For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायामोहाने मूढ बनलेला जीव केवळ देहसुखाचाच विचार करतो

06:21 AM Feb 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
मायामोहाने मूढ बनलेला जीव केवळ देहसुखाचाच विचार करतो
Advertisement

अध्याय सातवा

Advertisement

क्षरं पञ्चात्मकं विद्धि तदन्तरक्षरं स्मृतम् । उभाभ्यां यदतिक्रान्तं शुद्धं विद्धि सनातनम् ।। 4 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. क्षर म्हणजे नाश पावणारे आणि अक्षर म्हणजे नाश न पावणारे किंवा अविनाशी. विश्वात दिसणाऱ्या सर्व स्थिर व हालचाल करणाऱ्या वस्तू पंचमहाभूतांपासून तयार होतात. जर ही पंचमहाभूते नश्वर म्हणजे कधी ना कधी नाश पावणारी आहेत तर त्यापासून तयार झालेल्या वस्तूही नश्वर असतात. या सर्व वस्तूत असलेला आत्मा हा ईश्वरी अंश मात्र अक्षर असतो. बाप्पा म्हणतात की, क्षर पदार्थाच्या आत अक्षर पदार्थ असतो. जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा त्यातील नष्ट न होणारा आत्मा त्यातून निघून जातो व शरीर पंचमहाभूतात विलीन होते. माणूस आयुष्यात जे काही बरं वाईट वागला असेल त्याप्रमाणे आत्मा एकतर ईश्वरात विलीन होतो किंवा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो पण तो ईश्वरी अंश असल्याने कधीही नष्ट होत नाही आणि ही सर्व लीला करणारा ईश्वर, परब्रह्म हे या सगळ्याच्या पलीकडे असते. ते कशानेच बाधित होत नाही. ह्यावरून हे लक्षात येते की, जीवनामध्ये नितिनियमानुसार वागून निरपेक्षतेनं कर्म करून मृत्यूनंतर ईश्वरी तत्वात आपला आत्मा विलीन करण्याचा प्रयत्न करणं ह्यातच प्रत्येक मनुष्याची इतिकर्तव्यता आहे. जे याप्रमाणे वागतील त्यांचं निश्चितच भलं होईल पण बहुतांशी लोक हे सर्व कळत असूनसुद्धा नितिनियमांना बगल देऊन स्वार्थी वागणुकीचे दर्शन घडवताना दिसतात. अशा लोकांना पुनर्जन्म मिळून त्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतात. जे बाप्पांचं सांगणं मान्य करत नाहीत ते मात्र जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकतात. पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत की, जे जन्ममृत्युच्या चक्रात अडकतात ते संसारी असतात.

अनेकजन्मसंभूतिऽ संसृतिऽ परिकीर्तिता ।

Advertisement

संसृतिं प्राप्नुवन्त्येते ये तु मां गणयन्ति न ।। 5 ।।

अर्थ- अनेक जन्मांमध्ये उत्पत्ती होणे याला संसार म्हणतात. जे मजकडे लक्ष देत नाहीत ते संसाराप्रत येतात.

विवरण- मायामोहाने मूढ बनलेला जीव केवळ देहसुखाचाच विचार करतो. त्यापलीकडे काही आहे हे तो लक्षातच घेत नाही. साहजिक उध्दार होण्याच्या दृष्टीने त्याच्या हातून कोणतेच वर्तन घडत नाही. त्यामुळे तो जन्ममृत्युच्या चक्रात म्हणजे संसार चक्रात अडकतो. असे त्याचे अनेक जन्म होत असतात. ह्यातून कसे सुटायचे हेच त्याला कुणी समजावून सांगत नाही. खरं म्हणजे माणसाच्या हे लक्षात यायला हवं की, जीवनात आपल्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट घडत नाही ह्याचाच अर्थ असा की, अपल्या जीवनाचे नियंत्रण करणारा वेगळा कुणीतरी आहे आणि तो आपल्या जीवनाची सूत्रे हलवत असून त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात घटना घडत आहेत. जे संत साहित्याचा अभ्यास करतात त्यांच्या हे लक्षात येतं की, परब्रह्म, परमात्मा हा आपल्या जीवनाचा सूत्रधार असून तो आपला हितकर्ता आहे. आपण त्यांची भक्ती करावी म्हणजे तो आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला ह्या चक्रातून सुटण्याचा मार्ग दाखवेल. म्हणून जे ईश्वराची म्हणजे त्याचे सगुण रुप असलेल्या बाप्पांची भक्ती करतात ते बाप्पांना अतिशय प्रिय होतात. त्यांचा ह्या संसार चक्रातून सुटका व्हावी म्हणून मार्ग दाखवण्यास तत्पर असतात. योगाभ्यास करून जे त्यात प्राविण्य मिळवतात त्यांना सूर्यमार्गाने जाऊन परब्रह्मात विलीन होणे सहज शक्य होते. अर्थात त्यांच्या दृष्टीने ती केवळ औपचारिकता असते कारण ते जिवंतपणीच ईश्वराशी, परब्रह्माशी एकरूप झालेले असतात. मात्र सामान्य संसारी जनांना योगाभ्यास करून सूर्यमार्गाने जाणे शक्य होत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.