वाढत्या उकाड्यात पावसाचा शिडकावा
पणजी : राज्यात जस जसा उकाडा वाढत चाललेला आहे, त्याचबरोबर रात्रीच्या वेळी अधूनमधून पावसाच्या सरी देखील कोसळून जात आहेत. तर कधी उकाडा तर कधी गारवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 1 से. मी. पावसाची नोंद काणकोणमध्ये झाली. राज्यातील तापमानात वाढ झालेली आहे. तापमान अजून वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. या व्यतिरिक्त हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही कमी झाले आहे. बुधवारी रात्री काणकोणला पावसाने झोडपले. सुमारे तासभर पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसाचा प्रभाव सांगे परिसरातही होता. त्यामुळे सांगे तालुक्यात अर्धा से.मी. पावसाची नोंद झाली. सत्तरीत पावसाचा किंचित शिडकावा झाला. धारबांदोड्यातही किंचित पाऊस पडून गेला. सध्या अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या खाडीत जोरदार पावसाळी वातावरण तयार आहे. परिणामी केरळ आणि कर्नाटकातील काही भागात अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत आहे. ओडिशामध्ये देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ओडिशा व बिहार राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रातील ढग पूर्वेच्या दिशेने सरकले तर गोव्यात पावसाची शक्यता आहे. सध्या मंगळूरपर्यंत अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. काल गुरुवारी गोव्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी काळ्dयाकुट्ट ढगांचे आक्रमण वाढले होते. हवामान खात्याने किंचित पावसाचा शिडकावा होईल, असे कळविले आहे.