कोकणातही हवा ‘नशेविरुद्ध आमचे युद्ध’चा प्रबळ नारा
‘नशेविरुद्ध आमचे युद्ध’ असा नारा देत देशभरात अनेक ठिकाणी सध्या अमली पदार्थविरोधी लढा सुरू आहे. कोकणही यास अपवाद राहिलेला नाही. मागील काही महिन्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे प्रमाण पाहता, कोकणलाही अमली पदार्थांचा विळखा पडू लागला असल्याचे स्पष्ट होते. दरवर्षी 26 जून हा जागतिक अमली पदार्थविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने कोकणातही ‘नशेविरुद्ध आमचे युद्ध’ची मोहीम युद्धपातळीवर राबविण्याची वेळ शासन, प्रशासनावर आली आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या अमली पदार्थविरोधी कारवाईचे अवलोकन केले असता गांजासारखा अमली पदार्थ तंबाखूप्रमाणे गल्लोगल्ली मिळू लागल्याचे दिसून येते. गांजा सेवन करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिसांनी गांजा विक्रीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तस्करांची नावे आणि ठिकाणे तपासली तर गांजा किती राजरोसपणे विकला जातोय, याची कल्पना येते. वयस्कर सोडाच, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गांजाच्या आहारी गेले आहेत.
मोक्याच्या ठिकाणी अगदी उघडपणे अफू आणि गांजाचे सेवन करताना विद्यार्थी दिसतात. या विद्यार्थ्यांना अमली पदार्थ पुरवणारे सर्वच तस्कर पोलिसांनी गजाआड केलेत, असे बिलकुल नाही आहे. सातत्याने कारवाई करूनदेखील पोलिसांना अमली पदार्थांबाबत अधिकची खबरदारी घ्यावी लागतेय, यातूनच सारे स्पष्ट होते. जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधीदेखील जिल्हा ‘अमली पदार्थमुक्त’ करणार अशी घोषणा करताना दिसतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2008मध्ये एका समुद्रकिनारी रशियन पर्यटकाला स्थानिकांकडून ड्रग्जची ऑफर देण्यात आली होती. या
ऑफरमुळे तो पर्यटक तेव्हा अक्षरश: हादरून गेला होता. या बाबतची कल्पना त्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकाला देत अमली पदार्थांविषयी चिंता व्यक्त केली होती. आज 17 वर्षांनंतर ‘त्या’ पर्यटकाने व्यक्त केलेली चिंता किती योग्य होती, याचा प्रत्यय सर्वांना येतो आहे. काही लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी सुरू केलेला हा अमली पदार्थांचा व्यापार अनेकांचे संसार उद्ध्वस्त करायला निघाला आहे. सिंधुदुर्गात ड्रग्ज्चा व्यापार इतका फोफावलाय की, विदेशी पर्यटक ड्रग्ज्साठी थेट स्थानिक एजंटनाच गाठू लागले आहेत.
ड्रग्ज् एजंटना शोधण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्यांनी एजंटचे गुगल मॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेवले आहेत. ही अतिशयोक्ती नाहीय. आज ना उद्या हे वास्तव पोलिसांमार्फत अधिकृतपणे उघडकीस येईल, अशी आशा लोकांना आहे. पोलिसांकडून सुरू झालेल्या कारवाईमुळेच स्थानिकांचा याबद्दलचा विश्वास नक्कीच दुणावलेला आहे. तरीपण, अमली पदार्थांची तस्करी खरेच पूर्णत: बंद होईल का, हा प्रश्न काहींच्या मनात कायम आहे. कारण सर्वच अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्या जातील, याची खात्री त्यांना नाही वाटत. त्यांच्या मते, हे रॅकेट खूप मोठे आहे. त्याचा पूर्णत: बिमोड करणे पोलिसांसाठी सोपी गोष्ट राहिलेली नाहीय. परंतु पोलिसांनी त्यादृष्टीने हाती घेतलेली मोहीम स्वागतार्ह आहे. त्याला 100 टक्के यश येवो, अशी अपेक्षा ते बोलून दाखवतात.
