For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चांगुलपणाची गोष्ट

06:07 AM Dec 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
चांगुलपणाची गोष्ट
Advertisement

दुपारचे बारा वाजले होते. बँकेमध्ये प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीमध्ये दोन सज्जन व्यक्ती रक्कम काढण्यासाठी रांगेमध्ये उभ्या होत्या. त्यांची वेशभूषा सात्विक होती. त्यावरूनच कळत होते हे कीर्तनकार असावेत. धोतर, सदरा, टोपी, कपाळी टिळा, कानात बाळी. ही माणसे नक्कीच धर्मपरायण असावी हे कोणीही सांगू शकत होते. त्यांचे वेगळेपण सहज लक्षात येत होते. त्यांना पैसे मिळताच ते बाजूला उभे राहून पैसे मोजू लागले. पैसे मोजण्यात गर्क असताना तिथे दोन तरुण आले आणि त्यांना म्हणाले, ‘अहो काका, तुमच्या काही नोटा चुकीने खाली पडल्या आहेत. उचला बरं पटकन.’ नोटा मोजणाऱ्या व्यक्तीने आपले चित्त जराही विचलित न होऊ देता खाली पडलेल्या नोटांवर चक्क चप्पल घातलेला पाय ठेवला आणि त्या तरुणांना ते म्हणाले, ‘हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आता तुम्ही इथून चालते व्हा.’ ते तरुण आश्चर्यचकित होऊन म्हणाले, ‘अहो काका, तुम्ही चक्क लक्ष्मीवर चप्पल घातलेला पाय ठेवला आहे. ती लक्ष्मी आहे, तिला पाय लावता? तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? कपड्यांवरून वेशभूषेवरून तर मोठे धार्मिक दिसताय आणि असं विपरीत कृत्य का करता?’ त्याबरोबर ते गृहस्थ आवाज मोठा करून म्हणाले, ‘तुम्ही जर आता इथून जाणार नसाल तर मी हाक मारून समोर उभ्या असणाऱ्या पोलिसांना बोलवतो.’ त्यांनी लगेच हाक मारली. असा हा धाक दाखवताच ते तरुण क्षणात पसार झाले. त्या व्यक्तींच्या हातातल्या नोटांची संख्या बरोबर होती.

Advertisement

झाले असे होते की त्या चोरट्या तरुणांनी मुद्दाम शंभर रुपयांच्या पाच नोटा त्या व्यक्तीच्या पायाजवळ टाकल्या. हेतू असा होता की पैसे उचलायला ते खाली वाकले की त्यांच्या हातामध्ये असलेली मोठी रक्कम पळवून न्यायची; परंतु त्या व्यक्तीच्या सतर्कतेमुळे तसे न होता अधिकचे पाचशे रुपये त्यांना मिळाले. ते पैसे त्यांनी देवळात देवाच्या पेटीत टाकले आणि देवाला प्रार्थना केली, ‘हे परमेश्वरा, चांगली माणसे दिसली की त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेत त्यांना फसवणाऱ्या माणसांच्या बुद्धीमध्ये तू बदल कर. त्यांना सन्मार्गाला लाव.’ समर्थ रामदास स्वामींच्या शब्दात सांगायचं तर ‘बुद्धी दे रघुनायका.’

ही घटना ऐकली की वाटते व्यवहारात, रोजच्या जगण्यात अवधान आणि आजूबाजूचे सदैव भान असणे ही काळाची गरज आहे. चांगुलपणा हा दुर्गुण ठरण्याची शक्यता आहे. सावध असलेले बरे. कारण चांगले वागणे कधी कधी इतके अंगलट येते की आपण फसलो हे कळायला फार फार उशीर झालेला असतो. खरे म्हणजे जग पुढे जाते, विकसित होते ते केवळ मुठभर असलेल्या सत्वगुणी माणसांमुळेच. त्यांच्याचमुळे जगण्याचा, जगण्यावरचा विश्वास टिकून राहायला मदत होते. ते सज्जनता निर्माण करतात म्हणून फसवणुकीचा दाह कमी होतो आणि वाट सापडायला मदत होते. एक दृष्टांत कीर्तनकार आपल्या कीर्तनात नेहमीच सांगतात. एक महात्मा होते आणि ते एका माणसाच्या दारावरून रोज नामस्मरण करीत जात असत. ते ऐकून एका दुर्जन आणि हेकेखोर माणसाला संताप आला आणि प्रचंड राग येऊन तो त्या महात्म्याच्या अंगावर रोज घरातला कचरा आणून टाकायला लागला. तो कचरा झटकून श्लोक म्हणणे आणि आपले नामस्मरण न सोडता पुढे जाणारा तो साधू सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. असे रोज महिनाभर सुरू होते. एक दिवस नेहमीप्रमाणे काही घडले नाही. साधूच्या अंगावर रोजच्यासारखा कचरा पडला नाही. तेव्हा तो महात्मा थांबला आणि त्याने आजूबाजूला रोज कचरा फेकणाऱ्या माणसाची विचारपूस केली. शेजारीपाजारी त्याच्या वाईट स्वभावामुळे त्याला दूरच ठेवत असत. त्यामुळे त्याच्याबद्दल कुणालाही काहीही माहीत नव्हते. शेवटी हा महात्मा स्वत: त्याचे घर शोधीत माडीवर गेला. पाहतो तर काय? रोज कचरा फेकणारा तो माणूस तापाने फणफणला होता. एकटाच कण्हत औषधाविना अंथरुणावर पडला होता. हा महात्मा त्याच्याजवळ गेला आणि त्याची शुश्रुषा करू लागला. म्हणाला, ‘अरे तू कचरा फेकशील म्हणून वाट बघितली. तू आला नाहीस तेव्हा वाटले तू आजारी तर नसशील ना? म्हणून तुला बघायला आलो’. साधूचा सज्जनपणा, सेवाभाव त्या माणसाच्या अंत:करणात पसरत गेला आणि त्या दिवसापासून तो माणूस आमुलाग्र बदलून गेला.

