धावती स्कोडा कार पेटली
कराड :
धावत्या स्कोडा कारने अचानक पेट घेतल्याची घटना कराडलगत पाचवड फाटा येथे शनिवारी रात्री घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे पूर्णत: जळून खाक झाली. कराड ग्रामीण पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील पाचवड फाटा हद्दीत महामार्गावर धावत्या कारमधून अचानक धूर यायला लागला. चालकाने प्रसंगावधान राखत कार महामार्गाच्या बाजूला घेतली. कारमधून सर्व प्रवासी तत्काळ बाहेर पडले. काही क्षणात अचानक कारने पेट घेतला. काही कळायच्या आतच आगीने संपूर्ण कारला विळखा घातला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तर त्या कारमधील प्रवाशांचा थरकाप उडाला होता. महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. पेटलेल्या कारची आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी कारमधून उतरलेल्या प्रवाशांना धीर दिला. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात नव्हती.