अमली पदार्थाच्या सेवनाने शरीर आणि मनावर विपरित परिणाम होतात. हे पदार्थ शरीरात गेल्यानंतर विविध प्रकारे कार्य करतात. त्याचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर, विचार करण्याच्या क्षमतेवर आणि शारिरिक कार्यांवर होतो. अमली पदार्थ मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतात. त्यामुळे व्यक्तीचा मूड, विचार, वर्तनामध्ये बदल होतो. यातूनच उद्भवणारे वादाचे प्रसंग, जीवघेणे हल्ले, नशेत झालेले अपघात, अमली पदार्थांसाठी होणारी चोरी अशा घटना बऱ्याचदा समोर येतात. याकडे एक गंभीर सामाजिक समस्या म्हणून पाहिले जातेय. या अपप्रवृत्तींचा बिमोड व्हावा, हीच समाजमनाची इच्छा आहे. त्यासाठी शासन व प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे, ही जनभावना आहे. त्याचा आदर करून शासन व प्रशासनाने आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे.
अमली पदार्थांच्या सेवनामुळे ह्दयविकार, यकृताचे विकार, श्वसनाच्या समस्या, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आदी शारिरिक व्याधींना सामोर जावे लागते. त्याचप्रमाणे नैराश्य, चिंता, मानसिक भ्रम, आत्महत्या करण्याची प्रवृत्ती यासारख्या मानसिक दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. कुटुंबात आणि समाजात कलह वाढतो. व्यसनाधीन माणसे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. त्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अमली पदार्थांपासून दूर राहणेच फायद्याचे आहे. ड्रग्ज्विषयी काहींच्या मनात खूप गैरसमज आहेत. ड्रग्ज्मुळे आनंद मिळतो, असे व्यसनाधीन लोकांना वाटते. खरंतर ड्रग्ज्मुळे कुठलाच आनंद वा समाधान मिळत नाही. जो काही आनंद मिळत असेल तो अगदी थोड्या वेळासाठी असतो आणि त्याच्यासाठी आयुष्यभराची खूप मोठी किंमत मोजावी लागते. एकदा का ड्रग्ज्ची सवय लागली की नंतर त्यातून बाहेर पडताना खूप त्रास होतो. त्यामुळे ड्रग्ज्मुळे किंवा कुठल्याही व्यसनामुळे मिळणारा आनंद हा क्षणिक असतो. गोळी, इंजेक्शन वा नाकावाटे ओढून घेतलेल्या मादक पदार्थांमुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. ड्रग्ज्मुळे योग्य-अयोग्याचं भान राहत नाही. नीट-सुसंगत विचार करता येत नाही. आपल्या क्रिया मंदावतात. धुसर दिसतं. प्रत्यक्षात नसणाऱ्या गोष्टींचे आभास होतात. आवाज येतात. शरीराला ड्रग्ज्च्या अमलाखाली राहण्याची सवय झाल्यास अशा व्यक्तीला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे कठीण जाते. एकाग्रता राहत नाही. नैराश्य येऊन मानसिक आरोग्याच्या समस्या यातून निर्माण होतात. स्वत:च्या विचारांवर, कृतींवर ताबा राहत नाही. संबंधित व्यक्ती हिंसक होण्याची शक्यता असते. यातूनच त्यांच्या आणि त्यांच्याभोवती असणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
कायद्याने अमली वस्तू किंवा औषधाचे उत्पादन, वितरण, सेवन, विक्री, वाहतूक, साठा, वापर, आयात-निर्यात यावर देशात बंदी आहे. अमली पदार्थांमुळे निर्माण होणारे शारिरिक, मानसिक व सामाजिक परिणाम पाहता यासंदर्भात प्रभावी जनजागृतीबरोबरच कठोरातील कठोर कारवाईची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी राज्य शासनाकडून 26 जूनपासून विविध उपक्रम राबविले जातील, यात शंकाच नाही. परिसरातील शाळा व स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. ज्यामध्ये अमली पदार्थविरोधी फेरी, अमली पदार्थावर बंदी याविषयी निबंध स्पर्धा, व्यसनमुक्ती हीच राष्ट्रभक्ती याविषयी वकृत्व स्पर्धा, पथनाट्यो, निर्धार, प्रतिज्ञा आदी माध्यमातून समाजप्रबोधन केले जाईल. पण प्रभावी जनजागृतीबरोबरच कायदेशीर कारवाईसुद्धा अशी कठोर व्हायला हवी की, अमली पदार्थांची तस्करी करणारे हादरून गेले पाहिजेत.
महेंद्र पराडकर