सरंबळकडे येणाऱ्या एसटी बसेस वेळेत सोडण्यात याव्यात
सरंबळ ग्रामस्थांचे कुडाळ वाहतूक अधीक्षकांना निवेदन
वार्ताहर/ कुडाळ
कुडाळ आगारातून सकाळी 6 वाजता व दुपारी 1 वाजता सरंबळकडे येणाऱ्या एसटी बसेस नेहमीच उशिराने येत आहेत. त्यामुळे शाळा, कॉलेज विद्यार्थ्यांचे व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थी शाळेत उशीरा पोहचत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या दोन्ही बसेस वेळेत सोडण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने व सरंबळ ग्रामस्थांनी एसटी आगार व्यवस्थापक कार्यालय कुडाळ वाहतूक अधिक्षक श्री नर व श्री राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यापुढे या बसेस नियोजित वेळेत न सुटल्यास एसटी डेपोला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कुडाळ आगारातील सकाळी ६ वाजता सुटणारी सरंबळ कडे येणारी एस.टी. बस कुडाळ बसस्थानकातून उशीरा सुटते. बस वेळापत्रकानुसार तिचा सरंबळ येथे पोहोचण्याचा वेळ हा सकाळी ६.३० वाजता आहे. परंतू ही बस वेळेपेक्षा उशीरा सुटत असल्याने ती सकाळी ८ वाजता सरंबळ येथे पोहोचते. तसेच दुपारी १ वाजता बसस्थानकातून सुटणारी बस ३ वाजेपर्यंत सरंबळ येथे पोहोचते. त्यामुळे सकाळच्या वेळेत शाळा कॉलेजचे विद्यार्थी व कामगार येणाऱ्या सर्व प्रवाशांची मोठी गैरसोय होते. सकाळी शाळेत विद्यार्थी उशीराने पोहोचत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.दोन्ही बस बसस्थानकातून वेळेत सोडण्यात याव्यात व विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली.यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, सरंबळ शाखाप्रमुख शाम करलकर, उपशाखाप्रमुख संदीप पाटकर, युवासेना उपविभाग प्रमुख वैभव सरंबळकर, युवासेना शाखा प्रमुख निखिल गोसावी, युवासेना गटप्रमुख मयूर भोवर व ग्रामस्थ उपस्थित होते.