शिक्षकांच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सातारा :
फलटण येथे असलेल्या गुरु द्रोणा या अॅकॅडमीत परीक्षा हॉलमध्ये 17 वर्षाच्या मुलास मारहाण करुन अपमानास्पद वागणूक दिली. त्यावरुन त्या मुलाने घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावरुन गुरु द्रोणा अॅकॅडमीच्या चार शिक्षकांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 17 वर्षाचा मुलगा 12 वीत शिक्षण घेत असून तो गुरु द्रोणा अॅकॅडमीत प्रवेशित आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची साप्ताहिक चाचणी परीक्षा 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होती. केमिस्ट्रीचा पेपर सुरु असताना मुले वर्गात गोंधळ करत होती. त्यावेळेस त्याचे मित्र पाठीमागे कुठे बसले आहेत हे पाहात असताना अॅकॅडमीतला शिक्षक निरंजन गुरव हा त्याच्याजवळ आला. गुरवने त्याच्या तोंडावर, हातावर मारहाण केली. त्यावेळी त्या मुलाने मला का मारता अशी विचारणा गुरवकडे केली. त्यावर पुन्हा मारहाण करुन हातात पेपर देत पेपर लिह असे सांगितले. तसेच अॅकॅडमीतले शिक्षक अविनाश नरुटे, महेश पतंगे आणि गणेश कोकरे यांनीही अॅकॅडमीत काय होते ते घरी सांगायचे नाही. चुकी झाली तर मारणारच आहेत, असे म्हणून त्यांनी मानसिक त्रास दिला.
त्या त्रासाला कंटाळून त्या मुलाने 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.