For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : मोहोळजवळ भरधाव टेम्पोचा कहर; कॉलेजला निघालेल्या दोन तरुणींचा मृत्यू.

05:45 PM Dec 26, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   मोहोळजवळ भरधाव टेम्पोचा कहर  कॉलेजला निघालेल्या दोन तरुणींचा मृत्यू
Advertisement

                           पाटकुल परिसरात दुचाकी-टेम्पो अपघात

Advertisement

पाटकुल:- कॉलेजचे स्वप्न उराशी बाळगून घराबाहेर पडलेल्या दोन विद्यार्थिनींवर काळाने घाला घातला. भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली. ही हृदयद्रावक घटना आज सकाळी नजीक पिंपरी परिसरात घडली.

तांबोळे (ता. मोहोळ) येथील प्रज्ञा धनाजी कोकाटे (वय १७) ही मोहोळ येथील नेताजी महाविद्यालयात ११ वी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. आज सकाळी प्रज्ञा आणि तिची मैत्रीण स्नेहल काशिनाथ वाघमोडे (वय १७, रा. नजीक पिंपरी) या दोघी दुचाकीवरून कॉलेजला निघाल्या असताना नजीक पिंपरीच्या हद्दीत समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.

Advertisement

धडकेचा जोर इतका प्रचंड होता की प्रज्ञा कोकाटे हिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी स्नेहल वाघमोडे हिला तातडीने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले परंतु तिचाही तोपर्यंत मृत्यू झाला . स्नेहल ही कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय, मोहोळ येथे ११ वी सायन्समध्ये शिक्षण घेत आहे.

घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका उमद्या विद्यार्थिनीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने तांबोळे, नजीक पिंपरी आणि मोहोळ परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement
Tags :

.