‘चेंगराचेंगरी’वर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवावे
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांची मागणी : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्र
प्रतिनिधी/ बेंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या (आरसीबी) विजयी उत्सवादरम्यान शहरातील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी विनंती विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आर. अशोक यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पानांचे पत्र लिहिले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ आरसीबीच्या विजयोत्सव समारंभात 4 जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू आणि 75 जण जखमी झाल्याच्या दुर्दैवी घटनेने राज्य हादरले आहे.
आर. अशोक पुढे म्हणाले, या घटनेमुळे सार्वजनिक सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि राज्यातील क्रीडा आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, असा संशय आहे. या प्रकरणामुळे लोकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. या घटनेतील प्रशासकीय त्रुटी आणि घटनेनंतर सरकारने केलेल्या कृतींमुळे सार्वजनिक क्षेत्रात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. चेंगराचेंगरीला जबाबदार असलेल्या शक्तिशाली लोकांना संरक्षण दिले जात आहे. सत्य लपवण्यासाठी तीन प्रकारचे तपास केले जात आहेत. या प्रकरणात असहाय्य अधिकाऱ्यांना बळी पडण्यात आले आहे, अशी सार्वजनिक क्षेत्रात अशी चर्चा आहे, असे पत्रात नमूद केले आहे.
अधिवेशनादरम्यान चेंगराचेंगरीला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची सखोल चौकशी, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना मजबूत करणे, जखमींना योग्य उपचार आणि बाधित कुटुंबांना भरपाईची व्यवस्था करणे, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारच्या योजनांवर चर्चा करण्याची गरज आहे. या विशेष अधिवेशनामुळे राज्यातील जनतेप्रती सरकारची वचनबद्धता दिसून येईल आणि या दुर्घटनेतून शिकलेल्या धड्यांवर आधारित भविष्यासाठी योग्य पावले उचलता येतील. तसेच राज्यातील जनतेला घटनेची कारणे कळवण्यात येतील आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कोणती पावले उचलावीत यावर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे. या संदर्भात, आर. अशोक यांनी कर्नाटक विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्राद्वारे केली आहे.