सौर ऊर्जा निर्मितीत पाऊल पडते पुढे...
सौरऊर्जा निर्मितीमध्ये भारताने अलीकडच्या वर्षांमध्ये निर्भेळ यश मिळविले आहे. उत्पादनामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे. अलीकडेच भारताने 100 गिगावॅट इतक्या क्षमतेची सौरऊर्जा निर्मिती करण्यामध्ये यश मिळविले आहे. केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अलीकडेच ही माहिती दिली आहे. 2030 पर्यंत 500 गिगावॅट क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जाक्षेत्रामध्ये पर्यायी ऊर्जा निर्मिती करण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये सौरऊर्जा निर्मितीचा वाटा महत्त्वपूर्ण ठरतो आहे. देशाला आवश्यक असणारी ऊर्जा भारत वेगवेगळ्या मार्गाने पुरविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अलीकडेच सौरऊर्जेच्या माध्यमातून 100 गिगावॅटची क्षमता पूर्ण करण्यामध्ये यश प्राप्त केले आहे. स्वच्छ आणि हरित भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहता सौर ऊर्जेची निर्मिती महत्त्वाचे योगदान देणारी आहे. भारताने यापूर्वी 175 गिगावॅट नूतनीकरणयुक्त ऊर्जा क्षमता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट 2022 पर्यंत ठेवले होते. त्यामध्ये 100 गिगावॅटची ऊर्जा सौरऊर्जेमार्फत तयार केली जाणार होती. परंतु हे उद्दिष्ट काही कारणास्तव साध्य करता आले नाही. कोरोना व इतर निर्बंधाच्या कारणामुळे सौरऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा जाणवला होता.
सोलार पॅनेल, सोलार पार्क आणि रुफटॉप सोलार प्रकल्पांच्या माध्यमातून मोठा बदल पहायला मिळतो आहे. यातूनच भारताने 100 गिगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे ध्येय साध्य केले आहे. गेल्या दशकभरामध्ये पाहता सौरऊर्जा निर्मितीत भारताने 35 पट वाढ केली आहे. भारत हा हरित उर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण तर होतो आहेच. पण जगासाठीही नवा रस्ता दाखविण्यासाठी गुरु ठरतो आहे. पीएम सूर्यघर ही योजना देशभरातील विविध शहरांमध्ये राबविली जात असून अनेक घरमालक उर्जेच्याबाबतीमध्ये स्वयंपूर्ण होत आहेत. शाश्वत उर्जेच्या बाबतीत हा बदल महत्त्वपूर्ण ठरु पाहत आहे. 2014 मध्ये 2.82 गिगावॅट इतकीच सौरऊर्जा भारतामध्ये तयार केली जात होती. हा प्रवास दशकभरामध्ये वेगाने घडला असून वर म्हटल्या प्रमाणे 2025 मध्ये 100 गिगावॅटचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. 31 जानेवारी 2025 रोजीच 100 गिगावॅट निर्मितीचे उद्दिष्ट साध्य केले गेले आहे. भारताच्या नूतनीकरण उर्जेच्या निर्मिती विकासात सौरउर्जेचा वाटा लक्षणीयरित्या वाढत आहे. एकंदर नूतनीकरणयोग्य ऊर्जा तयार करण्याच्या क्षमतेमध्ये सौरउर्जेचा वाटा 47 टक्के इतका राहिला आहे. एकट्या 2024 मध्ये 24.5 गिगावॅट इतक्या सौरउर्जेची निर्मिती विक्रमी स्तरावर करण्यात आली आहे. 2023 च्या तुलनेमध्ये दुप्पट क्षमतेने सौरऊर्जा निर्मिती 2024 मध्ये केली गेली आहे. राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांचा वाटा महत्त्वाचा आणि मोलाचा राहिला आहे. रुफटॉपच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या उर्जेच्या क्षमतेमध्ये 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये 53 टक्के वाढ दिसली आहे. देशातील उद्योगांची तसेच इतर विजेची मागणी पूर्ण करण्यात या क्षेत्राचा वाटाही सध्या आणि भविष्यात महत्त्वाचा ठरतो आहे.
दीपक कश्यप