‘एआय’ वापराच्या धोक्यांबद्दल होणार अध्ययन
27 देशांकडून घोषणापत्रात स्वाक्षरी : भारताचा समावेश
वृत्तसंस्था /लंडन
भारतासमवेत 27 अन्य देश आणि युरोपीय महासंघाने एका बैठकीत आर्टिफिशियल इंटेलिजेन्सशी निगडित जोखिमींचे अध्ययन करण्यासाठी मिळून काम करण्याचे वचन देत एका घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. या बैठकीत ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चिली, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, आयर्लंड, इस्रायल, इटली, जपान, केनिया, सौदी अरेबिया, नेदरलँड, नायजेरिया, फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, रवांडा, सिंगापूर, स्पेन, स्वीत्झर्लंड, तुर्किये, युक्रेन, संयुक्त अरब अमिरात, ग्रेट ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय महासंघाने भाग घेतला आहे.
एआयमध्ये अग्रगण्य असलेले देश एआय सुरक्षेसाठीच्या जगाच्या पहिल्या करारानजीक पोहोचले आहेत, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या सरकारने या बैठकीनंतर ‘द बॅलेचले डिक्लेरेशन’ या नावाने एक वक्तव्य जारी केले असून यात युरोपीय महासंघासमवेत सहभागी देशांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली आहे. यात ‘फ्रंटियर’ आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सिस्टीमकडून उद्भवणाऱ्या धोक्यांबद्दल गंभीर इशारा जारी करण्यात आला आहे. बॅलेचले पार्क घोषणापत्रात 28 देश संधी, जोखीम आणि फ्रंटियर एआयवर आंतरराष्ट्रीय कारवाईच्या आवश्यकतेवर सहमत असल्याचे म्हटले गेले आहे.
रोजगार, परिवहन, शिक्षण, आरोग्य, न्याय यासह अन्य दैनंदिन जीवनाशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये एआय सिस्टीमच्या महत्त्वावरही बैलेचले पार्क घोषणापत्रात लक्ष देण्यात आले आहे. एआयचा या क्षेत्रांमधील वापर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. एआय जोखिमीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरांवर संबोधित केले जाणार आहे. संयुक्त चिंतेच्या एआय सुरक्षा जोखिमींची ओळख पटविली जाणार आहे. भारत एआयला मुक्तपणा, सुरक्षा, विश्वास आणि उत्तरदायित्वाच्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स विषयक पहिल्या जागतिक शिखर परिषदेला संबोधित करताना म्हटले आहे.