बंद घरे फोडणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट
दुष्काळजन्य स्थितीमुळे एकीकडे कोकणवासीयांना पाण्याची चिंता सतावत असताना दुसरीकडे बंद घरे फोडणाऱ्या चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे कोकणवासीयांची झोप उडाली आहे. घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आपण कामानिमित्त बाहेर जाताना घर सुरक्षित राहील की नाही याची खात्री त्यांना राहिलेली नाही. मागील तीन दिवसातच खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि मालवण तालुक्यातील जवळपास 15 बंद घरे फोडून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे.
आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कामांनिमित्त अनेक कुटुंबांना घराबाहेर जावे लागते. कोकणात बंद घरांची संख्याही जास्त आहे. मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांमध्ये नोकरी व्यवयासानिमित्त कार्यरत असलेले कोकणवासीय सणासुदीला किंवा सुट्ट्यांमध्ये गावी येतात. इतरवेळी मात्र त्यांचे बंगले प्रदीर्घ कालावधीसाठी कुलुपबंद असतात. असे बंद बंगले किंवा घरांची अत्यंत बारकाईने रेकी करून चोरटे संधी मिळताच डाव साधतात. निवासी संकुलांमधील बंद फ्लॅटदेखील त्यांच्या निशाण्यावर असतात.
सध्या या चोरट्यांनी पुन्हा एकदा कोकणात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नुकतेच खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व संकुलातील बंद असलेले लगतचे दोन बंगले फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केला. त्यानंतर सोमवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील पाच तर मालवण तालुक्यातील कट्टा येथील तब्बल आठ बंद बंगले फोडल्याचे उघडकीस आले. त्याचप्रमाणे चिपळुणात घर फोडून 1 लाख 30 हजार रुपयांचे दागिने लांबवले गेले आहेत. आठ दिवसांपूर्वीच लांजा तालुक्यात एका तरुणाने सोन्याचे दागिने लुटण्यासाठी एका 75 वर्षीय वृद्धेचा खून केला. या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला 12 तासांच्या आत गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. या कामगिरीसाठी पोलिसांचे कौतुक झाले. मात्र चोरीच्या अन्य गुन्ह्यातील अज्ञात आरोपी पकडता न आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
चोरट्यांनी मागील काही दिवसात केवळ रोख रक्कम किंवा दागिनेच चोरलेले नाहीत तर चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे एका कंटेनरमधून सुमारे पावणेदोन लाखाची औषधेदेखील चोरलेली आहेत. 20 दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील पाली आणि खेड तालुक्यातील भरणे येथे चोरट्यांनी भर दिवसा दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान चोरी केली होती. पालीतील चोरीत चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून 6 लाख 80 हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. तर भरणेत दोन सदनिका फोडून 8 लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. चोरीची ही वाढती प्रकरणे पाहता सराईत चोरटे नक्कीच पोलिसांच्या एक पाऊल पुढे असल्याचे स्पष्ट होते.
चोरट्यांना ना दिवसा असलेल्या रहदारीची भीती वाटते ना रात्रीच्यावेळी पोलिसांच्या गस्तीची. रात्रीच्यावेळी संशयास्पदरित्या फिरणारे चोरटे पोलिसांना कसा काय चकवा देतात हेच सर्वांना कळेनासे झाले आहे. अपवादात्मक स्थितीत संशयित पोलिसांच्या हाती लागलेदेखील आहेत. पण चोरीच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण मोठे नाही. चोरटे पोलिसांपेक्षा हुशार बनले आहेत, असे म्हणायची वेळ आली आहे. पोलिसांची रात्रीची गस्त तितकीशी प्रभावी नाही हे सातत्याने उघडकीस येणाऱ्या चोरीच्या प्रकरणांमुळे दिसून येते आहे. पोलीस दलातील प्रमुखांना या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
कोकणात रेल्वे आल्यानंतर घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण नोंदवले जाते. परंतु, महामार्ग आणि रेल्वेसारख्या आदी गतिमान दळणवळणाच्या सोयींमुळे चोरट्यांना पोबारा करणे सोपे जाते असे म्हणून चोरांना मोकाट सोडणे योग्य नाही. वेळीच त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. चोरटे एखाद्या शहरात काही दिवस किंवा आठवडाभर राहून दिवसरात्र ठराविक भागात रेकी करतात. त्यानंतर काळजीपूर्वक आपले लक्ष्य निश्चित करतात. सराईत चोरटे परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेची फारशी चिंता करत नाहीत. पोलिसांच्या गस्तीचा ते चांगला अभ्यास करतात. म्हणूनच ते रंगेहाथ पोलिसांच्या तावडीत सापडत नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे. परंतु, चोरटे जर स्थानिक परिस्थिती आणि पोलीस गस्तीचा योग्य अंदाज घेत असतील तर पोलीस यंत्रणेबरोबरच स्थानिकांनीही संशयास्पद व्यक्तींचा योग्यवेळी अंदाज येण्याच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.
चोरीच्या वाढत्या घटना पाहता पोलिसांची रात्रीची गस्त केवळ कागदावरच आहे का, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. परंतु बऱ्याचदा वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या फार तोकडी असल्याचे जाणवते. अतिरिक्त कामाचा ताणही त्यांच्या कामगिरीवर परिणाम करतो. मात्र त्यामुळे चोरटे किंवा गुन्हेगारांना रान मोकळे होत असेल तर गृहखात्याने त्यावर सक्षम उपाय शोधलाच पाहिजे. पोलीस खात्याने आपल्या अडचणी सांगून चालणार नाही. कारण त्यांच्यावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त केली गेली पाहिजे. जेणेकरून इतर तपासांचा ताण त्यांच्यावर राहणार नाही. त्याचप्रमाणे चोरीच्या गुन्ह्यांचा तपास आणि आरोपपत्र तांत्रिकदृष्ट्या इतके भक्कम असायला हवे, की चोरट्याला जास्तीतजास्त शिक्षा झाली पाहिजे. तो पुन्हा चोरी करणार नाही, एवढे कडक शासन त्याला व्हायला हवे. कारण चोरीच्या गुन्ह्यात एकदा कारवाई झालेले अनेक संशयित पुन्हा चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्याची उदाहरणे आहेत. एकूणच कोकणात बंद घरांची वाढती संख्या आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या घरफोड्या यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. चोरट्यांना वेसण घालून नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
महेंद्र पराडकर
