नजरत (वय 78) या वृद्ध दांपत्याने दि. 27 मार्च रोजी आपले जीवन संपविले होते. यासंबंधी नंदगड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा सीईएन पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत उतरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीसप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्ध दांपत्याच्या एसबीआयच्या खात्यातून 6 लाख 10 हजार रुपये आयडीएफसी बँकेच्या बालाजी इंडस्ट्रीज या खात्यावर ट्रान्स्फर झाले होते. या बँक खात्याला जो मोबाईल नंबर लिंक करण्यात आला होता, तो चिराग लक्कडकडे होता. ही रक्कम त्याने आपल्याजवळील मोबाईलवरून वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी सूरतमधून त्याला अटक केली आहे. त्याच्याजवळून या कृत्यासाठी वापरण्यात आलेले दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. चिराग केवळ या प्रकरणाचा एक दुवा आहे. पोलिसांनी अद्याप डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून वृद्ध दांपत्याला छळणाऱ्या सायबर गुन्हेगारांपर्यंत पोचावे लागणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.