इफ्फीत तरुण चित्रपट निर्मात्यांवर प्रकाशझोत
महोत्सव संचालक शेखर कपूर यांची माहिती: 180 प्रीमियर शो, ऑस्ट्रेलिया फोकस कंट्री : मयूर पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटाला 40 लाखांचे पारितोषिक
पणजी : गोव्यात 20 नोव्हेंबर ते 28 दरम्यान होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) यंदाची थीम ‘तऊण फिल्ममेकर्स’ वर आधारित असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. विकसित होत असलेल्या जगात कथाकथनाची कला जतन करणे पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे. कथा या सिनेमाला प्रभावी बनवतात. त्यांचा संदेश या काळातील कला प्रकाराचा सन्मान आणि पालन पोषण करण्यासाठी महोत्सवाची बांधिलकी प्रतिबिंबित करतो, असे मत महोत्सव संचालक शेखर कपूर यांनी दिल्ली येथे काल सोमवारी झालेल्या इफ्फीच्या कर्टन रेझर पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तब्बल 180 होणार प्रीमियर शो
यंदा इफ्फीमध्ये 15 जागतिक प्रीमियर, 3 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 40 आशियाई प्रीमियर आणि 106 भारतीय प्रीमियरसह 81 देशांमधील 180 हून जास्त आंतरराष्ट्रीय चित्रपट सादर केले जाणार आहेत. जागतिक स्तरावरील पुरस्कार प्राप्त आणि प्रसिद्ध अशी चित्रपटांची निवड करण्यात आल्याने यंदाचा महोत्सव हा प्रेक्षकांवर कायमचा प्रभाव टाकेल.
ऑस्ट्रेलिया फोकस कंट्री
यंदाच्या महोत्सवासाठी ऑस्ट्रेलिया देशाची ‘कंट्री फोकस’ म्हणून निवड करण्यात आली असल्यामुळे यात ऑस्ट्रेलियन चित्रपट संस्कृती दिसेल. याशिवाय विविध विभागांचाही या महोत्सवात समावेश आहे.
स्पर्धेसाठी 15 चित्रपटांची निवड
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 वैशिष्ट्यापूर्ण चित्रपट सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी स्पर्धा करतील. सुवर्ण मयूर पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटाला 40 लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाव्यतिरिक्त, ज्युरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुऊष), सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला), विशेष ज्युरी पुरस्कार श्रेणीतील विजेते देखील निश्चित करतील.
रौप्य मयूरसाठी सात चित्रपटांची स्पर्धा
सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यापूर्ण चित्रपट पदार्पण दिग्दर्शक रौप्य मयूर पुरस्कारासाठी एकूण सात चित्रपट स्पर्धेत आहेत. या विभागात जिंकणाऱ्या दिग्दर्शकाला दहा लाख ऊपये व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. देशभरातील तऊण चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा नवीनच उत्कृष्ट भारतीय पदार्पण दिग्दर्शक हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या विभागात एकूण 102 चित्रपटांपैकी पाच चित्रपट या पुरस्कारासाठी स्पर्धा करतील. याचबरोबर ओटीटी पुरस्कारही देण्यात येणार आहे. यंदा हे दोन नवीन विभाग सुरू करण्यात आले आहेत.
ऑस्टेलियाला सत्यजित रे जीवनगौरव
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा हा मायकल ग्रेसी यांच्या बेटरमेन या ऑस्ट्रेलियन चित्रपटाने आणि आशिया प्रीमियरसह उघडणार आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध ब्रिटिश पॉपस्टार रॉबी विलियम्सच्या जीवनाची एक चित्रपट झलक दाखवण्यात येईल. तसेच ऑस्ट्रेलियाचे दिग्दर्शक फिलिप नॉईस यांना यंदाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येईल. भारताच्या चित्रपट संस्कृतीची विविधता दाखवणारा महोत्सवातील विभाग म्हणजे इंडियन पॅनोरमा. या विभागात 25 फीचर फिल्म आणि 20 नॉन फीचर फिल्म दाखवले जातील. विभागाचा शुभारंभ रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ आणि नॉन फिचर फिल्म ‘घर जैसा कुछ’ या चित्रपटांनी होणार आहे. इफ्फीमध्ये भारतीय चित्रपटातील दिग्गज राज कपूर, मोहम्मद रफी तपन सिन्हा आणि अक्किनेनी नागेश्वरा राव यांना आदरांजली वाहण्यात येईल. आंचिममध्ये महिलांनी दिग्दर्शित केलेल्या 47 चित्रपट आणि तऊण आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांच्या 66 चित्रपटांचा समावेश आहे. विभागातील महिला उदयोन्मुख महिला चित्रपट निर्मात्यांचे महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकतील.
जास्तीत जास्त चित्रपट पाहता यावेत याकरिता अतिरिक्त थिएटर्सची सोय करण्यात आली आहे. आयनॉक्स मडगाव 4 क्रीन आणि फोंडा येथील दोन थिएटर, आयनॉक्स पणजी, मॅकेनिज पॅलेस, आयनॉक्स पर्वरी, झी स्क्वेअर सम्राट अशोक या ठिकाणी 270 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील. याशिवाय चित्रपट प्रदर्शनासाठी गोव्यात पाच पिक्चर टाईम इन्फ्लेटेबल थिएटर्स येणार आहेत. क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो (सीएमओटी) उपक्रमाने यावर्षी 1,032 नोंदीसह विक्रमी सहभाग नोंदवला आहे, जो 2023 च्या जवळपास दुप्पट आहे. हा कार्यक्रम 13 फिल्म मेकिंग क्राफ्टमध्ये तऊण प्रतिभेला प्रोत्साहन देतो आणि पहिल्यांदाच 100 सहभागी निवडले जातील, जे इच्छुक चित्रपट निर्मात्यांना एक अनोखे व्यासपीठ देऊ करतील. इफ्फीमध्ये ए आर रहमान, शबाना आजमी मणिरत्नम, विदू विनोद चोप्रा यासारख्या भारतीय व आंतरराष्ट्रीय दिग्गजांचे 25हून जास्त मास्टरक्लास कला अकादमी येथे आयोजित करण्यात आले आहेत.
इफ्फी हा केवळ भारतासाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कानसारख्या जागतिक महोत्सवांशी तुलना करता येणारा ऐतिहासिक महोत्सव बनला आहे,असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुऊगन म्हणाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले, विविध स्वरूप आणि दृष्टीकोन स्वीकारून भारत जगातील सर्वात मोठे चित्रपट निर्मिती राष्ट्र म्हणून वेगाने उदयास येत आहे. आमच्या उद्योगातील नवीन, उदयोन्मुख आवाज राष्ट्राला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.