For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

डोळ्यात उगवला अंकुर

06:21 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
डोळ्यात उगवला अंकुर
Advertisement

रशियामध्ये एक अद्भूत घटना घडली आहे. या देशाच्या सैबेरिया प्रांतात वास्तव्य करणारे मॅक्झिम स्लेप्टसोव्ह यांच्या डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यात एक अंकुर       उगवला आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे. अर्थात, हे रोप अपोआप उगवलेले नाही. एक प्रसंग त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. स्लेप्टोसोव्ह काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मित्रासह सहलीला गेले होते. तेथे ते मासे पकडत असताना त्यांच्या डोळ्यात एक कीटक गेला. त्यांनी हाताने त्याला झटकले. त्यामुळे तो त्यांच्या डोळ्यापासून दूर गेला. मात्र, त्यांचा डोळा चुरचुरु लागला आणि लाल झाला. त्यांनी तलावाच्या पाण्याने डोळा धुतला. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून एक लाकडाचा सूक्ष्म तुकडा बाहेर पडला. नंतर डोळ्याची आग आणि लाली कमी झाली. त्यांना वाटले की विषय संपला. ते सहल आटोपून घरी आले.

Advertisement

तथापि, घरी आल्यानंतर डोळा पुन्हा दुखू लागला. त्यातून सारखे पाणी येऊ लागले. मात्र, त्यांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही आणि ते रात्री झोपी गेले. सकाळी त्यांना जाग आली, ती तीव्र स्वरुपाच्या डोकेदुखीमुळे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घेतली. तेव्हा त्यांच्या डोळ्याच्या कोपऱ्यात पापणीच्या आतल्या बाजूला एक अंकुललेले बीज आढळून आले. ही घटना डॉक्टरांनाही आश्चर्यचकित करणारी होती. त्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली. तेव्हा स्लेप्टोसोव्ह यांनी सहलीला ते गेले असताना डोळ्यात कीटक गेल्याचा प्रसंग स्पष्ट केले. या कीटकाच्या पायाला लागलेले एक सूक्ष्म बीज त्यांच्या डोळ्यात गेले होते, असे तपासणीनंतर लक्षात आले. त्यांनी कीटकाला झटकून टाकले. तथापि, ते बीज डोळ्यातच राहिले. रात्रभर ते डोळ्यात राहिल्याने त्याच्यातून एक सूक्ष्म अंकूर बाहेर पडला होता. तो त्यांच्या पापणीखाली दबला गेल्याने त्यांना असह्या वेदना होऊ लागल्या होत्या. तसेच त्यांच्या डोकेदुखीचेही हेच कारण होते. मात्र, ते बीज डोळ्यात घट्ट बसले असल्याने वरच्या वर काढता येणे शक्य नव्हते. त्यामुळे लोकल अॅनास्थेशिया देऊन त्यांच्या डोळ्यावर लहानशी शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून हे अंकुरलेले बीज काढून टाकण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची डोकेदुखी पूर्णपणे थांबली असून आता त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.