केसरकरांना अप्रत्यक्षपणे बदनाम करणे ही विकृत प्रवृत्ती - नितीन मांजरेकर
बॅनर प्रकरणावरून वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध
वेंगुर्ले (वार्ताहर)-
काही असंतुष्ट आत्म्यांनी दोडामार्ग तालुक्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला व आज केसरकर यांचे शुभेच्छा बॅनर फाडले. त्याचा आम्ही वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो. दीपक केसरकर यांच्यासारख्या सतत काम करणाऱ्या व सतत लोकसंपर्कात असलेल्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे बदनाम करणे ही अतिशय दुर्दैवी बाब असून ही विकृत प्रवृत्ती आहे. या मतदार संघात आजपर्यंत राडा संस्कृती कधीच टिकली नाही आणि जनतेनेच अशा राडा संस्कृतीला वेळोवेळी उत्तर दिले असल्याची टीका वेंगुर्ला तालुका शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी दोडामार्ग येथे दीपक केसरकर यांच्याविरोधात अज्ञातांनी बॅनर लावून टीका केली होती. तर आज सावंतवाडी येथे दीपक केसरकर यांनी लावलेले शुभेच्छा बॅनर अज्ञातांकडून फडण्यात आले. याबाबत वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही अतृप्त आत्मे आहेत. ज्यांना कोणाला आमदारकीची स्वप्न पडत आहेत. ज्यांना दिपक केसरकर यांची कार्यपद्धती किंवा त्यांच्या सोबत असणारा लोकसमूह आवडत नाही आहे. आणि याला विरोध म्हणून ही मंडळी हा एक विकृत उपक्रम राबवत आहेत. परंतु मला ठाम खात्री आहे की, या मतदार संघात दीपक केसरकर यांनी केलेलं काम व लोकांचं प्रेम हीच पोचपावती म्हणून येणाऱ्या काळात मतदानाच्या माध्यमातून जनताच त्यांना उत्तर देईल.
आज वेंगुर्ला तालुक्यासहित सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक गावात, शहरात केसरकर यांनी करोडो रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला आहे. आणि यामुळेच केसरकर यांना लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून काहींना पोटशूळ उठला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युती सरकारच्या माध्यमातून विकासाची "गंगा" केसरकर यांनी या मतदार संघात आणली आहे. त्यामुळे या मतदार संघावर हक्क सांगणारी जी इतर बाहेरून आलेली मंडळी आहेत व जी आज दिपक केसरकर यांचेवर आरोप करत आहेत त्यांनी जाहीर करावे की, आतापर्यंत किती रुपयांचा निधी तुम्ही आणला आहे. किती विकासकामे केली आहेत. केसरकर यांनी जी विकासकामे केली आहेत ती आज सद्यस्थितीत दिसत आहेत. यात वेंगुर्ल्यातील झुलता पूल, उपजिल्हा रुग्णालय, तहसील व पंचायत समिती इमारती, आय.टी.आय. इमारत, सुसज्ज मच्छिमार्केट, कालेलकर सभागृह, व इतर गावातील विकासकामे अशा कामांसाठी करोडो रुपये केसरकर यांनी दिले आहेत. त्यामुळे या टीकाकारांनी आपण स्वतः काय केलं हे जनतेला सांगणे गरजेचे आहे. केसरकर आजही दिवस रात्र लोकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातील नेता म्हणून जनता नेहमीच त्यांच्या पाठीशी ठाम राहील. असा विश्वासही नितीन मांजरेकर यांनी व्यक्त करत. छुप्या पद्धतीने बॅनर लावणे व बॅनरफाडणे अशा विकृत प्रवृत्तीचा निषेध केला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे, तालुका संघटक बाळा दळवी, शहरप्रमुख उमेश येरम, विभाग प्रमुख संजय परब, मितेश परब यांच्यासाहित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.