Sangli News : सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ, वृध्द व्यक्तीवर हल्ला
कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे सांगलीकरांमध्ये भीती
सांगली : कोल्हापूर रोडवर पिसाळलेल्या कुत्र्याने पादचाऱ्यावर केलेल्या हल्ल्याची घटना विस्मरणात जाण्यापर्वीच गावभागातील एका वृध्द व्यक्तीवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली असून गेल्या काही दिवसात अशा हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी लोक गर्दी करत आहेत.
शहरात सध्या विविध धार्मिक उत्सव सुरू असून त्यानिमित्ताने सायंकाळच्या सुमारास अनेक वृध्द व्यक्ती देवदर्शन आणि उत्सवात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडत असतात. शासकीय सेवेतून निवृत्त झालेले असेच एक वृध्द व्यक्ती आपल्या नातीला घेऊन धार्मिक उत्सवात परततताना कुत्र्याने पाठलाग करून हल्ला केला.
त्याला चुकवत असताना कुत्र्याने धावत्या गाडीवरील व्यक्तीच्या पिंडरीचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कशीबशी या पिसाळलेल्या कुत्र्याच्या तावडीतून सुकटा करून घेत सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेतले. मात्र या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान इथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगली शहरात गेल्या काही दिवसात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून पहिले इंजेक्शन दिल्यानंतर पुढच्या उपचारासाठी खणभागातील महापालिकेच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये लोकांना पाठवून दिले जात असयाचे त्यांनी सांगितले. महापालिकेने या घटनेची गांभिर्याने दखल घेऊन लोकांची पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका होण्यासाठी कठोर पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे.