For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतपेट्या लुटणाऱ्यांना जोरदार चपराक !

06:01 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतपेट्या लुटणाऱ्यांना जोरदार चपराक
Advertisement

प्रचाराच्या आघाडीवर..

Advertisement

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर शंका घेणाऱ्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने मतपेट्या लुटण्याची इच्छा असणाऱ्यांना झणझणीत चपराक बसली आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. बिहारमध्ये एका निवडणूक प्रचारसभेत ते भाषण करीत होते.

भारताच्या निवडणूक पद्धतीची प्रशंसा सारे जग करीत आहे. तथापि, काही भारतीयच भारताची मान खाली जावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत. ते प्रत्येक बाब केवळ नकारात्मक दृष्टीकोणातूनच पाहतात. मतदान यंत्रांसंबंधी जनतेच्या मनात संशय निर्माण करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्याचे त्यांचे कारस्थान आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अशा संशयात्म्यांना आपल्या निर्णयाच्या माध्यमातून मोठा धडा शिकविला आहे. भारतातील मतदान यंत्रे अत्यंत विश्वासार्ह आहेत, हेच सिद्ध होते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement

हे भारताच्या घटनेचे सामर्थ्य

सर्वोच्च न्यायालयाने मतदान यंत्रांच्या संदर्भात दिलेल्या निर्णयामधून भारताच्या राज्य घटनेचे सामर्थ्य दिसून येते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना भारताला दिली, त्यामुळेच हे शक्य झाले आहे. या घटनेमुळेच आज भारताची लोकशाही जगात नावाजली जात आहे. जुन्या कागदी मतपत्रिकांकडे परत जाता येणे आता शक्य नाही, अशी स्पष्टोक्ती सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयपत्रात केल्याने लोकशाही भक्कम झाली आहे, अशी मांडणी त्यांनी केली.

जुन्या पद्धतीत अनेक त्रुटी

जुन्या काळात कागदी मतपत्रिकांचा उपयोग केला जात असे. या अनेक मतदान केंद्रांमधून मतपेट्या पळविण्याचे प्रकार घडत असत. बाहुबली उमेदवार आपल्या गुंडांकरवी मतपेट्यांची पळवापळवी करीत असत. मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचेही प्रकार अनेक ठिकाणी घडत असत. हे सर्व दोष मतदान यंत्रांमुळे दूर झाले आहेत. पण ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, अशा काही जणांना मतपेट्या पळविण्यात आजही रस आहे. त्यामुळे त्यांना जुनी पद्धतीच हवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आपल्या लोकशाहीविरोधी मागण्या पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आता न्यायालयानेच अयशस्वी ठरविल्याने लोकशाहीची बूज राखली गेली आहे, अशा अर्थाचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत केले.

लोकांचे सबलीकरण हे ध्येय

राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांची आघाही यांच्या ध्येयधोरणात मोठा फरक आहे. आम्ही लोकांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, विरोधक लोकांचे शोषण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी स्थापन केलेली आघाडी देशाच्या हितासाठी नसून आघाडीच्या नेत्यांच्या स्वार्थासाठी आहे. तथापि, जनतेसमोर त्यांची डाळ शिजणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आंध्रात काँग्रेसचे 3 उमेदवार घोषित 

आंध्र प्रदेशात काँग्रेसने आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. या राज्यात लोकसभा निवडणुकीसमवेतच विधानसभा निवडणूकही होत आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठीही 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस मुख्यत: स्वबळावर लढत आहे. काही मतदारसंघांमध्ये या पक्षाची डाव्या पक्षांशी युती आहे.

नरसापुरम लोकसभा मतदारसंघातून के. बी. आर. नायडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजमपेट लोकसभा मतदारसंघातून एस. के. बशीद तर चित्तूर मतदारसंघातून एम. जगपथी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही माहिती काँग्रेस समितीने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात गुरुवारी देण्यात आली. विधानसभेसाठी जी. तिरुपती (श्रृंगवारपुकोटा), जी. अनिल बाबू (बापटला), सी. चंद्रपॉल (सत्तेनापल्ली), शेख जेलानी बाशा (कर्नूळ), एम. काशीम वाली (येमीगानूर) आणि पी. एस. मुरलीकृष्णराजू (मंत्रालयम) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने चिपुरुपल्ली, विजयवाडा (पूर्व), तेनाली कोंडापी आणि मरकापुरम या विधानसभा मतदारसंघांमधील उमेदवार बदलले आहेत.

आंध्र प्रदेशातील 25 लोकसभा आणि 175 विधानसभा मतदारसंघांमध्ये 13 मे या एकाच दिवशी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.