तारांगणी विसावले नक्षत्र!
मंगेशकरांच्या नेमस्त कुटुंबातील आशाताई हे बंडखोर फुल. आयुष्यभर फुलतच राहिले आणि दिलखुलासपणे इतरांना दाद देत राहिले. असे हे नक्षत्र सांगीतिक आकाशगंगेत कायमचे स्वरलते शेजारी स्थिरावले आहे....
भारतीय चित्रपटसंगीताच्या अथांग आकाशातील एक अद्वितीय, चैतन्यमय आणि बहुरंगी स्वर आज हरपला. आशा भोसले यांच्या निधनाने केवळ एका महान गायिकेचा अंत झाला नाही, तर एका युगाचा स्वर जणू थांबला आहे. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पण आशाताईंची खरी ताकद केवळ त्यांच्या गाण्यांत नव्हे, तर त्या गाण्यांना दिलेल्या जिवंतपणात होती, विशेषत: त्यांच्या ड्युएट्समध्ये. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पोटी त्या जन्मल्या, त्या संगीताचा वारसा घेऊनच. लता आणि आशा मंगेशकर या भगिनींनी वडिलांच्या अकाली निधनानंतर लहान वयातच गाणे गाऊन घराची जबाबदारी उचलली. इंडस्ट्रीत तेव्हा लता यांचे वर्चस्व होते. आशाताईंनी वेगळा मार्ग निवडला. कॅबरे, गझल, पॉप, लोकसंगीत अशा विविध प्रकारांत त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. मराठी गीतांमध्येही आशाताईंचा आवाज तितकाच मोहक. “मोगरा फुलला‘, ‘झिम्मा‘, ‘माझे माहेर पंढरी‘ यांसारख्या गीतांनी त्यांनी महाराष्ट्राच्या मनात कायमचे घर केले. हिंदी, मराठीसोबतच बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. किशोर कुमार यांच्यासोबतची त्यांची जोडी म्हणजे खट्याळपणा, मस्ती आणि प्रेमाचा एक रंगीबेरंगी खेळ. ‘ये रातें ये मौसम‘ अशा गाण्यांमध्ये दोघांनी शब्दांना आणि सुरांना असा जिवंतपणा दिला की, ती गाणी आजही तितकीच ताजी वाटतात. तितकीच संस्मरणीय जोडी ठरली ती मोहम्मद रफी यांच्यासोबत. ‘उडे जब जब जुल्फें तेरी‘, ‘अच्छा जी मैं हारी चलो या गाण्यांतून त्यांनी प्रेमाच्या अनेक छटा रंगवल्या. रफींच्या मधुर, कोमल आवाजाला आशाताईंच्या स्वरांनी एक वेगळाच रंग चढवला. आशाताईंच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे राहुल देव बर्मन यांच्यासोबतचे त्यांचे नाते. ‘पिया तू अब तो आजा‘, ‘दम मारो दम‘, ‘ये मेरा दिल‘, ‘ले गई ले गई’ या गाण्यांनी त्यांनी भारतीय चित्रपटसंगीताला नवे, आधुनिक आणि धाडसी वळण दिले. याशिवाय मन्ना डे, महेंद्र कपूर, एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांच्यासोबतही त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली. प्रत्येक गायकाच्या शैलीनुसार आणि अभिनेत्रीनुसार स्वत:चा आवाज बदलण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. आशाताईंच्या ‘पान खाय सैयाँ हमारो‘ सारख्या एकटीने गायिलेल्या गाण्यांचीही व्याप्ती अफाट होती. ‘चुरा लिया है तुमने‘, ‘रात अकेली है‘, ‘झुमका गिरा रे‘ यासारख्या गाण्यांनी त्यांनी पिढ्यानपिढ्या रसिकांना वेड लावले. उमराव जान मधील ‘इन आँखों की मस्ती के‘ सारख्या गझलांनी तसेच मराठीत सुरेश भट यांच्या बहुतांश गझलांनी त्यांच्या आवाजातील कोमलता आणि गहिराई अधोरेखित केली. मधुबाला, नर्गीस, वैजयंतीमाला, वहिदा रहमान, माला सिन्हा, हेमा मालिनी, रेखा, परवीन बाबी, झीनत अमान, जयाप्रदा, श्रीदेवी, जया बच्चन, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, जुही चावला, रविना टंडन, ऐश्वर्या राय ते प्रीती झिंटा या सर्व काळातील अभिनेत्रींच्या पिढ्यांशी आणि त्यांच्या आवाजाशी जुळवून घेत आशाताई त्यांचाच आवाज बनल्या. आशाताईंच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची बंडखोर वृत्ती. ठरावीक चौकटीत अडकून न राहता त्यांनी सतत नवे प्रयोग केले. ‘दम मारो दम‘ हे गाणे सुरुवातीला वादग्रस्त ठरले, पण त्याच गाण्याने नव्या पिढीचा आवाज बनून इतिहास घडवला. आज आशा भोसले आपल्यात नाहीत, पण त्यांचा स्वर अमर आहे. त्यांच्या गाण्यांतून त्या पुन्हा पुन्हा जिवंत होतील. प्रत्येक ठेक्यात, प्रत्येक सुरात त्यांची आठवण राहील. 20 पेक्षा जास्त भाषांमधील 12 हजार गाण्यातून! तारांगणात विसावलेले हे नक्षत्र आता दूर असले, तरी त्याचे तेज कधीही कमी होणार नाही. ते कायमच आपल्या मनाच्या आकाशात झळकत राहील.