Advertisement

चांगुलपणा हा गुण आहे. तो लवकर संक्रमित होतो अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो, क्वचित अनुभवतो देखील. परंतु हा असा सज्जनपणा आचरणात आणायला मानसिक बळ लागते, शक्ती लागते. ती सहज लाभत नाही. त्यासाठी सद्गुरूंचा सहवास, नामस्मरण, साधना आणि धारणा लागते. जगामध्ये वावरताना चांगुलपणाला खतपाणी घालणारे थोडे आणि चांगल्याचे दुर्जनात रूपांतर करणारे जास्त भेटतात. एखाद्याचे सद्गुणच त्याचे वैरी आहेत, हे पटवून देणारे समाजात आजूबाजूला अनेक लोक असतात. त्यांची संख्या जास्त असते. कारण त्यांचा आतला आवाज त्यांना सांगत असतो हे चुकीचे आहे. पण आपल्यासारखे चुकीचे इतरांनीही वागावे अशी त्यांची इच्छा असते. त्याप्रमाणे ते वागत असतात. अशी माणसे कमालीची भित्री असतात, परंतु कधी कधी चांगला माणूस आयुष्यात इतका पोळतो की त्याचे नकळत धूर्त माणसात रूपांतर होते. त्याचे पतन झाले की समाज सुखावतो. चांगुलपणा धारण करणे, तो जगण्यात, वागण्यात, बोलण्यात उतरवून आचरणात आणणे ही कठीण गोष्ट आहे. कारण जग फार स्वार्थी आहे. ते चांगुलपणाचा फायदा कसा घेता येईल हेच बघत असते. जगण्याची खरी परीक्षा ही स्वार्थी माणसांना समजून, उमजून त्यांना आपले म्हणण्यात असते.

खूपदा अनुभव असे येतात की लबाड माणसे प्रगतीच्या शिड्या चढून वर जातात आणि मोठी होतात. तेव्हा सात्विक माणसे निराश होतात. कारण चांगल्या माणसाला वाईट शक्ती धारण करता येत नाही. शिव्या द्यायला, हाणामारी करायला, कपटकारस्थान रचायला, लुटायला, लुबाडायला शक्ती लागते. भलेही ती दुष्ट शक्ती असेल. एरवी सज्जन माणूस कुणालाही चुकूनमाकून जरी कुणाला दुखावेल असे किंवा साधा आवाज चढवून जरी बोलला तरी त्याला रात्रभर झोप लागत नाही. तो तळमळतो. स्वत:ची तब्येत बिघडवून घेतो. गोष्ट साधी असते परंतु ती त्याला जन्मभर विसरता येत नाही. असे घडू नये म्हणून परमेश्वराचे अनुसंधान हाच त्याच्यावर एकमेव उपाय आहे. दत्तावतारी संत परमपूजनीय नाना महाराज तराणेकर म्हणत, ‘माझेनि अनुसंधानेविन जप, तप, यज्ञ, दान, कर्म/ ते अवघेची अधर्म जाण/ मद्भजन ते नव्हे.’ सदैव परमेश्वराची आठवण, त्याचे रूप, प्रसन्नता जवळ असली की चांगुलपणाच्या कसोटीत माणूस शंभर गुणांनी पास होतो आणि पुढच्या रस्त्याकडे रवाना होतो.

प. पू. बाबामहाराज आर्वीकर म्हणतात की, ‘इदम् न मम हे एकदा सद्गुरूंच्या सहवासाने शिष्याला कळले की सज्जनता निर्माण करणे हा त्याचा सहज स्वभाव होतो. त्यासाठी त्याला कष्ट पडत नाहीत.’ श्रद्धा अढळ असली की माणसाचे पतन न होता वर्धन होते. स्वच्छ आचरणातून चांगुलपणा निर्माण करीत तो वाढवणे हाच प्रत्येक संतपीठाचा संदेश असतो. समाजाला योग्य वाट दाखवणारा तो पथदीप असतो.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.