हिमालयात सापाची अजब प्रजाती
हॉलिवूड अभिनेत्याचे मिळाले नाव
पश्चिम हिमालयात सापाची एक नवी प्रजाती आढळून आली आहे. वैज्ञानिकांनी या प्रजातीचे नाव हॉलिवूड सुपरस्टार लियोनार्डो डिकॅप्रियोच्या नावावर ठेवले आहे. डिकॅप्रियोने सापांच्या संरक्षणासाठी खूप कार्य केले आहे. याचमुळे त्यांना हा सन्मान दिला जात असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. भारत, जर्मनी आणि युकेच्या संशोधकांच्या टीमेने या ‘एंगीकुलस डिकॅप्रियो’ नावाच्या सापाच्या प्रजातीचा शोध 2020 मध्ये लावला होता. ही टीम भारतात आढळणाऱ्या सापांच्या प्रजातींचा शोध घेण्यासाठी हिमालयात अभियान राबवित होती. सायंटिफिक रिपोर्ट्स नियतकालिकात सापाच्या या प्रजातीविषयी अलिकडेच लेख प्रकाशित करण्यात आला आहे. या प्रजातीचे विभाजन एंगीकुलसच्या अंतर्गत करण्यात आले आहे. लॅटिनमध्ये याचा अर्थ छोटा साप असा होतो. तर लियोनार्डो डिकॅप्रियो एक अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि पर्यावरण कार्यकर्ता देखील आहे. प्रदूषण कमी करणे आणि जीवांना वाचविण्यासाठी तो कार्य करत आहे. याचबरोबर सापांच्या संरक्षणासाठी तो आर्थिक योगदान देत आहे. याचमुळे या सापाचे नाव डिकॅप्रियो हिमालयीन स्नेक ठेवण्यात आले आहे.
या अभियानाच्या अंतर्गत संशोधकांची टीम पश्चिम हिमालयात शोध घेत आहे. अभियानादरम्यान करड्या रंगाचा साप दिसून आला होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर तो एकदम शांत आणि स्थिर झाला. त्याने हालचाल बंद केली होती. तसेच त्याने कुणावरही हल्ला केला नव्हता. यानंतर अन्य सापांसोबत त्याचे डीएनए विश्लेषण करण्यात आले. तेव्हा हा साप वेगळ्या प्रजातीचा असल्याचे समोर आले. हिमाचल प्रदेशच्या चंबा, कुलूच्या आसपास हा साप आढळतो. याचबरोबर उत्तराखंडच्या नैनीताल आणि नेपाळच्या चिटवान नॅशनल पार्कमध्ये ही प्रजाती आढळून येते. संशोधकांच्या या टीममध्ये मिझोरम विद्यापीठाचे प्राध्यापक लालरेमसांगा, जीशान ए. मिर्झा, विरेंद्र भारद्वाज, सौनकल पाल, गरनोत वोगेल, पॅट्रिक कॅम्पबेल आणि हर्षित पटेल यांचा समावेश होता. अध्ययनानुसार या प्रजातीच्या सापामध्ये डझनभर छोटे छोटे दात असतात. हा साप सुमारे 22 इंचाचा असतो. तसेच त्याच्या शरीरावर करड्या रंगाचे डाग असतात.